क्रिकेटच्या मैदानावर स्लेजिंग आणि हलकीफुलकी भांडणे नेहमी होतच असतात. खरंतर, खेळाची रंगत त्याने वाढते. ऑस्ट्रेलियाचा संघ तर स्लेजिंग (Sledging) करून करून, समोरच्या टीमला बेजार करत आणि त्यानंतर, त्यांना अशी काय मात देत की, पुढील अनेक दिवस त्याची सल त्या खेळाडूंच्या मनात राहते. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या कर्णधाराला ही एका १९ वर्षाच्या भारतीय विकेटकिपरने स्लेज केले होते.
भारतीय संघ २००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) याची ती अखेरची कसोटी मालिका होती. ऑस्ट्रेलियाने वॉच्या नेतृत्वाखालीच सलग १६ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.
ब्रिस्बेनमध्ये मालिकेची सुरुवात झाली. पहिली कसोटी अनिर्णित राहिली तर ॲडलेड मधील दुसरी कसोटी भारताने जिंकत आघाडी घेतली. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने पलटवार करत मालिका १-१ ने बरोबरीत आणली. चौथी आणि निर्णायक कसोटी सिडनीच्या मैदानावर होती.
स्टीव वॉचा तो अखेरचा कसोटी सामना होता. गांगुलीने टॉस जिंकत पहिली फलंदाजी निवडली. सचिन तेंडुलकरच्या नाबाद २४१ आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या १७८ धावांच्या बळावर भारताने ७०५ धावांचा एव्हरेस्टच उभा गेला.
प्रत्युत्तरादाखल जस्टिन लँगर आणि मॅथ्यू हेडन यांनी १४७ नावांची भागीदारी करत चोख प्रत्युत्तर दिले. पण हेडन बाद झाल्यावर अचानक रिकी पॉंटिंग, लँगर आणि डेमियन मार्टिन हे थोड्या थोड्या अंतराने तंबूत परतले. डाव सावरण्याची जबाबदारी स्वतः कर्णधार वॉवर येऊन पडली. तो सावधगिरीने खेळू लागला.
दोन वर्षांपूर्वी अवघा १७ वर्षाचा असताना भारतीय संघात पदार्पण केलेला पार्थिव पटेल (Parthiv Patel) यष्टिरक्षण करत होता. स्टीव्ह वॉचा बचावात्मक पवित्रा त्याला आवडला नाही आणि तो हळूहळू वॉला उकसवू लागला. वॉ त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता पण अचानक पार्थिव म्हणाला,
“कम ऑन स्टीव, रिटायर व्हायच्या आधी एक स्लॉग स्विप खेळून दाखवा ना”
एका एकोणीसवर्षीय क्रिकेटरने असे बोलणे वॉला आवडले नाही. त्याने पार्थिवला उत्तर दिले की, ” बेटा, जेव्हा तू नॅपकिन घालायचा तेव्हा मी माझ्या देशासाठी खेळत होतो.”
वॉच्या उत्तराने पार्थिव शांत झाला. दुसऱ्या डावात वॉने ८० धावा करत सामना अनिर्णित राखला. वॉच्या शानदार कारकिर्दीची घरच्या मैदानावर अखेर झाली.
२००२ साली पदार्पण करूनदेखील पार्थिव भारतासाठी २५ कसोटी, ३८ वनडे आणि २ टी२० खेळू शकला. भारतीय संघातील विकेटकीपरच्या जागेसाठी असलेल्या स्पर्धेत तो काहीसा मागे पडला. परंतु, आयपीएलमध्ये अनेक संघांचे प्रतिनिधित्व त्याने केले.
वाचा –
सर्वाधिक वेळा ऑस्ट्रेलियाचे चार गडी गारद करणारे ३ भारतीय गोलंदाज, एका दिग्गजाचाही समावेश
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वनडेत सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज, दुसरे नाव अनपेक्षित
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळलेल्या लक्ष्मणच्या पाच ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळ्या