न्यूझीलंड क्रिकेटसाठी सर रिचर्ड हॅडली, मार्टिन क्रो, स्टीफन फ्लेमिंग, नॅथन ऍस्टल, ब्रँडन मॅक्क्युलम अशा एकाहून एक सरस खेळाडूंनी योगदान दिले. खिलाडूवृत्ती आणि चिवटपणा हा त्यांचा भावणारा गुण. यासोबतच न्यूझीलंड क्रिकेटमध्ये असा एक अष्टपैलू खेळाडू होता, ज्याच्यातील गुणवत्ता सामन्यागणिक ओसंडून वाहत होती. तो होता ख्रिस केर्न्स. एकेकाळी आपल्या संघाचे ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा केर्न्स आज गरिबी आणि संकटाना लढा देत जीवन जगतोय. त्याचीच ही कहाणी.
वडील इंटरनॅशनल क्रिकेटर. ऑकलंड शहरातील सर्वात पॉश एरियात राहणारा ख्रिस रक्तातच क्रिकेट असल्याने आपोआप क्रिकेट ग्राउंडकडे जाऊ लागला. त्याच्यात अफाट प्रतिमा होती आणि तिच्या जोरावर तो अगदी कमी कालावधीत नॅशनल टीमपर्यंत येऊन पोहोचला. जबरदस्त बॅटिंग आणि मिडीयम फास्टपेक्षा थोडी जास्त फास्ट बॉलिंग हे केर्न्सचे गुण त्याला न्यूझीलंड क्रिकेटमध्ये मानाचे स्थान देऊन गेले. एका दिग्गज ऑलराऊंडरच्या रुपात.
हेही पाहा- भारताला नमवत किवीजला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणारा Chris Cairnsची सद्यस्थिती एवढी का दुर्दैवी
आज न्यूझीलंडची टीम जगात भारी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मागच्या सात वर्षात प्रत्येक आयसीसी ट्रॉफीच्या फायनलमध्ये ते खेळलेत. त्यातली एक वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिप त्यांनी जिंकली, पण न्यूझीलंडला पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा होता ख्रिस केर्न्सच. केनियात पहिला आयसीसी नॉकआऊट कप खेळला गेला. म्हणजे आत्ताची चॅम्पियन्स ट्रॉफी बरं का. दोन टीम फायनलला पोहोचल्या एक होती टीम इंडिया आणि दुसरी न्यूझीलंड. फायनलला कॅप्टन गांगुलीन तुफानी शतक मारलं आणि इंडिया २६४ पर्यंत पोहोचली. न्यूझीलंड चेस करायला आली आणि शंभरी पार करताच त्यांचे चार मोहरे पडले.
भारतात फटाके फुटायला लागले. जणू काय आता आपण चॅम्पियनशिप जिंकलो याच अविर्भावात भारतीय होते. त्यानंतर केर्न्स ग्राउंडवर आला आणि होत्याचं नव्हतं झालं. १०९ बॉलवर १०२ रनांची इनिंग खेळत त्याने भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. न्यूझीलंडला चॅम्पियन बनवलं. बाकी अनेक रेकॉर्ड त्याने बनवले पण खऱ्या अर्थाने हीच त्याच्या करिअरची हायलाईट. २००६ ला रिटायर होताना त्याच्या नावापुढे लावले गेले. ‘वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर ऑफ द गेम.’
रिटायरमेंटनंतरच त्याचा आयुष्य फक्त आणि फक्त वादांनी आणि वादळांनी भरलेलं राहील. आयपीएल सुरू व्हायच्या आधी भारतात जी आयसीएल झाली, तिच्यात तो सहभागी झाला, आणि त्याचे दिवस फिरले. इथेच २००८ मध्ये मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप त्याच्यावर लागला. कोर्टाच्या अनेक फेऱ्या मारल्या. त्यावेळी आयपीएलचे बॉस असलेल्या ललित मोदींवर त्याने अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. २०१२ ला त्याने ही केस जिंकली.
आपल्याकडे म्हणतात ना साडेसाती मागे लागल्यावर ती सहजासहजी सुटत नाही. तसंच काहीसं केर्न्सच झालं. पहिल्या आरोपातून मुक्तता होताच, त्याचेच टीममेट राहिलेल्या लू विन्सेट आणि ब्रेंडन मॅकलम यांनी त्याच्यावर पुन्हा मॅच फिक्सिंग केल्याचा ठपका ठेवला. पुन्हा कोर्टाच्या चकरा आणि तोच मानसिक त्रास. तरीही मैदानावर जसा तो कधीही हार मानत नव्हता, तसा इथेही तो हार मानायला तयार नव्हता. तीन वर्ष त्याने ही केसही लढली आणि जिंकली सुद्धा.
ख्रिस स्वतःला निर्दोष सिद्ध करत राहिला पण यात त्याची आर्थिक परिस्थिती अगदीच खालावली. कधी ऑकलंडच्या सगळ्यात महागड्या घरात राहणारा आणि आपल्या गर्लफ्रेंडला ३.२ कॅरेटची डायमंड रिंग देऊन प्रपोज करणारा केर्न्स रस्त्यावर आला होता. न्यूझीलंडचा मॉडर्न ग्रेट २०१५-१६ मध्ये घर चालवण्यासाठी, ऑकलँड येथे बस स्टॉप धुण्याचे काम करू लागला. त्याने ऑकलँड नगरपालिकेचा ट्रकही चालवला. केर्न्ससारख्या लक्झरी लाइफ जगणाऱ्या खेळाडूला असे जीवन जगावे लागेल, असे कधी कुणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते.
पुढे त्यान न्यूझीलंड सोडलं आणि ऑस्ट्रेलियात सेटल झाला. देश बदलला पण त्याचे नशिब नाही. २०२१ मध्ये अचानक बातमी आली त्याला हर्ट अटॅक आला. लोक त्याच्या आयुष्याची प्रार्थना करत असतानाच आणखी एक वाईट बातमी आली कि तो पॅरालाईज झाला. त्याच्या मागे लागलेली साडेसाती थांबायचं नाव घेईना. आधीच इतक्या आजारांशी झुंज देत असलेल्या ख्रिसला आतड्यांचा कॅन्सर झाल्याचेही निदान झालं. त्याने अनेक दिवस वेंटीलेटरवर काढले. आता कुठे वयाची पन्नाशी पार करून गेलेला ख्रिस अजूनही पूर्णता बरा झाला नाही. ज्याने आयुष्यात आजवर इतका संघर्ष केला तो ख्रिस, जीवन मरणाची ही लढाई देखील लवकरच जिंकेल अगदी एखाद्या योद्धयाप्रमाणे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लंबूजी! क्रिकेटच्या मैदानावर ‘या’ खेळाडूंच्या उंचीचीच रंगते चर्चा, ‘टॉप’ला फक्त पाकिस्तानी क्रिकेटर
मागं-पुढं न बघता, जेव्हा विराट गेलेला गंभीरच्या अंगावर धावून, नेमंक काय घडलं होतं?