दिनांक : १८ फेब्रुवारी २०२१
स्थळ : आयटीसी ग्रॅंड चोला हॉटेल, चेन्नई
कार्यक्रम : आयपीएल लिलाव २०२१
दुपारच्या तीन वाजता जगातील सर्वात मोठ्या व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावास सुरुवात झाली. पहिल्या सेटमध्ये फलंदाजांवर बोली लागणार होती. सेटमध्ये उपलब्ध असलेल्या सात नावांपैकी फक्त ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथवर २ कोटी २० लाखांची बोली लागली आणि खऱ्या अर्थाने लिलावाला प्रारंभ झाला. दुसरा सेट होता अष्टपैलू खेळाडूंचा. या सेटमधील खेळाडू करोडपती होणार ही बाब सामान्य क्रिकेटप्रेमी चांगलेच जाणून होते.
अपेक्षेप्रमाणे शाकिब अल हसन, शिवम दुबे व मोईन अली हे कोट्याधीश झाले. आयपीएलचा ‘मिलियन डॉलर बेबी’ असे बिरुद मिरवणारा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल नेहमीप्रमाणे ‘हॉट प्रॉपर्टी’ ठरला आणि १४.२५ कोटी रुपये घेत बेंगलोरवासी झाला. मॅक्सवेलपेक्षा जास्त बोली कोणालाच लागणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटले. पण…
साडेतीन वाजण्याच्या आसपास लिलावकर्त्या हूय एडमड यांनी ‘ख्रिस मॉरिस’ हे नाव उच्चारले. तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्हाला हे नाव चांगलेच परिचित असणारा. तुम्ही अंदाज लावला असणार की, हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ७-८ कोटी तर नक्कीच घेऊन जाईल. त्याची योग्यता पाहता त्याला ही रक्कम मिळणे, स्वाभाविक आहे. मात्र, त्यानंतर पुढील जवळपास दहा मिनिटात जे काही घडले, ते ऐतिहासिक होते.
मॉरिसने लिलावासाठी आपली आधारभूत किंमत ७५ लाख इतकी ठेवली होती. त्याच किमतीपासून लिलावाला सुरुवात झाली. सर्वात पहिली बोली लावली गतविजेत्या मुंबई इंडियन्सने. पाठोपाठ, मागील वर्षी मॉरिस ज्या संघाचा भाग होता, त्या विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबईपेक्षा वरचढ बोली लावली. दोन्ही संघांमध्ये मॉरिसला आपल्याकडे घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. बोली हळूहळू ७ कोटींच्या पुढे सरकली. मुंबई इंडियन्सचा क्रिकेटिंग हेड झहीर खान तर ठरवूनच आला होता की, मॉरिसला यावर्षी ‘मुंबईकर’ करायचे. मागील वर्षी आरसीबीने मॉरिसला १० कोटी रुपयात खरेदी केले होते. त्या रकमेच्या पुढे बोली गेल्याने, आरसीबीने मॉरिसचा नाद सोडला. चॅलेंजर्स बाहेर पडल्यानंतर रॉयल्सने लिलावात उडी घेतली. मुंबईला चांगलेच जेरीस आणत १३ कोटी ५० लाख रुपयांवर त्यांनी मुंबईला माघार घेण्यास भाग पाडले. मात्र, अचानकपणे या लिलावात सर्वाधिक रक्कम घेऊन येणाऱ्या प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सने मॉरिससाठी बोली लावली.
पाहता पाहता मॉरिसची बोली मॅक्सवेलला पछाडत १५ कोटींच्या घरात पोहोचली. दुसऱ्या क्षणाला मॉरिसने मागीलवर्षी पॅट कमिन्सने १५.५० कोटी रुपये मिळवत, आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू बनण्याचा विक्रम आपल्या नावे केला. मॉरिसची बोली १५.७५ कोटींवर थांबली. पंजाबने काही वेळ विचार करत त्याला १६ कोटींचा मनसबदार बनवला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू १६ कोटी रुपयांचा होता आणि तो खेळाडू होता भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग. २०१६ आयपीएल लिलावावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आताचे दिल्ली कॅपिटल्स) त्याला ही रक्कम देऊ केली होती.
पुढील काही क्षणात इतिहास घडणार का? याची उत्सुकता तिथे उपस्थित असलेल्या लोकांसह टेलिव्हिजनवर या लिलावाचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या करोडो क्रिकेट चाहत्यांमध्ये ताणली गेली होती. अखेरीस तो क्षण आला. राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित बारठाकूर यांनी तो ऐतिहासिक ठरेल असा ‘बॅटन’ उचलला. एडमड यांनी १६ कोटी २५ लाख अशी रक्कम बोलून दाखवली. मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनणार याची औपचारिक घोषणा बाकी होती. पंजाब संघाने पुढे बोली लावण्यास नकार दिल्याने एडमड यांनी लिलावासाठीचा हातोडा आपटून ‘सोल्ड’ असे म्हटले आणि संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस आयपीएलच्या चौदा वर्षाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला होता.
भारतातच झालेली २०१२ चॅम्पियन्स लीग गाजवल्यानंतर मॉरिसने सर्वप्रथम आयपीएल लिलावासाठी २०१३ साली नाव दिले होते. त्यावेळी, एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर ६२५.००० अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ४ कोटी २० लाख इतकी रक्कम त्याच्यासाठी खर्च केले होते. तेव्हा मॉरिसने प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,
“इतकी रक्कम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही.”
मात्र, कदाचित मॉरिसला माहित नव्हते, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणतात. कारण त्यानंतर प्रत्येक लिलावात तो कोट्याधीश बनतच राहिला. २०१४ साली राजस्थान रॉयल्सने तीन कोटीपेक्षा जास्त रक्कम त्याला दिली. २०१६ आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेविल्सने ७ कोटी, २०१८ आयपीएल हंगामात त्याला संघात कायम करण्यासाठी दिल्लीने आठ कोटी मोजले. २०२० चा लिलाव त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १० कोटी रुपयांची मोठी रक्कम त्याला देऊ केली होती. काल झालेल्या लिलावानंतर त्याने जो इतिहास रचला तो पुढील अनेक वर्ष असाच सांगितला जाईल.
सध्या राष्ट्रीय संघ बाहेर असलेला, छोट्या छोट्या दुखापतीने त्रस्त असलेला, मात्र मेहनत करण्यास कुठेही कमी पडत नसलेला मॉरिस, पैशाच्या रूपाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून २००८ आयपीएल खिताब जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सला आगामी आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसेल.
महत्वाच्या बातम्या:
खास संदेशासह सेहवागने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा, म्हणाला
मी देखील या काळात नैराश्याचा सामना केला, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा धक्कादायक खुलासा






