ऑस्ट्रेलिया.. जागतिक क्रिकेटवर सर्वाधिक काळ राज्य करणारा देश. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या एकामागून एक पिढ्या येत गेल्या; मात्र, ऑस्ट्रेलियाची क्रिकेटवरील मक्तेदारी त्यांनी टिकवून ठेवली. आतापर्यंतचे सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हटले गेलेले सर डॉन ब्रॅडमन हेदेखील ऑस्ट्रेलियन. सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दबदबा राखलेल्या ऑस्ट्रेलियाने, नव्या जमान्यात देखील क्रिकेटवर आपला एकछत्री अंमल गाजवला. एकदिवसीय क्रिकेट आले आणि क्रिकेट चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे खरे रूप पाहिले. खेळण्याची आक्रमक शैली, दर्जेदार फलंदाज आणि तुफानी वेगवान गोलंदाज कायमच ऑस्ट्रेलियाच्या संघात दिसून आले. १९७५ ला क्रिकेटचा पहिला विश्वचषक भरला व ऑस्ट्रेलियाने त्याच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. आज एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या १२ स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आणि त्यातील तब्बल पाच स्पर्धा या ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या नावे केल्या. या पाचपैकी पहिल्या विश्वविजयाची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रथमच इंग्लंडबाहेर विश्वचषकाचे आयोजन
क्रिकेटचा जन्मादाता देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडने १९७५, १९७९ व १९८३ असे सलग तीन वेळा विश्वचषकाचे आयोजन केले. दुर्दैवाने, या तीनपैकी इंग्लंडला एकदाही विश्वचषक मिळवता आला नाही. पहिल्या दोन विश्वचषकाचे विजेतेपद वेस्ट इंडीजने पटकावले. तर, तिसऱ्या विश्वचषकात भारताचा रूपाने नवा विजेता क्रिकेटजगताला मिळाला. भारताने विश्वचषक जिंकला आणि भारतात क्रिकेटच्या प्रसिद्धीत दुपटीने वाढ झाली. आतापर्यंत फक्त सुनील गावसकर यांचा खेळ पाहणारे लोक कपिल देव यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले. भारतात जिकडे तिकडे क्रिकेट दिसायचे. याच प्रसिद्धीचा फायदा घेत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेषता त्यावेळचे बीसीसीआयचे सचिव असलेल्या जगमोहन दालमिया यांनी शर्थीचे प्रयत्न करून; पुढील विश्वचषक भारतात आयोजित करण्याचे निश्चित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सर्व योजना सांगितल्यानंतर १९८७ क्रिकेट विश्वचषक भारत व पाकिस्तानमध्ये खेळवण्याचे नक्की झाले.
‘रिलायन्स क्रिकेट विश्वचषक १९८७’
त्यावेळी भारतात धीरुभाई अंबानींच्या रिलायन्स समूहाची बरीच चर्चा होती. याच रिलायन्स समूहाने विश्वचषकाचे प्रायोजकत्व स्वीकारले. स्पर्धेचे नाव आता ‘रिलायन्स क्रिकेट विश्वचषक १९८७’ असे झाले होते. ८ ऑक्टोबरला सुरू होणारी स्पर्धा ८ नोव्हेंबरला संपणार होती. क्रिकेटप्रेमींसाठी हा एक महिन्याचा उत्सवच होता. स्पर्धेच्या नियमात काही बदल करण्यात आले होते. पूर्वी ६० षटकांचे खेळवले जाणारे सामने ५० षटकांपर्यंत मर्यादित केले गेले. आठ संघांना चार-चारच्या दोन गटात विभागले. ‘अ’ गटात यजमान भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व झिम्बाब्वे या संघांचा समावेश होता. ‘ब’ गटामध्ये सहयजमान पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका समाविष्ट होते. साखळी सामन्यात सर्व संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध दोन-दोन वेळा भेटणार होते. दोन्ही गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार होते. त्यानंतर दोन उपांत्य फेरी व अंतिम फेरी असे स्पर्धेचे प्रारूप ठरलेले.
साखळी फेरीत पहायला मिळाले दर्जेदार सामने आणि अविस्मरणीय क्षण
‘ब’ गटातील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याने विश्वचषकाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामान्यांनी रोमांचकतेची हद्द पार केली. पुढील एक महिना सर्व क्रिकेटप्रेमींना अव्वल दर्जाच्या क्रिकेटची मेजवानी मिळणार हे निश्चित होते. वेस्ट इंडीजने श्रीलंकेविरुद्ध ३६० धावा चोपल्या तेव्हा, अनेकांचे डोळे विस्फारले गेले. डेव हटन यांची १४२ धावांची झुंजार खेळी संपुष्टात आणताना; मार्टिन क्रो यांनी घेतलेला झेल अजरामर झाला. ग्रॅहम गूच व डेविड बून यांचा फलंदाजीतील फॉर्म अतिशय टोकाला पोहोचला होता. ऑस्ट्रेलियाचे क्रेग मॅकडरमॉट संपूर्ण स्पर्धेत आग ओकत होते. स्पर्धेत ११ शतके ठोकण्यात आली. चेतन शर्मा यांची हॅट्रिक व सुनील गावसकरांचे एकमेव एकदिवसीय शतक भारतीयांसाठी सर्वाधिक आनंद देणारे क्षण ठरले. कपिल देव आणि कर्टनी वॉल्श यांची खिलाडूवृत्ती अशा अनेक अविस्मरणीय क्षणांनी साखळी फेरी संपली.
उपांत्य सामन्यांचा थरार
‘अ’ गटातून अव्वल राहिलेल्या भारत व ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत जागा बनवली. दुसरीकडे, ‘ब’ गटातून इंग्लंडने प्रथम क्रमांक पटकावत पाकिस्तानसह उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळविली. वेस्ट इंडीज संघ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत पोहोचला नव्हता. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा पहिला उपांत्य फेरीचा सामना लाहोर येथे होणार होता. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भिडणार होते.
यजमानांनी गुंडाळला उपांत्य सामन्यांतून गाशा; भारताचे दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले
लाहोर येथील पहिल्या उपांत्य सामन्यात, ऍलन बॉर्डर यांच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने इम्रान खान यांच्या पाकिस्तानला धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २६८ धावांचा पाठलाग करताना इम्रान खान व जावेद मियांदाद यांनी ११२ धावांची भागीदारी करत; सामन्यात रंगत आणली. मात्र, संपूर्ण स्पर्धा गाजवलेल्या क्रेग मॅकडरमॉट यांनी पाच बळी मिळवत, पाकिस्तानला २४९ धावात रोखले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत जागा बनवली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रॅहम गूच यांनी ‘स्वीप’ लगावत, भारताला स्पर्धेबाहेर घालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय फिरकीपटूंविरुद्ध अफलातून फलंदाजी करत, त्यांनी ११५ धावांची खेळी केली. २५५ धावांचे लक्ष गाठताना भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. परिणामी, भारतीय संघ २१९ धावांवर सर्वबाद झाला. भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांचा हा अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. यजमान असलेले दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर गेले होते. ८ नोव्हेंबर रोजी क्रिकेटजगताला नवा विश्वविजेता मिळणार होता.
८ नोव्हेंबरला घडला इडन गार्डन्सवर इतिहास
आत्तापर्यंत यशस्वीरित्या पार पडलेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार होता. इंग्लंडचे कर्णधार माईक गॅटींग व ऑस्ट्रेलियाचे कर्णधार ऍलन बॉर्डर सकाळी नाणेफेकीसाठी मैदानात उतरले. आज वेस्ट इंडीज आणि भारताव्यतिरीक्त तिसरा विश्वविजेता इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या रूपाने मिळणार होता. ईडन गार्डन्सवर भारतीय संघ खेळत नसतानाही, ६०-६५ हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
ऍलन बॉर्डर यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. संपूर्ण स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेले डेविड बून आजही रंगात होते. इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्यांनी ७५ धावांची लाजवाब खेळी केली. कर्णधार बॉर्डर व डीन जोन्स यांनी देखील उपयुक्त योगदान दिले. मात्र, सामन्याचे रूप बदलले ते माईक वेलेटा यांनी. त्यांनी अवघ्या ३१ चेंडूत ४५ धावांची विस्फोटक खेळी केली. ऑस्ट्रेलियाने आपल्या अखेरच्या ६ षटकात ६५ धावा काढून सामना आपल्या बाजूने झुकवला होता. इंग्लंडकडून फिरकीपटू हेमिंग्स दोन बळी मिळवू शकले. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर २५४ धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या या आव्हानाचा पाठलाग करू शकतो; असे अनेकांना वाटत होते. कारण, इंग्लंडची फलंदाजी तितकीशी मजबूत होती. गूच, कर्णधार गॅटींग, बिल ऍथे, ऍलन लॅम्ब असे सक्षम फलंदाज त्या संघात होते. इंग्लंडच्या डावाची सुरुवात झाली आणि क्रेग मॅकडरमॉट यांनी टीम रॉबिन्सन यांना शून्यावर पायचित पकडले. गूच व ऍथे यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६५ धावा जोडल्या. गूच परतल्यानंतर कर्णधार माईक गॅटींग यांनी संघाची जबाबदारी वाहिली. ऍथे यांच्यासह त्यांनी ७० धावांची भागीदारी करून सामन्यात रंगत आणली. ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी गॅटींग यांना बाद करत ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करून दिले. ऍथे अर्धशतकानंतर फार काळ टिकले नाहीत व स्टीव वॉच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे धावबाद झाले. त्यानंतर डॉटन व एम्बुरी बाद झाल्याने इंग्लंडवर दडपण आले. या सर्वांमध्ये ऍलन लॅम्ब विश्वचषक विजयासाठी निकराची झुंज देत होते. इंग्लंडच्या २२० भावा झाल्या असताना, पुन्हा एकदा स्टीव वॉ ऑस्ट्रेलियाच्या मदतीला धावून आला. ५५ चेंडूत ४५ धावा काढणाऱ्या लॅम्ब यांचा त्रिफळा उडवत त्याने इंग्लंडच्या विश्वचषक विजयाच्या आशांना सुरुंग लावला. पूर्ण ५० षटके खेळूनही इंग्लंड ७ धावांनी पराभूत झाला. इंग्लंडच्या पराभवासोबतच, ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद आपल्या नावे केले होते.
ऑस्ट्रेलियाने १९७५ मध्ये हुकलेली विश्वचषक जिंकण्याची संधी १९८७ मध्ये साधली. ऍलन बॉर्डर यांच्या कल्पक नेतृत्वाला जगाने सलाम केला. ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉर्डर यांना खांद्यावर उचलून घेत; साजरा केलेला जल्लोष कायमस्वरूपी क्रिकेटचाहत्यांच्या डोळ्यांना समाधान देत राहतो.