२०१८ मध्ये इंग्लंड दौर्यानंतर भारतीय संघाने कसोटी मालिका ४-१ ने गमावली तेव्हा भारतीय क्रिकेट संघाला नव्या सलामी जोडीची नितांत गरज होती. शिखर धवन दुखापतग्रस्त होता, मुरली विजयचा फॉर्म चांगला नव्हता आणि केएल राहुलच्या सातत्य आणि तंत्राभोवती प्रश्नचिन्हे लागली होती. मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ सारख्या कमी अनुभवाच्या खेळाडूंच्या नावाची चर्चा होत होती.
खरंतर, या दोघांनीही स्वत: च्या कामगिरीने क्रिकेट वर्तुळात चांगलीच हवा निर्माण केली होती. अगरवाल वेगवान परंतु शिस्तबद्ध फलंदाजीमुळे लोकांच्या नजरेत भरत होता तर शॉने आपण भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे असा विश्वास दिला होता. मात्र, या दोघांव्यतिरिक्त एका नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, चर्चा जरी दबक्या आवाजात असली तरी त्या खेळाडूचे प्रदर्शन व कर्तृत्व अजिबात कमी नव्हते. तो खेळाडू म्हणजे विदर्भाचा रणजी कर्णधार फैजल फजल.
फैजने २०१८ रणजी करंडक स्पर्धेत मयंक अगरवाल पाठोपाठ सर्वाधिक धावा केल्या होत्या. विदर्भाने पहिल्यांदा रणजी करंडक आणि इराणी चषक त्याच्याच नेतृत्वात जिंकला. त्या वर्षीच्या, दुलीप करंडक स्पर्धेसाठी इंडिया ब्ल्यू संघाचे नेतृत्व देखील त्यांच्याकडे दिले गेले होते. भारतीय संघातील स्थानासाठी त्याच्यासोबत स्पर्धा करत असलेल्या, शॉने विंडीज विरुद्ध पदार्पण केले तर अगरवालला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहुप्रतीक्षित पदार्पणाची संधी मिळाली, परंतु फैजला भारत अ संघातही निवडले गेले नाही.
फैजच्या कारकीर्दीचा श्रीगणेशा २००० च्या दशकात झाला. त्याचे नाव सर्वप्रथम १९ वर्ष वयोगटातील स्पर्धेद्वारे पुढे आले. रेल्वेविरुद्ध १८३ धावांची अफलातून खेळी करत त्याने त्या वर्षी बांगलादेश येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आपली निवड करण्यास निवड समितीला भाग पाडले. मात्र, इथे त्याचे भाग्य आडवे आले. स्पर्धेच्या दोन दिवस आधी तो दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्या जागी संधी मिळालेल्या शिखर धवनने संपूर्ण स्पर्धा गाजवत मालिकावीराचा पुरस्कार आपल्या नावे केला.
२००० च्या उत्तरार्धात विदर्भाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत फैजने बऱ्याच धावा जमवल्या आणि क्रिकेटरसिकांना प्रभावित केले. २००९-२०१२ च्या रणजी मोसमांत त्याने रेल्वेचे प्रतिनिधित्व केले. संजय बांगर यांच्या सल्ल्याने त्याने काही काळ दिल्लीत व्यतीत केला. त्याविषयी सांगताना फैज म्हणतो, “दिल्लीत राहिल्याने मी मानसिकदृष्ट्या कणखर झालो. तसेच बांगर, जे.पी. यादव, कर्ण शर्मा आणि मुरली कार्तिक यांच्यासोबत मी बराच वेळ घालवला. या सर्वांनी माझा खेळ सुधारण्यासाठी असंख्य बारकावे लक्षात आणून दिले.”
रेल्वेसाठी तीन हंगाम खेळल्यानंतर २०१३ मध्ये तो पुन्हा आपला घरेलू संघ विदर्भात परतला. तत्पूर्वी, २००९-२०११ अशी तीन वर्ष त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान, राहुल द्रविड, शेन वॉर्न यासारख्या दिग्गजांचे त्याला भरपूर मार्गदर्शन मिळाले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जवळपास १० वर्ष जबरदस्त कामगिरी केल्याचे फळ त्याला २०१६ मध्ये मिळाले. संघातील वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेतल्याने, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकल्यामुळे फैजला तिसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली. फजलने १५ जून २०१६ला हरारे येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी त्याने ६१ चेंडूत सर्वांगसुंदर फलंदाजीने नाबाद ५५ धावा फटकावून भारताला विजय मिळवून दिला. पुढील मालिकेसाठी, पहिल्या पसंतीचे खेळाडू संघात परतल्याने हा सामना त्याचा आत्तापर्यंतचा अखेरचा सामना ठरला आहे.
राष्ट्रीय संघातून सतत डावलले जात असले तरी फैजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा काढणे कमी केले नव्हते. २०१७-१८ व २०१८-१९ अशी सलग दोन वर्ष त्याने आपल्या नेतृत्वाखाली विदर्भाला रणजी विजेते बनवले. दोन्ही मोसमात, संघासाठी सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाजही तोच होता. २०१८ ची इराणी ट्रॉफी देखील विदर्भाने त्याच्याच नेतृत्वात जिंकली. एका उत्तम फलंदाजा सोबतच आपल्यात नेतृत्वगुणही आहेत असे त्याने छाती ठोकून सांगितले आहे.
स्पोर्ट्स टायगरच्या यूट्यूब शो ‘ऑफ द फिल्ड’मध्ये बोलताना फजलला प्रश्न विचारण्यात आला होता की, तूला भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली नाही. तुझ्यामते कुठे तुझी चुकी झाली? याचे उत्तर देत फजल म्हणाला होता की, “प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मलाही माहित नाही मला संधी न देण्यामागे काय कारण आहे. वनडे पदार्पणाच्या सामन्यात मी अर्धशतक केले. तरी मला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळाले नाही.”
“आपणा सर्वांना माहिती आहे की, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खूप स्पर्धा आहे. मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की, मला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. कारण, माझे लक्ष्य माझ्या देशाकडून खेळायचे होते आणि त्याची तुलना दूसऱ्या कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. मला आताही भारतीय कसोटी संघाकडून खेळायचे आहे. पण, मी भारतीय संघात कायम राहू शकलो नाही, याचे मला दुख: आहे. पण, या गोष्टीची माझ्याशी चौकशी करण्याऐवजी यासोबत जुळलेल्या इतर लोकांशी विचारायला पाहिजे,” असे पुढे बोलताना फजल म्हणाला.
आठ हजारहून अधिक धावा केल्या नंतरही राष्ट्रीय संघात निवड न होण्याविषयी बोलताना त्यांनी आपली खंत जाहीर करत म्हटले, “भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी खूप तीव्र स्पर्धा आहे हे मी जाणतो. माझे उद्दिष्ट माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे होते जे मी केले आहे. पण, अजूनही देशासाठी कसोटी खेळण्याचे स्वप्न मी पूर्ण करण्यास उत्सुक आहे.”
सध्या भारतीय संघात रोहित शर्मा, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉसारखे आक्रमक सलामीवीर असले तरी, आज ३६ वर्षाच्या होत असलेल्या फैजची कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा.





