२०२०.. २१ व्या शतकातील दुसऱ्या दशकाची सुरुवात झालीय.. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर गेल्या शतकातील तसेच चालू शतकातील जे काही सर्वोत्तम क्रिकेटपटू होते ते निवृत्त झालेले आहेत किंवा आगामी एक-दोन वर्षात निवृत्त होणार आहेत.. २१ व्या शतकातील सर्वात मोठा क्रिकेटपटू ठरलेल्या एमएस धोनीने अगदी काही दिवसांपूर्वीच आपले बुट टांगले.. विराट, वॉर्नर, रूट, स्मिथ, विल्यमसन ही मंडळी मागील दहा-बारा वर्षात क्रिकेटमध्ये दाखल होऊन दिग्गज झाली आहेत.
ज्याप्रकारे एक खेळाडू जातो तर त्या जागी दुसरा खेळाडू येऊन क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करायला लागतो. तसाच एक उगवता तारा भारतीय क्रिकेटमध्ये दोन वर्षांपूर्वी दाखल झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे शुबमन गिल. आज शुबमन २३ व्या वर्षात पदार्पण करतोय.
पंजाबमधील फजिल्कासारख्या ग्रामीण भागात शुबमनचा जन्म झाला. खरंतर, शुबमनच्या घरचे अस्सल शेतकरी. वाडवडिलांची, शेतीमध्ये कष्ट करायचे, घाम गाळून काळ्या आईची सेवा करायची अशी शिकवण होती. त्याचे वडील लखविंदर हे क्रिकेटचे चाहते होते पण त्यांचाही पिंड शेतीचाच होता. लहानगा शुबमन शेतात क्रिकेट खेळायचा याचे त्यांना भारी अप्रूप वाटत.
लखविंदर गिल सांगतात, “वयाच्या तिसऱ्या वर्षात असल्यापासून तो क्रिकेट खेळू लागला. इतर मुले खेळण्यांसाठी हट्ट करत मात्र हा फक्त बॅट आणि बॉल इतकेच मागत. रात्री झोपताना देखील बॅट, बॉल त्याच्यासोबतच असे.”
पोराचे क्रिकेट बद्दलचे प्रेम पाहता, लखविंदर यांनी गावाकडच्या घरावर तुळशीपत्र ठेवत मोहलीकडे कूच केले. पीसीए स्टेडियमच्या अगदी बाजूलाच भाड्याने खोली घेऊन ते कुटुंब राहू लागले. गावातला जमीनदार मोहालीत भाड्याने राहत होता कारण त्याला त्याच्या मुलाला देशासाठी खेळताना पाहायचे होते.
मोहालीत दाखल झाल्यावर शुबमनने पीसीए स्टेडियमवर क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. एकएक फटका असा काही घोटून घेतला की एका चेंडूवर चार-पाच वेगवेगळ्या प्रकारचे फटके मारण्यात तो सक्षम झाला. १६ वर्षाखालील पंजाब संघात पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद द्विशतक झळकावले. पंजाबमधील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत निर्मल सिंग याच्यासमवेत ५८७ धावांच्या सलामीचा विक्रम त्यांने नोंदवला. यात शुबमनचे योगदान होते ३५१ धावांचे. पंजाबच्या क्रिकेट वर्तुळात शुबमनच्या नावाचा डंका वाजू लागला होता. वयाची १७ वर्ष पूर्ण होण्याआधीच, २०१६-१७ विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची पंजाब संघात निवड करण्यात आली. पुढच्या सहा महिन्यात तो पंजाबचा रणजी संघात दाखल झाला होता. अवघ्या दुसऱ्या रणजी सामन्यात शतक झळकावून त्याने क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले.
शुबमनच्या आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ घेऊन आला तो म्हणजे २०१८ एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक. प्रथमश्रेणी क्रिकेटचा अनुभव घेऊन गेलेल्या शुबमनने अख्खी स्पर्धा गाजवली. संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने त्याने सर्व क्रिकेटजगताला स्तब्ध केले. पाच डावात फलंदाजी करताना त्याने, १२४.३० च्या अविश्वसनीय सरासरीने ३७२ धावा काढल्या. यात सलग चार डावात ५० पेक्षा जास्त धावांच्या खेळ्या होत्या. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध उपांत्य सामन्यात शतक झळकावत त्याने भारताला अंतिम फेरीत नेले. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात व दिग्गज राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारत चौथ्यांदा एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकाचा विजेता झाला होता. मालिकावीराचा पुरस्कार शुबमनने आपल्या नावे केला.
युवा विश्वचषकाच्या दरम्यान झालेल्या २०१८ च्या आयपीएल लिलावात अनेक संघांमध्ये शुबमनला आपल्या संघात सामील करून घेण्यात चढाओढ दिसली. किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स यांना पछाडत शेवटी कोलकाता नाईट रायडर्सने एक कोटी ऐंशी लाख अशी किंमत देत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आपल्याला दिलेल्या किमतीवर खरे उतरत शुबमनने सलग दोन आयपीएल हंगाम गाजवले. २०१९ चा सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार त्याने आपल्या नावे केला.
बीसीसीआयने शुबमनवर विश्वास टाकत त्याच्यावर मोठी गुंतवणूक केली. २०१९ च्या देवधर ट्रॉफी स्पर्धेत इंडिया सी व दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ब्ल्यू संघाचे कर्णधारपद शुबमनच्या हाती सोपवले होते. जानेवारी २०१९ पर्यंत शुबमनने अवघ्या १५ डावात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १,००० धावांची वेस ओलांडली.
या दिमाखदार कामगिरीचे बक्षीस म्हणून न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याला दोन सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विराट कोहली, रोहित शर्मा या आपल्या आदर्श खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून तो मैदानावर उभा होता. वडिलांनी केलेल्या त्यागाचे चीज झाले होते. त्याने आतापर्यंत ३ वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना ४९ धावा केल्या आहेत. याखेरीज तो कसोटी संघाचा प्रमुख सलामीवीर बनला आहे. ८ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४१४ धावा चोपल्या आहेत.
शुबमनबद्दल बोलताना विराट कोहली म्हणतो, “ज्याप्रकारे शुबमन फलंदाजी करतो तशी १० टक्के फलंदाजीसुद्धा मी अठराव्या वर्षी करत नव्हतो. भारतीय क्रिकेटमधील पुढचा सर्वात मोठा सितारा निर्विवादपणे शुबमन असेल.”
सध्या शुबमनची भारतीय संघातील जागेसाठी सरळसरळ पृथ्वी शॉ व मयंक अगरवाल यांच्याशी स्पर्धा सुरू आहे. क्रिकेट जगतातील सर्व दिग्गज व समीक्षकांनी शुबमनला विराटनंतर तांत्रिकदृष्ट्या सर्वात सक्षम खेळाडू म्हणून जाहीर करून टाकले आहे. १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सर्वांच्या नजरा शुबमनच्या कामगिरीकडे असतील. शुबमनदेखील कोलकाता नाईट रायडर्सला तिसरे विजेतेपद मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करेल.
वाचा- टीम इंडियात हक्काची जागा न मिळालेला विदर्भाचा धडाकेबाज ढाण्या वाघ
आणि बालपणी ऑटोग्राफ देणाऱ्या क्रिकेटरने पेन नेल्यामुळे ढसाढसा रडलेल्या स्टारची गोष्ट