जेव्हापासून क्रिकेट सुरू झाले, तेव्हापासून क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ असे म्हटले गेले आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या आचरणाद्वारे या खेळाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. क्लॅरी ग्रिमेट यांच्यापासून राहुल द्रविड पर्यंत अनेक खेळाडूंना क्रिकेट इतिहासातील सर्वात सभ्य क्रिकेटर म्हटले गेले. मात्र, चालू दशकातील सर्वात सभ्य क्रिकेटपटू कोण ? असा प्रश्न विचारल्यानंतर १००% क्रिकेट चाहत्यांचे एकच उत्तर असेल ते म्हणजे केन विल्यमसन. न्यूझीलंडच्या या कर्णधाराचा आज वाढदिवस.
८ ऑगस्ट १९९० मध्ये न्यूझीलंडमधील एक सुंदर शहर तौरंगा येथे त्याचा जन्म झाला. केनला, लोगन नावाचा जुळा भाऊ आहे. दोन मिनीटांनी केन लोगोनपेक्षा मोठा आहे. केनच्या घरात खेळाला पूरक वातावरण आधीपासूनच होते. त्याच्या बहिणी व्हॉलीबॉल तर मावसभाऊ रग्बी खेळत. ट्रेंट बोल्ट व डग ब्रेसवेल हे त्याचे शेजारी होते.
२००४-२००८ या काळात ‘तौरंगा बॉईज कॉलेज’ साठी खेळताना त्याने तब्बल ४० शतके झळकावली होती. वयाच्या १७ व्या वर्षीच त्याने नॉर्दन डिस्ट्रिक्ट संघासाठी पहिला प्रथमश्रेणी सामना खेळला. न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावल्याने, २००८ सालच्या मलेशिया येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची न्यूझीलंडच्या कर्णधारपदी निवड झाली. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. मार्च २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी त्याची न्युझीलंड संघात निवड करण्यात आली. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळू शकली नाही.
ऑगस्ट २०१० मध्ये त्याने भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पहिल्या दोन सामन्यात तो एकही धाव बनवू शकला नाही. त्यानंतर त्याने बांगलादेश विरुद्ध आपले पहिले शतक झळकावले. त्यावेळी, न्युझीलंडसाठी सर्वात कमी वयात शतक करण्याचा मान विल्यमसनकडे गेला. त्याचवेळी, २०१० ऑक्टोबरमध्ये भारतात विरुद्धच अहमदाबाद येथे त्याने पहिली कसोटी खेळली. पहिल्याच कसोटीत, १३१ धावांची खेळी त्याने केली. यानंतर, आजतागायत तो न्युझीलंड संघाचा अविभाज्य भाग आहे.
पहिल्या कसोटी शतकानंतर, पुढच्या षटकासाठी त्याला दीड वर्ष वाट पहावी लागली. वेलिंग्टन कसोटीत द. आफ्रिकेने न्यूझीलंडसमोर ३८९ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यावेळी न्यूझीलंडची अवस्था ३२-३ अशी झाली होती. मॉर्कल व डेल स्टेन यांच्या तुफानी गोलंदाजीला सामोरे जात विल्यमसनने संघाच्या २०० धावांपैकी १०२ धावा एकट्याने बनवल्या व सामना अनिर्णित राखला.
पुढे, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंडविरूद्ध अनेक सामन्यात त्याने न्युझीलंडला अविस्मरणीय विजय मिळवून दिले. २०१५ विश्र्वचषकातील न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला १५२ धावांचे आव्हान दिले होते. मिचेल स्टार्कच्या तुफानी गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा डाव कोसळला. मात्र, विल्यमसनने एक बाजू लावून धरली होती. १४६ धावांवर ९ गडी बाद झाले असता, अखेरचा फलंदाज ट्रेंट बोल्ट याला स्ट्राइकपासून दूर ठेवत पॅट कमिन्सला षटकार ठोकत त्याने संघाला विजयी केले.
ब्रेंडन मॅक्युलमने २०१६ मध्ये निवृत्ती स्वीकारल्यानंतर, विल्यमसनने तिनही प्रकारात न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्याच वर्षी, न्युझीलंडने टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. २०१६ मध्ये आयपीएल जिंकणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघात त्याचा समावेश होता. २०१८ आयपीएल मोसमात डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितत हैदराबादचे कर्णधारपद सांभाळत त्याने आपली फलंदाजी व नेतृत्वयाद्वारे हैदराबादला अंतिम फेरीपर्यंत नेले. त्याचवर्षी, आयपीएल मध्ये सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅप विल्यमसनने आपल्या नावे केली.
२०१५ मध्ये विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ आल्यानंतर न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ विश्वचषकात देखील न्युझीलंडच्या हाती निराशाच लागली. विल्यमसनच्या नेतृत्वात न्युझीलंड अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. मात्र, अंतिम सामन्यात सुपर ओवरनंतर सर्वाधिक चौकारांच्या निकषावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. कप्तानी व फलंदाजीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे विल्यमसनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. नुकतेच त्याच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघाने पहिलीवहिली जागतिक कसोटी चँपियनशीपही जिंकली आहे.
मैदानावरील कामगिरी बरोबरच, विल्यमसन आपल्या दानशूर व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. २०१४ मध्ये पाकिस्तानमधील पेशावर येते बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या मुलांसाठी त्याने मदत केली होती. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीत न्यूझीलंडमध्ये तो काम करताना दिसून येत आहे.
ब्रेंडन मॅक्युलमच्या मते, विल्यमसन आपली कारकीर्द संपेपर्यंत न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी खेळाडू असेल. सध्या हा मान मार्टिन क्रो यांच्याकडे जातो.
‘ जेंटलमन्स गेम ‘ मधील या खऱ्या ‘जेंटलमेन’ ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.