---Advertisement---

तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…

---Advertisement---

२०१६ च्या आयपीएलचा लिलाव सुरू होता, चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्सचे निलंबन झाल्यामुळे दोन वर्षासाठी त्यांच्या जागी गुजरात लायन्स व रायझिंग पुणे सुपरजायंट हे संघ सहभागी झाले होते. अनेक बड्या खेळाडूंचे लिलाव उरकल्यानंतर युवा भारतीय फिरकीपटूंचे लिलाव सुरू झाले. या यादीत एक नाव होते एम अश्विन.

क्रिकेट चाहत्यांनी हे नाव कदाचित प्रथमच ऐकले होते. भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज असलेल्या, आर अश्विनशी नामसाधर्म्य असलेल्या तमिळनाडूच्याच एम अश्विन म्हणजेच मुरुगन अश्विनच्या लिलावाला, १० लाख आधारभूत किमतीपासून सुरुवात झाली. हळूहळू जवळपास सर्व संघ त्याच्यासाठी बोली लावत होते. कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांना मागे टाकत मूळ किमतीच्या ४५ पट अधिक किंमत देऊन नव्याने दाखल झालेल्या रायझिंग पुणे सुपरजायंटने ४ कोटी ५० लाख रुपयांना त्याला संघात सामील करून घेतले.

आर अश्विन ज्या महाविद्यालयात शिकत होता त्याच चेन्नईतील श्री शिवसुब्रमण्य नादर कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून एम अश्विन मेकॅनिकल इंजिनिअर या शाखेतून तो पदवीधर झाला आहे. कॉलेजच्या संघाकडून खेळताना दोन्ही अश्विन आपल्या संघाच्या फिरकीची बाजू सांभाळत. रविचंद्रन अश्विन ऑफ स्पिन तर मुरुगण अश्विन गोलंदाजी करत.

२०१२ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूसाठी पदार्पण केलेल्या, मुरुगण अश्विनला पहिली तीन वर्ष म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र, २०१५-१६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धडाकेबाज कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या हंगामात ६ सामन्यात १० बळी मिळवताना त्याची सरासरी सहापेक्षा कमी होती. याच कामगिरीच्या बळावर तो आयपीएलमध्ये करोडपती बनला होता.

एम अश्विनचे आयपीएल पदार्पण एकदम धडाक्यात झाले. मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात आपल्या चार षटकात अवघ्या १६ धावा देत त्याने एक गडी बाद केला. गंमत म्हणजे, मुरुगण अश्विनच्या या देखण्या कामगिरीमुळे वरिष्ठ रवीचंद्रन अश्विनला अवघे एक षटक टाकायला मिळाले. त्यावर्षी, त्याने दहा सामने खेळत सात बळी मिळवले. पुढच्या वर्षी दिल्ली डेरडेव्हिल्सने पुन्हा त्याला करोडपती करत आपल्या संघात सामील केले. खराब कामगिरीमुळे दिल्लीने त्याच्याशी करार मोडला व विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजेस बेंगलोर संघात त्याचे आगमन झाले. आता मागील दोन वर्षापासून तो, किंग्स इलेव्हन पंजाबच्या फिरकीचा भार वाहत आहे.

२०१२ मध्ये प्रथमश्रेणी पदार्पण केले असले तरी तो टी२० स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून पुढे आला आहे. आत्तापर्यंत ५७ टी२० सामने खेळत त्याने, ५५ बळी आपल्या नावे केले आहेत. यामध्ये त्याची सरासरी ७.३ इतकी लाजवाब राहिली आहे.

मुरुगण अश्विन हा एक संपूर्ण ‘फॅमिली मॅन’ म्हणून ओळखला जातो. आपली पत्नी व दोन मुलींची तो काळजी कशाप्रकारे घेतो हे त्याच्या सोशलमीडिया खात्यावरून समजता येते. अतिशय सौम्य स्वभावाचा असलेला मुरुगण क्रिकेट संघात देखील आपल्या टापटीप राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे.

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होईल. अनिल कुंबळे प्रशिक्षक असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला आपले बहुप्रतिक्षित पहिलेवहिले आयपीएल विजेतेपद मिळवायचे असल्यास मुजीब उर रहमानसह अनुभवी फिरकीपटू म्हणून, एम अश्विन जबाबदारी सांभाळावी लागेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---