न्यूझीलंड क्रिकेट आज ज्या स्तरावर आहे, त्याला तिथपर्यंत नेण्यात काही दर्जेदार खेळाडूंचा हातभार लागला आहे. खरंतर न्युझीलंड क्रिकेटचे पहिले सुपरस्टार म्हणून रिचर्ड हॅडली यांच्याकडे पाहिले जाते. पुढे, मार्टिन क्रो यांनी आपल्या उमद्या नेतृत्वाचा जोरावर न्यूझीलंडला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. ख्रिस केन्स, ब्रेंडन मॅक्यूलम, डॅनियल व्हेटोरी, रॉस टेलर व आत्ताचे केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट ही नावे न्यूझीलंड क्रिकेटची ओळख बनली आहेत. २०१० नंतर न्यूझीलंडने जे आक्रमक क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यात, त्यांच्या सलामीवीरांचे मोठे योगदान आहे. ब्रेंडन मॅक्यूलम याच्यासोबत अनेक सलामीवीरांनी न्यूझीलंडसाठी डावाची सुरुवात केली. मात्र, कोणी त्याचा सर्वाधिक यशस्वी ठरला असेल तो म्हणजे मार्टिन गप्टिल.
३० सप्टेंबर १९८६ ला ऑकलंडमध्ये जन्मलेल्या गप्टिलचे प्राथमिक शिक्षण केलस्टोन बॉईज हायस्कूल या ठिकाणी तर पुढील माध्यमिक शिक्षण अवॉन्डेल कॉलेजमध्ये पूर्ण झाले. याच ठिकाणी त्याने, क्रिकेट खेळायला सुरुवात केली. याच कॉलेजच्या मैदानावर त्याने क्रिकेटमध्ये निपुणता मिळवली.
गप्टिल तेरा वर्षाचा असताना, त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. अवजड सामान उचलायची फॉर्कलिफ्ट त्याच्या डाव्या पायावर पडली. डॉक्टरांनी त्याची बोटे पूर्ववत होण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र, या प्रक्रियेत जीवही गमावला जाऊ शकतो म्हणून, त्यांनी त्याची तीन बोटे कापण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गुप्टिलला चालण्यास देखील मनाई करण्यात आली होती. बरे झाल्यावर, घरच्यांनी प्रोत्साहन दिल्याने तो धावू लागला. त्यामुळे आजही त्याला ‘टू टोज’ या टोपण नावाने ओळखले जाते.
दुखापतीतून सावरल्यानंतर, तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दाखल झाला. त्यावेळी त्याला न्यूझीलंडचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने प्रोत्साहन दिले. शालेय स्तरावर त्याने जबरदस्त कामगिरी करत, २००६ च्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघात स्थान पटकावले. विश्वचषकातील कामगिरीच्या बळावर, ऑकलंडसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात तो दुर्दैवी ठरला, पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावात ९९ धावांवर तो बाद झाला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तीन वर्ष तो सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत राहिला. स्टीफन फ्लेमिंग निवृत्त झाल्यानंतर, न्यूझीलंडला एका चांगल्या सलामीवीराची आवश्यकता भासत होती. २००९ मध्ये जेव्हा वेस्ट इंडिज संघ न्यूझीलंड दौर्यावर आला तेव्हा, गप्टिलला एकदिवसीय सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात त्याने, १२२ धावांची शतकी खेळी करत, एकदिवसीय पदार्पणात शतक झळकावणारा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला.
२०११ साली त्याला न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून, रिचर्ड हॅडली पदक मिळाले. त्याच वर्षी तो सर्वोत्तम टी२० खेळाडू ठरला. २०१३ च्या इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्स व साऊथहॅम्पटन वनडेत त्याने सलग शतके ठोकली. तीन सामन्यांच्या मालिकेत ३३० धावा करत त्याने, विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२०१५ विश्वचषक गप्टिलसाठी कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद होऊन देखील ५४७ धावा फटकावत, तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. वेस्ट इंडिज विरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात त्याने २३७ धावांची विश्वविक्रमी खेळी केली. विश्वचषक सामन्यातील ही, सर्वोत्तम खेळी आहे. गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत, पहिला चेंडू खेळणारा फलंदाज देखील गप्टिलच आहे. गप्टिलने कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध शतके करण्याचा पराक्रम सुद्धा केला आहे.
गप्टिल जगभरात व्यावसायिक टी२० लीग खेळत असतो. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, किंग्स इलेव्हन पंजाब व सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील बार्बाडोस ट्रायडंट्स या संघाचा तो काही वर्ष भाग होता.
क्रिकेटमधील एक सभ्य खेळाडू असलेला गप्टिल, कधीही कोणत्याच वादात अडकला नाही. २०१५ व २०१९ अशा सलग विश्वचषकात न्यूझीलंडला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. गुप्टिलने आत्तापर्यंत न्युझीलंडसाठी ४७ कसोटी व १८३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावे अनुक्रमे २,५८६ व ६,८४३ धावा जमा आहेत. न्युझीलंडसाठी त्याने १६ एकदिवसीय शतके ठोकली आहेत. टी२० चा आदर्श खेळाडू असलेला, गप्टिल न्यूझीलंडचा सर्वाधिक टी२० धावा काढणारा फलंदाज आहे. त्याने, ८८ सामने खेळत २,३२५ धावा काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसर्या स्थानी आहे.
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकात गप्टिल न्यूझीलंड संघाचा आधारस्तंभ असेल. आपल्या कारकिर्दीत एक तरी विश्वचषक मिळविण्याचे, स्वप्न तो यावेळी पूर्ण करू शकतो.