८ जूनच्या भर दुपारी बातमी आली, मिताली राज रिटायर झाली. तात्काळ सोशल मीडियावर चेक करून बातमीची सत्यता पडताळून पाहिली. बातमी खरी होती. तब्बल २३ वर्ष अव्याहतपणे भारतीय महिला क्रिकेटला देणाऱ्या मितालीने थांबायचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाची टी२० कॅप्टन हरमनप्रीत कौर असो नाहीतर, आता कुठे वयाची १८ पार केलेली शफाली वर्मा असो, या दोघींची आदर्श हीच मिताली. म्हणजेच या मितालीला पाहून महिला क्रिकेटच्या दोन पिढ्या घडल्या. भारतीय महिला क्रिकेटच्या तीन पिढ्यांसोबत खेळलेली मिताली थांबतेय, हे वाचून महिला क्रिकेट काही क्षणापुरता तरी थांबलंय असंच वाटलं.
आंध्रप्रदेशचे दोराई राज एअरफोर्समध्ये नोकरी करायचे. कामानिमित्त सातत्याने बदली व्हायची. अशात त्यांची बदली झाली जोधपूरला. तिथेच मितालीचा जन्म झाला. लाडाने मीतू म्हटला जाऊ लागल. आईदेखील वर्किंग वुमनच. मितू मोठी होऊ लागली. आईला कथ्थकची फार आवड. आपल्या मुलीने देखील कथ्थक शिकावं असं त्यांना वाटत. मितू सहा वर्षाची झाली आणि आईने कथ्थक क्लासेसला पाठवलं. तिलाही कथ्थक आवडू लागल. मात्र वडिलांची इच्छा थोडी वेगळी होती. कथ्थकला विरोध नव्हता, पण मुलीने एखादा खेळ शिकावा आणि आणखी निर्भिड बनावं हीच माफक अपेक्षा त्यांची होती. अशात मितू आठ-नऊ वर्षाची असताना वडिलांनी तिला भावासोबत समर कॅम्पमध्ये क्रिकेट खेळायला पाठवलं. पहिले काही दिवस तर तिथे जाऊन फक्त बसायची. कारण, तिथ मुली नसायच्याच. एक दिवस संपत कुमार नावाच्या कोचला वाटलं पोरगी रोज येतेय, चार-दोन बॉल द्यावेत तिला खेळायला.
मितूला टेनिस बॉलने बॉलिंग केली गेली. आणि तिच्या टाईमिंगवाल्या शॉटनी कोच खुश झाले. वडिलांना सांगण्यात आलं पोरगी चांगली खेळते तिच्यावर लक्ष द्या. म्हणून वडिलांनी तिला खास अकॅडमीत दाखल केलं. दिवसेंदिवस तिचा खेळ बहरू लागला. दुसऱ्या बाजूला कथ्थकही सुरू होतं. उन्हात क्रिकेट खेळल्यामुळे तिचा चेहरा खराब व्हायचा. एक दिवस कथ्थकची टीचर म्हणाली, “तुझा चेहरा इतका काळवंडलाय तर, मी तुला कॉम्पिटिशनमध्ये कसा भाग घेऊ देऊ?” बस इथेच किक मिळाली आणि मितू क्रिकेटकडे वळली ती कायमचीच.
हेही पाहा- इंडियन क्रिकेटला अनेक सुखद आठवणी देऊन मिताली आज थांबलीये
वयाच्या दहाव्या वर्षी तिचे कोच तिच्या वडिलांना म्हणाले, “तुम्ही मुलाला थोडा मागे ठेवा. मितूसाठी वेळ द्या. हिच्यात खूप स्पार्क आहे. आणखी थोडी मेहनत केली ना, पोरगी चार वर्षात इंडिया खेळेल.” कदाचित वडिलांना आणि स्वतः मितूलाही ही गोष्ट तितकी सिरियस वाटली नसेल. मितालीच आणखी हार्ड ट्रेनिंग सुरू झालं. ती ईंजड झाली तरी कोच तिला रेस्ट करू देत नसायचे. “भविष्यात तू इंजर्ड असशील, पण देशाला तुझी गरज आहे, तेव्हा देखील तू आरामच करणार का?” असा सवाल विचारून तिला ते सरावाला पाठवत. आई-वडील, भाऊदेखील जसा वेळ मिळेल तसे ग्राउंडवर यायचे, आणि तिचा कॉन्फिडन्स वाढवायचे. साडेतीन-चार वर्ष घेतलेल्या या मेहनतीचं फळ मिळालं. अवघ्या १४ वर्षांची असताना १९९७ वर्ल्डकपसाठीच्या संभाव्य संघात तिचं नाव आलं. फायनल टीमपासून ती लांब राहिली पण ही नक्कीच एक मोठी अचिव्हमेंट होती.
दोन वर्षांनी तिला वनडे डेब्यूची संधी मिळाली. या संधीचं शतकी सोनं करत तिने गर्जना केली की, महिला क्रिकेटवर राज करायला मिताली आलीये. २६ जून १९९ चा तो दिवस ते आजचा हा दिवस, यादरम्यान मिताली राज हे नाव फक्त आणि फक्त मोठं होतं आलं, भारतीय क्रिकेटला आणखी मोठं करत गेलं. मेन्स क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने जी जागा कमावली, ती जागा वूमेन्स क्रिकेटमध्ये मितालीन मिळवली. २३ वर्षाच्या या करिअरमध्ये तिने किती रेकॉर्ड केले हे सांगायचं झालं तर, तीन शब्दात इतकंच सांगता येईल, “तिच्या सम तीच.”
२३ वर्ष क्रिकेट खेळून तुझं काय मिळवायच राहील? असा प्रश्न मितालीला विचारलं तर ती उत्तर देईल काहीही नाही… कारण, अगदी विस्डेनपासून पद्मश्री, खेलरत्नपर्यंत सारे पुरस्कार तिच्या कॅबिनेटमध्ये सजलेत. कमालीची लोकप्रियता आणि अगणित आदर मिळालाय. तरीही एक वर्ल्डकप मेडल मितालीच्या गळ्यात पडलं असतं तर, महिला क्रिकेटशीच न्याय झाला असता असं राहूनराहून वाटतं. म्हणतात ना ताजमहालाला कुठेतरी छिद्र आहे, असच हे काहीसं असावं. आज मिताली राजच्या महिला क्रिकेटचा रुपडं बदलणाऱ्या आणि एव्हरेस्ट एवढ्या करियरकडे पाहून इतकंच म्हणू वाटतं की, “क्यू आसमा में सूराख़ हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-