भारतीय क्रिकेट संघासाठी आत्तापर्यंत अनेक खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. काही खेळाडू या खेळाचे महान खेळाडू झाले तर काही विस्मृतीत गेले. काही खेळाडू लोकांच्या तात्पुरत्या स्मरणात राहिले. या अशाच तात्पुरत्या स्मरणात राहिलेल्या काही खेळाडूंपैकी, एक खेळाडू म्हणजे भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार.
२ ऑक्टोबर १९८६ मध्ये उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे त्याचा जन्म झाला. गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्रविणला भारताचा यशस्वी स्विंग गोलंदाज होण्याच्या प्रवासामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रवीण एनकेपी साळवे चॅलेन्जर ट्रॉफी २००७ मध्ये इंडिया रेडसाठी केलेल्या कामगिरीमुळे प्रथम चर्चेत आला.
नोव्हेंबर २००७ मध्ये प्रवीणने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. गोलंदाजीत १० षटकांत ५० धावा दिल्यामुळे त्याचे स्वप्नवत पदार्पण झाले नाही.
प्रवीणने आपल्या कारकीर्दीत अनेक उतार-चढाव पाहिले. परंतु २००८ ते २०१० या कालावधीमध्ये तो सर्वोत्कृष्ट ठरला. कारण त्याने वनडे प्रकारात स्वत: ला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून स्थापित केले. २००८ साली ऑस्ट्रेलियामधील सीबी सिरीजमध्ये प्रवीण केवळ ४ सामन्यांत १० गडी बाद करत भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक झाला. यामध्ये दोन सामन्यात ४-४ बळी मिळवलेले.
वेगवान गोलंदाजीसह नवीन चेंडू स्विंग करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे विरोधी फलंदाजांना हात खोलून खेळता येत नसत. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पहिल्या आयपीएल लिलावावेळी ३००००० अमेरिकन डॉलर देऊन खरेदी केले.
२०१० च्या आयपीएलच्या हंगामात प्रवीणने रॉयल चॅलेंजर्ससाठी मोठी कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सविरूद्ध हॅटट्रिकही साकारली आणि आयपीएलच्या इतिहासातील हॅट्रिक घेणारा सातवा खेळाडू ठरला. २०११ च्या लिलावात कुमार याला किंग्ज इलेव्हन पंजाबने तब्बल ८००.००० अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केले.
तुफान फॉर्ममध्ये असलेल्या प्रवीण कुमारची मायदेशात झालेल्या २०११ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. परंतु, दुर्दैवाने स्पर्धेच्या आधीच दुखापतीने तो संघाच्या बाहेर झाला. प्रवीण कुमारला आजही या गोष्टीचे वाईट वाटते.
२०१३ च्या कॉर्पोरेट कपवेळी ओएनजीसीचे प्रतिनिधित्व करत असताना त्याने, विरोधी संघातील अजितेश अर्गळ याला शिवीगाळ केली. पंचांनी वारंवार ताकीद देऊनही त्याने न ऐकल्याने त्याच्यावर, सामना शुल्कातील शंभर टक्के रकमेच्या कपातीचा दंड आणि विजय हजारे चषकातून निलंबन करण्याची कारवाई केली. पुढे, मार्च २०१३ मध्ये त्याच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले.
प्रवीण याआधी देखील अशा प्रकारच्या वादांमध्ये अडकला होता. २००८ मध्ये मेरठ येथील एका डॉक्टर सोबत त्याची भांडण झाली होती. २०११ च्या इंग्लंड आणि वेस्टइंडीज दौऱ्यावर देखील त्यांनी प्रेक्षकांशी हुज्जत घातली होती. कॉर्पोरेट कप मधील वादानंतर सामनाधिकारी धनंजय सिंग यांनी तो मानसिकदृष्ट्या असंतुलित असल्याचा शेरा दिला होता.
२०१४ आयपीएलच्या लिलावात त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही. मात्र, जखमी झहीर खानचा बदली म्हणून मुंबई इंडियन्सने त्याला संघात सामील करून घेतले.
या काळात रोहित शर्माने त्याला खूप मदत केली. प्रवीण कुमार या गोष्टीसाठी आजही रोहित शर्माचे आभार मानतो.
आयपीएल २०१५ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला २.२ कोटी रुपयात विकत घेतले. २०१७ मध्ये सुरेश रैना याच्या नेतृत्वाखालील गुजरात लायन्सच्या नव्या फ्रँचायझीने प्रवीण कुमारची निवड आपल्या संघात केली.
प्रवीण कुमार आपल्या गळ्यातील भारदार सोन्याच्या साखळीसाठी देखील प्रसिद्ध होता. २५ तोळ्याच्या सोन्याच्या साखळीची तेव्हा किंमत जवळपास आठ लाख इतकी होती. २०१६ विजय हजारे चषकादरम्यान विदर्भ विरुद्ध उत्तर प्रदेश या दरम्यान झालेल्या सामन्यात ती साखळी गहाळ झाल्याचे तक्रार त्याने केली होती.
प्रवीण कुमारने भारतासाठी २००७ ते २०१२ या काळात, ६ कसोटी, ६८ वनडे व १० टी२० सामने खेळले. यामध्ये अनुक्रमे २७, ७७ व ८ बळी आपल्या नावे केले.
सध्या प्रवीणकुमार भारतीय क्रिकेटपासून दूर आहे. प्रवीण कुमारचे स्वप्न आहे की, एक दिवस त्याला भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनायचे आहे.