---Advertisement---

किस्से क्रिकेटचे ७- बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनने घेतली होती शपथ; ऑफ साईडला नाही म्हणजे नाहीच खेळणार

On: मंगळवार, जून 23, 2020 8:11 AM
---Advertisement---

-अतुल वाघमारे

ते वर्ष होते २००३. क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच विश्वचषक. १९९९ नंतर पहिल्यांदा ९० च्या दशकातील मुले हा विश्वचषक बारकाईने पाहत आणि समजून घेत होती. सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील संघाने ते करून दाखविले होते, जे १९८३ च्या कथांमध्ये ऐकले आणि वाचले होते. संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात होता, सामना होता जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट सैन्यांबरोबर म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध. अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेट समालोचनात पाणी चाखलेले हर्षा भोगले यांनी भविष्यवाणी केली होती, की विश्वचषक २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजया आड जर एखादी व्यक्ती उभी असेल, तर ती आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर.

२००३ विश्वचषकात ‘गोल्डन बॅट’नेे फलंदाजी करणारा सचिन अंतिम सामन्यातील पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. भारताचे स्वप्न अर्ध्या सामन्यानंतरच संपुष्टात आले. परंतु आपण पाहणार असलेली कहाणी त्या सामन्याची नाही. तसेच, वरील दिलेली आकडेवारीही त्या सामन्याची नाही.

ही कहाणी आहे त्या विश्वचषकातील अंतिम सामन्याच्या ९ महिन्यांनंतरची. १ जानेवारी, २००४ नवीन वर्ष. भारतीय संघाने कदाचितच आनंद साजरा केला असेल. कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २ जानेवारीपासून सिडनी येथे ऑस्ट्रेलियाबरोबर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना सुरु होणार होता. मालिकेतील पहिला सामना ब्रिसबेनमध्ये अनिर्णित राहिला होता. त्यानंतर ऍडलेडमध्ये तर राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने ईडन गार्डन्समध्ये केलेल्या कारनाम्याची पुनरावृत्ती केली होती. भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर होता. तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत बरोबरी केली होती.

आता सर्वांच्या नजरा चौथ्या कसोटी सामन्यावर होत्या. इतिहासात पहिल्यांदाच असे वाटत होते, की भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच मात देऊ शकतो. कर्णधार गांगुलीने नाणेफेक जिंकत सर्वांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. आणि भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला.

आजकाल हिंदी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणाऱ्या आकाश चोप्राबरोबर तेव्हा विरेंद्र सेहवागने डावाची सुरुवात करत रणशिंग फुंकले होते. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी तब्बल १२३ धावांची धडाकेबाज शतकी भागीदारी रचली. संघाला मजबूत सुरुवात मिळाली होती. वन-डाऊन खेळण्यासाठी तोच फलंदाज आला, जो आजही जगातील कोणत्याही अकरा जणांच्या भारतीय संघात वन- डाऊनचा प्रबळ दावेदार आहे. तो खेळाडू म्हणजेच ‘द’ वॉल राहुल द्रविड. परंतु परदेशात विशेष करुन सेना देशांत जसे आपले फलंदाज मैदानावर जाऊन लगेच परत पव्हेलियनचा रस्ता धरतात येथेही तसंच झालं. तुम्ही म्हणालं सेना म्हणजे काय? आपली ‘ती’ वाली सेना नाही हो. सेना देश म्हणजे दक्षिण आफ्रिका (S), इंग्लंड (E), न्यूझीलंड (N) व ऑस्ट्रेलिया (A). या देशांतील अद्याक्षर घेतले तर होते SENA अर्थात सेना.

असो. तर आपल्या गप्पा पुन्हा रुळावर आणुया. हां, आपले फलंदाज तंबूत परतात विषयावर आपण बोलत होतो. त्या चौथ्या कसोटीतही एका पाठोपाठ एक भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर पव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ झाले. ते मार्गस्थ झाले, तेव्हा संघाचा स्कोर १२८ धावांवर २ बाद असा होता. असं असलं तरीही आता ऑस्ट्रेलियावरील संकट आणखी वाढणार होते. कारण खेळपट्टीवर ते दोन दिग्गज फलंदाज होते, ज्यांनी तेव्हा जवळपास १५००० पेक्षाही अधिक कसोटी धावा जोडल्या होत्या. ते दोन दिग्गज म्हणजेच द्रविड आणि सचिन.

त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक भीती ही सचिनपेक्षा द्रविडची होती. कारण त्यापूर्वी २००१मध्ये कोलकाता येथे आणि त्यानंतर २००३मध्ये ऍडलेड येथे खेळताना त्याने आपला चेहरा शांत, निर्दोष ठेवत गोलंदाजांच्या ज्या काही कतली केल्या होत्या त्या लाजवाब.  अगदी २००४मध्येही  ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना धडकी भरत होती.

तसं पाहिलं तर सचिनसाठी त्यावेळी सर्वकाही व्यवस्थित नव्हते. कारण ३० ऑक्टोबर, २००२ रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडीजविरुद्ध ठोकलेल्या १७६ धावांच्या दीडशतकी खेळीनंतर तब्बल १४ महिने आणि ४२० पेक्षा अधिक दिवसांपर्यंत त्याच्या बॅटमधून केवळ २ अर्धशतक निघाले होते. हा धावांचा वनवास संपता संपत नव्हता. त्यात सचिन संपला अशी ओरडही सुरु झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपत आली होती आणि त्याने ३ कसोटी सामन्यात केवळ ८२ धावाच केल्या होत्या.

सचिन चिंतेत होता. आणि चिंताही काय अशी तशी नव्हती. अशा चिंताग्रस्त अवस्थेत सचिननेच एक शपथ घेतली. माणसाने फारच टेन्शन आलं की तेंडूलकरच उदाहरण समोर ठेवलं पाहिजे. ते का? याचं उत्तर त्याच्या शपथेतवरुन कळेलंच. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी गोष्ट असते, बाहेर जाणारा चेंडू सोडणे आणि एखाद्या तप करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे खेळपट्टीवर तासंतास उभं राहणं. या कामात लिल मास्टर सुनील गावसकर, द्रविड आणि लक्ष्मण यांचा हातखंडा होता.

सचिनलाही पुन्हा एकदा जुन्या लयीत येण्यासाठी अशाच एका तपश्चर्याची आवश्यकता होती. परंतु हे देखील निश्चित आहे, की कोणतीही तपश्चर्या, कोणतेही चिंतन कोणत्या ना कोणत्या कारणास्तव केली जाते. सचिनसाठीही ते कारण फॉर्ममध्ये येणे हे तर होतेच. त्याचबरोबर एक अशी शपथ जसे भीमने पांचालीचे केस दु: शासनाच्या रक्ताने धुण्याचे घेतले होते. सचिनने ही शपथ जगातील सर्वात बलाढ्य संघाविरुद्ध घेण्याचे ठरवले होते. या सामन्याच्या पूर्वी सचिनने आपल्या मोठ्या भावाशी चर्चा केली, तेव्हा त्याच्या भावाने त्याला सांगितले, की तुझे बाद होण्याचे कारण हे खराब शॉट निवडण्याची तुझी पद्धत आहे.

त्यानंतर सचिनने आपल्या भावासोबत सांगून ठेवले होते की, “ठीक आहे मी या कसोटीत कोणताही खराब शॉट खेळणार नाही आणि नाबाद होऊनच परतेल.” १२८ धावांवर दुसरी विकेट पडल्यानंतर जेव्हा सचिन त्या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा त्याच्यासमोर होता ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पी, ब्रेट ली, नॅथन ब्रॅकन आणि स्टुअर्ट मॅकगिल यांसारख्या घातक गोलंदाजांचा ताफा. हे गोलंदाज म्हणजे नक्कीच असे तसे गोलंदाज नव्हते. एकत्र अभ्यास करुन पहिला कोण येतो याची चढाओढ लागलेली ही पोरं. भारतातील स्टार्टअप्सवाल्या पोरांना जेवढ्या आयडीया सुचत नसतील त्यापेक्षा जास्त आयडीया ही चौकड एखाद्या फलंदाजाला बाद करायला वापरायची. 

पक्कं माहित होतं की ऑफ स्टम्पच्या बाहेर बाॅल टाकले की तेंडूलकर गंडणार. आणि या सर्वांनी जे करायचं तेच केलं.  सर्वांनी सचिनला ऑफ स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी केली. सचिनला समजले, की ऑस्ट्रेलियन गोलंदाज त्याला फसवण्यासाठी हे जाळं टाकत आहेत. परंतु हट्टी सचिनने तो डाव अशा अंदाजात खेळला, जसे वर्षानुवर्षे हिमालयातील टेकड्यांवर बसलेला एखादा भिक्षू कोणत्याही अडथळ्याशिवाय तपश्चर्या करत आहे. सचिनने बाहेर जाणारा एकही चेंडू खेळला नाही. कारण त्याने घेतलेली शपथ त्याच्या लक्षात होती.

त्या सामन्यातील आपल्या ६१३ मिनिटे म्हणजेच १० तास आणि १३ मिनिटांच्या खेळीमध्ये सचिनने एकदाही कव्हर ड्राईव्ह मारला नाही. सचिनची ती खेळी पाहून असे वाटत होते, की जणू काही ऑफ साईडच्या क्षेत्ररक्षकांना सुट्टीच दिली आहे. आणि त्यांचे या सामन्यात काहीच काम नाही. त्याच्या या खेळीमुळे १६ वर्षांनंंतरही हा आलेख पाहणारे स्तब्ध होऊन जातात. आलेख म्हणजे इंग्रंजीत फलंदाजीचं wagon wheel म्हणतात ना? हो तेच. इतकेच नव्हे, तर सचिनच्या ६१३ मिनिटांच्या नाबाद २४१ धावांच्या खेळीनंतर भारतीय संघाने ७०५ धावांचा डोंगर उभा केला. आणि जेव्हा गांगुलीने आपला डाव घोषित केला, तेव्हाच सचिनने आपली जागा सोडली. नाहीतर सिडनीच्या त्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडूला हे शक्य नव्हते, की ते सचिनला आपल्या मनाप्रमाणे पव्हेलियनचा रस्ता दाखवू शकतील.

या मालिकेच्या अनेक वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉनेदेखील सामना अनिर्णित राहुनही त्या सामन्यामधील आपला पराभवच एकप्रकारे स्वीकारला होता. तो म्हणाला होता, “त्या डावात सचिन अतुलनीय होता, त्याच्याविरुद्ध आमच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते.” तो सामना वॉ यांच्या कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना होता.

सचिन आपल्या तपश्चर्येमध्ये अशाप्रकारे गुंगून गेला होता, जसे दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याचे यज्ञ भंग करण्याच्या प्रयत्नात मग्न आहेत. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. दुसऱ्या डावात सचिनने १०८ मिनिटे फलंदाजी केली आणि नाबाद ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज त्याला त्याच्या जागेवरून हलवू मात्र शकले नाही. त्या सामन्यात सचिनने कसोटी क्रिकेटमधील अविस्मरणीय खेळी केली होती. तसेच, आपल्या ९००० धावांचा टप्पाही पूर्ण केला होती. तो सामना अनिर्णत राहिला होता.

पुढे जाऊन भारतीय संघाच्या या महान खेळाडूने सर्वाधिक २०० कसोटी सामने आणि सर्वाधिक १५९२१ धावाही पूर्ण केल्या. फलंदाजीतील कोणताही विक्रम उघडून पाहिला, तर त्यामध्ये सचिनचे नाव न चुकता घेतले जाते. म्हणूनच त्याला मास्टर ब्लास्टर म्हटले जाते.

हा लेख तुम्हाला कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा. आमचा ट्विटर आयडी- @Maha_Sports

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---