तुम्हाला संगीत क्षेत्राची थोडीफार जाण असेल तर तुम्हाला हे माहीत असेल की, प्रत्येक शास्त्रीय गायकाचे एक घराणे असते. हा गायक अमुक घराण्याचा, हा गायक तमुक घराण्याचा असे सांगितले जाते. तसं क्रिकेटमध्ये फक्त एकच टीम आहे ज्याला लोक बॅटिंगचा घराणा म्हणतात, ती टीम म्हणजे मुंबई. मुंबई टीमला बॅटिंगचा घराना म्हणण्याचं कारण असे की, अगदी विजय मर्चंट, विजय हजारे या भारतीय क्रिकेटच्या पहिल्या पिढीपासून आजच्या रोहित शर्मा पृथ्वी शॉपर्यंत सारेच दर्जेदार बॅटर मुंबईने दिलेत. बॅटिंगचे मास्टर सुनील गावसकर आणि साक्षात गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरही मुंबईचाच. मुंबई बॅटिंग घराना म्हणा किंवा मुंबई स्कूल ऑफ बॅटिंग म्हणा. इथून आलेले बॅटर तुम्हाला क्वचितच निराश करताना दिसतात. आता त्याच मुंबई स्कूल ऑफ बॅटिंगमधून नवं नाव समोर आलय. ते नाव म्हणजे सुवेद विजय पारकर.
तब्बल ८८ वर्षांचा इतिहास असलेली रणजी ट्रॉफी दोन वर्षांनी होतेय. कोरोनाने दोन वर्ष भारतातील सर्वात प्रतिष्ठित टुर्नामेंट झालीच नव्हती. बरं या रणजीचा बॉस म्हणजे मुंबई. आजवर ४१ वेळा ही ट्रॉफी उंचवायची संधी त्यांना मिळालीय. पण, शेवटच्या वेळी मुंबई ट्रॉफी आलेली २०१५-२०१६ ला. त्यानंतर त्याच्या पुढच्या सीजनची फायनल सोडली, तर मुंबईचा कार्यक्रम पुरता गंडला. रणजी जायंट अशी ओळख असलेल्या मुंबईच्या पदरी सातत्याने अपयश पडत आलं. मात्र, यंदा फाटेल नाहीतर तुटेल या भावनेतून मुंबईची जबाबदारी खांद्यावर घेतली. कॅप्टनच युवा पृथ्वी शॉला केला.
आयपीएल २०२२ मुळे इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी दोन भागात खेळली जाणार होती. लीग स्टेज सक्सेसफुली पार केल्यावर आता क्वार्टर फायनलला मुंबईचा कस लागणार होता. अनुभवी अजिंक्य रहाणे उपलब्ध नव्हता. कॅप्टन शॉ, आयपीएल गाजवणारा यशस्वी जयस्वाल आणि स्वप्नवत ‘रेड बॉल’ फॉर्ममधून चाललेला सर्फराज खान यांच्यावर खऱ्या अर्थाने मुंबईची मदार होती.
हेही पाहा- हिटमॅन आणि लॉर्ड ठाकूरचा गुरुबंधू गाजवतोय रणजीचं मैदान
कर्नाटकच्या अलूर येथे क्वार्टर फायनलमध्ये मुंबईच्या समोर आली उत्तराखंड. मुंबई फेवरेटच होती, पण मॅचमध्ये त्यांनी अक्षरशः वर्चस्व गाजवले. शॉ-जयस्वाल हे लाईमलाईटमध्ये असलेले ओपनर स्वस्तात माघारी गेल्यावर मिडल ऑर्डरवर मोठी जबाबदारी होती. अरमान जाफरने फिफ्टी मारून आपले काम तर केले. त्यानंतर मात्र चौथ्या आणि पाचव्या नंबरवर बॅटिंगला आलेल्या सुवेद पारकर आणि सर्फराज खान यांनी मैफिल लूटली. सरफराजकडून तर अपेक्षा होत्याच. १५३ची इनिंग खेळताना रणजी ग्रेटमध्ये आपलं नाव नोंदवायला सुरुवात केली. ब्रॅडमन यांच्यानंतर सर्वोत्तम ऍव्हरेज सर्फराजचं झालंय.
दुसऱ्या बाजूला आपली डेब्यू मॅच खेळत असलेल्या सुवेदकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, त्याने फक्त सर्वांना खोटे ठरवतंच नाहीतर, आश्चर्याचे धक्क्यावर धक्के देत २५२ ची रेकॉर्डब्रेक इनिंग खेळली. रणजी डेब्यूमध्ये डबल सेन्चुरी मारणारा केवळ दुसरा मुंबईकर. त्यातील गमतीचा भाग म्हणजे, अशी कामगिरी करणारा पहिला मुंबईकर अमोल मुजुमदार त्याचं डग आऊटमध्ये कोच म्हणून हजर होता. सुवेद असं काही खेळत होता की, त्याच्यासमोर आठ बॉलर आणले गेले, पण तो आऊट झाला रन आऊट. तेही मुंबईची सेमीफायनलमधील जागा जवळपास पक्की करूनच.
सुवेद पारकरविषयी सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे, तोदेखील स्वामी विवेकानंद स्कूल बोरीवलीचा विद्यार्थी. स्वामी विवेकानंद स्कूल हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर नकळत रोहित शर्मा येतो. आज टीम इंडियाचा कॅप्टन असलेला रोहित याच शाळेचा विद्यार्थी होता. त्याचेही कोच होते दिनेश लाड आणि सुवेदचेही कोच दिनेश लाडच. लाड सरांचा आणखी एक शिष्य म्हणजे लॉर्ड शार्दुल ठाकुर. जसा शार्दुलला पालघर सोडून मुंबईत येण्याचा सल्ला लाड सरांनी दिला, तसाच स्वामी विवेकानंद हायस्कूल जॉईन कर असा सल्ला त्यांनी सुवेदला दिला. बॅंकर वडील आणि महाराष्ट्रासाठी खो-खो खेळलेल्या सुवेदच्या आईने सुरुवातीला तर, त्याच्या क्रिकेट खेळण्याला थोडा विरोध दर्शविलेला. मात्र, पालकांना कन्व्हेअन्स कसं करायचं हे लाड सरांना चांगलंच जमतं, आणि त्यांनी ते करून दाखवलं.
सुवेदने आत्ता २१ व्या वर्षी रणजी डेब्यू केला असला, तरी मुंबई क्रिकेट सर्कलमध्ये त्याचं नाव अंडर १४ पासून आहे. मुंबईच्या प्रत्येक एज ग्रुपसाठी तो खेळलाय. २०१९ मध्ये इंडिया अंडर नाईन्टीनसाठीदेखील त्याची निवड झालेली. मात्र, त्या युथ एशिया कपमध्ये त्याला जास्त संधीच मिळाली नाही. गेल्यावर्षी लिस्ट ए डेब्यूनंतर आता रणजी कॅप त्याला मिळाली. असं क्वचितच होतं की, रणजी कॅप एखाद्या इंडियन क्रिकेटरच्या हातून मिळते. सुवेदला हे भाग्य लाभलं. कॉमेंट्री करायला आलेले माजी इंडियन क्रिकेटर डब्लूव्ही रमण यांच्या हातून सुवेदला ही कॅप दिली गेलीये. त्याने देखील याच मोल जपत कधीही न विसरता येण्यासारखी कामगिरी करून दाखवली. आता त्याची देखील इच्छा असेल की, यंदा मुंबईला ४२वी रणजी ट्रॉफी मिळवून देत हा आनंद आणखी द्विगुणीत करावा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजीच्या रणांगणात कोण मारणार बाजी? मुंबईकडे ४२वे जेतेपद जिंकण्याची संधी