दिनांक २ जून, २०२२ च्या सायंकाळी केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील, सारे टेनिसप्रेमी आपापले टीव्ही सुरू करून बसले. कारण, मॅच होणार होती वर्षातील दुसऱ्या ग्रँडस्लॅमची फायनल. पॅरिसच्या रोलॅंड गॅरोसवरील लाल मातीच्या कोर्टवर, दोन वेगवेगळ्या पिढ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे दोन टेनिस खेळाडू भिडणार होते. पहिला होता २३ वर्षांचा नॉर्वेचा कॅस्पर रूड. त्याच्या करिअरचीही पहिलीच ग्रँडस्लॅम फायनल, तर दुसर्या बाजूला होता टेनिसचा अनभिषिक्त सम्राट. सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम नावे असलेला, ‘प्रिन्स ऑफ पॅरिस’, क्ले किंग स्पेनचा राफेल नदाल. गुरु शिष्यामधील ही लढाई किती रंगणार याची उत्सुकता उभ्या जगाला होती. कारण, दोन पिढ्यांमधील ही लढाई बरच काही दाखवून देणार होती.
मॅच सुरु झाली आणि तब्बल १३ वेळा फ्रेंच ओपनची ती मानाची ट्रॉफी उंचावलेल्या नदालने अक्षरशा कोर्टवर आपले अधिराज्य गाजवले. पाऊन तासात पहिला सेट जिंकल्यानंतर, दुसरा सेट जिंकायला ही त्याला तितकाच वेळ लागला. दोन सेटने डाऊन झालेल्या रूडने तिसऱ्या सेटमध्ये हत्यारे टाकली आणि अखेर नदालने रोलॅंड गॅरोसवरील, टेनिसवरील आपली हुकूमत कायम राखत २२ वे ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले. तब्बल दोन दशकांच्या आपल्या या टेनिस करिअरच्या शेवटाकडे चाललेल्या नदालने, या विजयासह दाखवून दिले की “हम है यहा के बादशाह, चल हवा येऊ दे.”
अवघ्या दोन दिवसांपूर्वी ३६ वर्षाच्या झालेल्या नदालने आजपर्यंत केलेला हा प्रवास फक्त आणि फक्त प्रेरणादायी असाच आहे. वडील प्रसिद्ध उद्योगपती. काका बार्सिलोनासाठी फुटबॉल खेळलेले. म्हणून पाहिजे त्या क्षेत्रात जायचे त्याला मुभा होती. एवढी सूट दिल्यावर एखादा पोरगा बिघडलं असतं. मात्र, नदालबाबत तसं काही झालं नाही. त्यानं फुटबॉल आणि टेनिस खेळायला सुरुवात केली. दोन्हीत तितकीच गती होती. मात्र, आठव्या वर्षी त्याने एक टेनिस टूर्नामेंट जिंकली, आणि काका टोनी यांनी त्याला टेनिसपटू बनवायचं मनाशी पक्क केलं. कमी वयात चांगले यश मिळवत असताना, स्पेनच्या टेनिस फेडरेशनने त्याला अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग घेण्यासाठी मदत करायचे ठरवले. मात्र, टोनी यांनी त्याला स्पष्ट नकार देत, नदालला घरीच घडवायचं शिवधनुष्य पेललं.
राफेलने काकांचा विश्वास सार्थ ठरवला आणि १५ व्या वर्षी युथ विम्बल्डन जिंकलं. २००३ मध्ये त्याने ग्रँडस्लॅम डेब्यू केला. दोन वर्षात त्याने बरीच प्रगती केली. अखेर २००५ ची फ्रेंच ओपन आली. एकेका महारथीला पराभूत करत नदाल फायनलमध्ये गेला. फायनलमध्ये मारियाने पिएर्टाला मात देत पहिल्यांदा, ‘लाल मातीचा राजा’ बनला नदाल. तिथून पुढे यशाची ही गाडी अशी काही सुसाट सुटली की, कोणाला सापडलीच नाही.
रॉजर फेडरर आणि नदाल यांच्यात टेनिसविश्वावर हुकूमत कोणाची? यासाठी प्रत्येक ग्रँडस्लॅममध्ये लढाई व्हायची. त्यात नोवाक जोकोविचची एन्ट्री झाली आणि कॉम्पिटिशन अजून वाढली. नदालचं वय होतं होत पण त्याच्यातील जुनून कुठेच कमी होत नव्हता. १३ विविध इंजुरीजसोबत तो खेळत राहिला. त्याचा उजवा गुडघा इतका त्रास देत असतो की, ग्रँडस्लॅम आणि गुडघा यापैकी तुला काय हवं?. या प्रश्नाचे उत्तर देताना तो गुडघा म्हणतो.
२०२० मध्ये आयुष्यातील सर्वात कठीण काळातून तो गेला. आता टेनिस सोडून द्यावं असं त्याला वाटलं. दुखापती, कोविड, दुखरा पाय, प्रॅक्टिसची कमी इतक्या साऱ्या समस्या होत्या, पण एकेकाळी दिग्गज टेनिस खेळाडू राहिलेला त्याचा कोच कार्लोस मोया आणि सर्व टीमने त्याला सावरलं. नदालने कमबॅक करण्याचा निर्णय घेतला. २०२२ वर्ष सुरू झालं तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की, नदाल पुन्हा टेनिस कोर्टवर दिसेल. मात्र, वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होतं. रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्या प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम टायटल्सला मागे टाकत, आपले एकविसावे टायटल मिळवून, टेनिस जगतातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिसपटू होण्याचा मान मिळवला… त्यानंतर आता त्यात आणखी एका ग्रँडस्लॅमची भर घालत त्याने आपला औधा वाढवला.
करियर स्लॅमसह २२ टायटल्स, दोन ओलंपिक गोल्ड आणि शंभरावर एटीपी टायटल्स नदालला वेगळ्या लीगमध्ये उभा करतात. रोलॅंड गॅरोसवर ‘कोप डे मॉस्कोटेरीयस’ नावाची, १४ किलोची ट्रॉफी, चौदाव्यांदा उंचावून सगळ्या जगाला दाखवून दिलं की, “अजूनही ईथला बादशहा मीच आहे!”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीसाठी खेळाडूंचं सिलेक्शन होतं तरी कसं, काय खटाटोप करावा लागतो? जाणून घ्या एका क्लिकवर
राजस्थानचा ‘रॉयल’ रियान पराग इतका डोक्यात का जातोय? IPLच्या सामन्यात समालोचकांकडूनही खाल्लाय ओरडा