१९९४ ला त्याने १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध १९ वर्षांखालील भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघात ब्रेट ली, अँड्र्यू सायमंड्स, जेसन गिलेस्पी यांसारखे खेळाडू होते. त्यांच्या विरुद्ध खेळताना त्याने पदार्पणाच्या डावात ८८ धावा केल्या. त्याच्या पुढील सामन्यात त्याने पहिल्या डावात १५१ धावा तर दुसऱ्या डावात ७७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला २२६ धावांनी विजय मिळाला. ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत त्यानं ११०.२५ च्या सरासरीने सर्वाधिक ४४१ धावा केल्या होत्या. तेव्हापासून त्यानं ऑस्ट्रेलिया संघाशी घेतलेला पंगा पुढेही कायम ठेवला. तो खेळाडू म्हणजे वांगीपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण म्हणजेच व्हीव्हीएस लक्ष्मण.
१ नोव्हेंबर १९७४ ला जन्मलेला लक्ष्मण लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमीही शिक्षणाला महत्त्व देणारी. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर. विशेष म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे लक्ष्मणचे पणजोबा. त्यामुळे त्याचीही वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण याबरोबरच तो लहानपणापासून त्याचे मामा बाबा कृष्णमोहन यांना क्रिकेट खेळताना आवडीने पाहायचा. ते हैदराबादमध्ये क्लब क्रिकेटर होते. बाबा कृष्णमोहन यांनीच टेनिस-बाॅल क्रिकेट खेळत असताना लक्ष्मणमधील प्रतिभा हेरली. त्यामुळे त्यांनी लक्ष्मण केवळ सात वर्षांचा असताना त्याला सेंट जॉन कोचिंग कँपमध्ये दाखल केले.
लक्ष्मण क्रिकेट आणि शिक्षण दोन्ही उत्कृष्टरित्या सांभाळत होता. त्याला कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे नव्हते. फेब्रुवारी १९८७ मध्ये लक्ष्मणने वयोगटातील क्रिकेट खेळत असताना पहिले शतक केले. १३ वर्षाखालील गटात खेळताना त्याने हैदराबादकडून आंध्रप्रदेश विरुद्ध विजयवाडा येथे झालेल्या सामन्यात १५३ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने १० वीला असताना तब्बल ९८ टक्के गुण मिळवले होते. पुढे त्याच्यासाठी असा क्षण आला की जेमतेम १८ वर्षांचा असताना त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षा द्यायची की १९ वर्षांखालील संघासाठी राष्ट्रीय कोचिंक कॅम्पमध्ये स्थान मिळवायचे, यातील एक गोष्ट निवडावी लागणार होती. त्यावेळी त्याने ठरवले की क्रिकेटसाठी ४ वर्षे द्यायची आणि जर यात काही झाले नाही तर पुन्हा वैद्यकीय क्षेत्राकडे वळायचं. त्या निर्णयासाठी त्याला त्याच्या पालकांचाही पाठिंबा मिळाला.
लक्ष्मणने त्यानंतर १९९२-९३च्या रणजी मोसमात हैद्राबाद संघाकडून पंजाबविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. तो हैदराबादकडून पंजाबविरुद्ध खेळताना पहिल्या डावात शुन्यावर तर दुसऱ्या डावात १७ धावांवर बाद झाला. त्याच्या पुढच्या मोसमात तो केवळ १ सामना खेळू शकला. पण त्यानंतर त्याला १९९४-९५ च्या मोसमात दक्षिण विभागाकडून दुलिप ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. त्यातून त्याने सर्वांना प्रभावित करत १९९४ ला १९ वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळवले. त्याचमोसमात त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ५ सामन्यात ७६ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या. त्याच्या पुढच्या मोसमातही त्याची अशीच चमकदार कामगिरी राहिली. त्याने १९९५-९६ च्या मोसमात ७७५ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला इराणी कपमध्ये शेष भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.
तसेच पुढे नोव्हेंबर १९९६ ला त्याने अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याचे पदार्पणही चांगले झाले. त्यात त्याने पहिल्या डावात ११ धावा केल्या. तर दुसऱ्या डावात कठीण खेळपट्टीवर खेळत त्याने ५१ धावा केल्या. त्याच्या या खेळीने भारताच्या ६४ धावांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. १९९६ वर्ष हे भारतासाठी खूपच लाभदाय ठरले. कारण लक्ष्मणने पदार्पण करण्याआधी द्रविड, गांगुली, प्रसाद हे हिरे देखील भारताला याचवर्षी सापडले होते. त्यांच्यात आता लक्ष्मणची भर पडली.
सुरुवातीला लक्ष्मणच्या संघातील क्रमांकांमध्ये बरेच बदल करण्यात आले. त्याने १९९७ ला तर सलामीवीर म्हणूनही फलंदाजी केली. त्याने पहिल्यांदा वेस्ट इंडीज विरुद्ध सलामीला फलंदाजी केली. पण त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली. परिणामी त्याला संघातील जागा गमवावी लागली. त्यानंतर जवळ जवळ १ वर्षाने त्याने पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुनरागमन करताना त्याने पहिल्याच डावात ९५ धावांची खेळी केली. मात्र त्याचे शतक हुकले. विशेष म्हणजे लक्ष्मण कसोटी पदार्पण केल्यानंतर अर्धशतकापर्यंत मजल मारत होता पण ३ वर्ष झाले तरी त्याला शतकी खेळी करता आली नव्हती. तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही खोऱ्याने धावा करत होता. त्याने १९९९-०० च्या मोसमात तर रणजीमध्ये १४१५ धावा केल्या. ज्या रणजीच्या एका मोसमात एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. असे असतानाही कसोटीमध्ये मात्र लक्ष्मणला त्याच्या पहिल्या शतकाची प्रतिक्षा होती. अखेर तो दिवस आला. त्याने १७ कसोटी सामने खेळल्यानंतर त्याच्या आवडत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध म्हणजेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिले कसोटी शतक केले. त्याने जानेवारी २०००मध्ये सिडनी कसोटीत १९८ चेंडूत १६७ धावांची खेळी करत पहिले कसोटी शतक झळकावले. त्याच्या पुढचं वर्ष लक्ष्मणसाठी आयुष्य बदलवणारं वर्ष ठरलं.
२००१ ला ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात कसोटी मालिकेतील मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत आघाडी घेतली होती. तसेच कोलकता कसोटी भारताला फॉलोऑन दिला होता. पण फॉलोऑन मिळण्याआधी लक्ष्मणने पहिल्या डावात ५९ धावा करत एकाकी झुंज दिली होती. पण त्याच्या या लढाईनंतरही भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. पण त्यानंतर दुसऱ्या डावात लक्ष्मणला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. लक्ष्मण चांगल्या फॉर्ममध्ये होता. तो सामन्याचा दुसरा दिवस होता. त्याने द्रविडच्या साथीने त्यादिवशी डाव सांभाळला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सर्वांना वाटले भारत हा सामना हरणार पण द्रविड-लक्ष्मणच्या जोडीने कमाल केली. त्यांनी ३७६ धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा होता. त्यावेळी लक्ष्मणने २८१ आणि द्रविडने १८० धावा केल्या होत्या. हा विजय भारतासाठी दिशा देणारा ठरला. कोणत्याही परिस्थितीत आपण लढू शकतो हा विश्वास त्या सामन्याने दिला, असे लक्ष्मण म्हणतो. विशेष म्हणजे या विजयामुळे भारताने स्टिव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाची सलग १६ विजयांची मालिका खंडीत केली होती. लक्ष्मणने केलेल्या त्या खेळीबद्दल गांगुली आजही म्हणतो, लक्ष्मणच्या त्या खेळीने माझी कर्णधार म्हणून कारकिर्द वाचवली.
त्यावेळीचाच एक किस्सा ऍडम गिलख्रिस्टने एका मुलाखतीत सांगितला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया हा सामना आपण तिसऱ्याच दिवशी सहज जिंकू आणि मग मालिकाही खिशात घातल्याचा जल्लोष करु असे स्वप्न पाहत होती. त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने सिगारेटही आणून ठेवली होती. पण घडले उलटेच लक्ष्मण-द्रविडने ऑस्ट्रेलियन संघाला फक्त शारिरिक दृष्याच नाही तर मानसिकरित्याही दमवले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाला आज काय झाले हे कळालेच नव्हते.
Here's wishing one of #TeamIndia's most stylish batsmen, @VVSLaxman281 a very happy birthday 🎂🍰
On his special day, relive his 'very very special' knock of 281 against Australia #HappyBirthdayVVSLaxman pic.twitter.com/72e2ZwCD90
— BCCI (@BCCI) October 31, 2019
लक्ष्मणच्या रुपाने भारताला भरवशाचा मधल्या फळीतील फलंदाज मिळाला होता. सेहवाग, सचिन, गांगुली, द्रविड यांच्या नंतर तो यायचा आणि भारताला सांभाळायचा. तेव्हा फिनिशर ही संकल्पना कितपत मानली जात होती माहित नाही. पण फिनिशर म्हणजे काय किंवा त्याची भूमिका काय हे त्याने दाखवले. त्याने पुढेही आशा अनेक खेळी केल्या. २००२ ला कोलकाता येथेच वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन बरोबरची त्याची २१४ धावांची भागीदारी असो किंवा २००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात द्रविड आणि सचिन बरोबर कसोटी सामन्यांमध्ये केलेली त्रिशतकी भागीदारी असो. लक्ष्मण नेहमीच जम बसला की गोलंदाजांना सुट्टी देत नसे. २००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील लक्ष्मणची कामगिरी पाहुन इयान चॅपेल यांनी त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ असे टोपननाव दिले होते.
२००५ ला मुंबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात एकाच दिवशी २० विकेट्स गेल्यानंतरही हिमतीने उभ्या राहिलेल्या लक्ष्मणने ६९ धावांची खेळी केली होती आणि भारताला विजय मिळवून दिला होता. लक्ष्मणने ऑगस्ट २०१० ला कोलंबो येथे भारतीय संघ चौथ्या डावात २५७ धावांचा पाठलाग करत असताना ६२ वर ४ विकेट अशा परिस्थितीत होता. त्यावेळीही लक्ष्मण संघासाठी उभा राहिला त्याने नाबाद १०३ धावा करत संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला. एवढेच नाही, त्याच्या पुढच्याच २ महिन्यात त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहाली येथे चौथ्या डावात २१६ धावांचा पाठलाग करताना अशीच कामगिरी केली होती. तेव्हा तर भारत १२८ धावांवर ८ बाद अशा वाईट अवस्थेत होता. त्यावेळीही लक्ष्मणनेे जबाबदारी घेतली. पण दुखापतीमुळे त्याला पळता येईना. म्हणून त्याने रनर घेतला. रनर होता सुरेश रैना. लक्ष्मणने पहिल्यांदा इशांत शर्माला साथीला घेतले. पण इशांत ३१ धावा केल्यानंतर बाद झाला. भारताचे टेंशन आता वाढले होते. त्यावेळी प्रज्ञान ओझा शेवटचा फलंदाज त्यात त्याच्यात आणि रैनामध्ये एकेरी-दुहेरी धावा घेताना एक दोनदा गोंधळ झालेला. त्यामुळे एरवी अगदी शांत असणारा लक्ष्मणही तापलेला. पण अखेर लक्ष्मणने एवढे असतानाही नाबाद ७३ धावा करुन भारताला केवळ १ विकेटने विजय मिळवून दिला होता. त्यावेळी त्याला गॉड ऑफ फोर्थ इनिंग का म्हणतात हे त्याने दाखवून दिले होते.
याच कालावधीत लक्ष्मणच्या कारकिर्दीतील एक प्रसिद्ध असलेला गमतीशीर किस्सा म्हणजे, २००६ ला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एका कसोटी सामन्यादरम्यान लक्ष्मणच्या अंघोळीमुळे भारतीय संघाची फजिती झाली होती. झाले असे की लक्ष्मणला फलंदाजी करण्याआधी अंघोळ करण्याची सवय होती. भारताकडून फलंदाजीला लक्ष्मणला ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला जावे लागायचे. सलामीला जाफर, सेहवाग होते. नंतर द्रविड, सचिन तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर जायचे. नंतर लक्ष्मणचा क्रमांक यायचा मग गांगुलीचा. पण त्यावेळी नेमके सेहवाग, जाफर लवकर बाद झाले आणि तेव्हा पंचांनी सचिनला फलंदाजीला जाण्यापासून रोखले. कारण सचिन आदल्यादिवशी काहीवेळासाठी मैदानाबाहेर होता. त्यामुळे त्याला नियमानुसार लगेच फलंदाजीला जाता येणार नव्हते आणि लक्ष्मण तर अंघोळ करत होता. त्यामुळे गोंधळ उडाला. हरभजनने लक्ष्मणला आवाज दिला पण त्याला तो मस्ती करतोय असे वाटले अखेर जेव्हा सचिनने सांगितले तेव्हा लक्ष्मणला गंभीरता लक्षात आली. तोपर्यंत गांगुलीला सर्वांनी मिळून तयार करुन घाईघाईने फलंदाजीला पाठवले होते. तेव्हा गांगुली लक्ष्मणवर भडकला होता.
कसोटीत भरवशाचा खेळ करणाऱ्या लक्ष्मणला वनडेत मात्र म्हणावे तशी संधी मिळाली नाही. कारकिर्दीत १३४ कसोटी सामने खेळणाऱ्या लक्ष्मणला केवळ ८६ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे १६ वर्षांच्या कारकिर्दीत तो एकदाही विश्वचषकात खेळलेला नाही. लक्ष्मणला २००३ नंतर वनडेत जास्त संधी न देणे ही चूक झाल्याचंही एकदा गांगुलीने मान्य केलं होतं. २००३ च्या विश्वचषकातही त्याला संधी मिळाली नाही. लक्ष्मणसाठी हा वाईट काळ होता. त्यामुळे त्यावेळी तो जेव्हा त्याच्या मित्रांबरोबर यूएसएला फिरायला गेला होता तेव्हा त्याने क्रिकेट थांबवण्याचाही विचार केला होता. पण नंतर त्याने स्वत:ला समजावत तो निर्णय बदलला. तो एक चांगला खेळाडू असतानाही २००३ चा विश्वचषकासाठी संधी न मिळाल्याबद्दल गिलख्रिस्टनेही आश्चर्य व्यक्त केले होते.
वनडेत जरी संधी मिळत नसली तरी लक्ष्मण कसोटीत कमाल करत होता. दम बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या हैद्राबादमध्ये राहुनही पुर्ण शाकाहारी असलेला लक्ष्मण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची मात्र कच्ची शिकार करायचा. त्याने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना २९ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ४९.६७च्या सरासरीने २४३४ धावा केल्या. तर वनडेत २१ सामन्यांत ४६.१८च्या सरासरीने ७३९ धावा केल्या. विशेष म्हणजे त्याच्या १७ कसोटी शतकांपैकी ६ कसोटी शतके आणि ६ वनडे शतकांपैकी ४ शतके त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केली आहेत. तसेच त्याच्या कसोटीतील दोन्ही द्विशतकेही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातच केली आहेत. पण असे असले तरी मैदानाबाहेर मात्र त्याची ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी चांगली मैत्री होती. साधरण २००८नंतर मंकीगेट प्रकरणामुळे अँड्र्यू सायमंड्स वैगरे खेळाडूंशी भारतीय खेळाडूंचे संबंध बिघडलेले होते. पण लक्ष्मणची त्यांच्याशी असलेली मैत्री कायम होती.
Scorer of 8,781 Test runs for India, he shined against Australia with 2,434 runs and 2 double centuries – Happy Birthday to @VVSLaxman281! pic.twitter.com/G8nMbnAfM8
— ICC (@ICC) November 1, 2016
लक्ष्मण २०१० पर्यंत चांगल्या लयीत होता. मात्र त्यानंतर त्याची कामगिरी खालवली. पण त्याला अजून संघातून काढून टाकण्यात आले नव्हते. पण लक्ष्मणने ऑगस्ट २०१२ मध्ये अचानक निवृत्तीची घोषणा केली. त्याने ही घोषणा न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी काही दिवस बाकी असताना केली. त्याचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेशही झाला होता. विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामना त्याच्या घरच्या मैदानावर हैद्राबाद येथे होणार होता. पण त्याआधीच त्याने ही निवृत्तीची घोषणा केल्याने त्यावेळी अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी धोनीला संपर्क न झाल्याने आणि निवृत्तीनंतर त्याला पार्टिसाठी न बोलवल्याने लक्ष्मणने निवृत्ती घेतली अशी बरीच चर्चा झाली होती.
पण अखेर या घटनेबद्दल लक्ष्मणने त्याच्या 281 अँड बियॉन्ड या आत्मचरित्रामध्ये खूलासा केला. त्याने लिहिले आहे, ‘मी फक्त धोनीलाच नाही तर त्यावेळी जेवढ्या खेळांडूबरोबर मी खेळलो त्या सर्वांना मी फोन केले होते. तसेच माझ्या कारकिर्दीत ज्यांचेही योगदान होते त्या सर्व प्रशिक्षक, मित्र अशा सर्वांना फोन केले होते.’
‘पण जेव्हा मी मीडियामध्ये माझ्या निवृत्तीची घोषणा केली तेव्हा मला तूझ्या संघसहकाऱ्यांना याची माहिती दिली आहे का? असा प्रश्न विचारणयात आला. तेव्हा मी हो असे म्हटलो. नंतर मला धोनीशी बोलला का असे विचारले, त्यावर मी गमतीने म्हटलो होतो की सर्वांना माहित आहे धोनीपर्यंत पोहोचणे किती आवघड आहे. पण त्यानंतर माझ्या लक्षात आले की यामुळे वाद आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. माझ्या कारकिर्दीतील हा पहिला आणि एकमेव वाद होता.’
‘मी चूकून मीडियाला खाद्य पुरवले होते. ज्यामुळे त्यांनी मी धोनीवर नाराज आहे म्हणून निवृत्ती घेतली असा अर्थ घेतला.’
VVS Laxman on MS Dhoni in his latest book. pic.twitter.com/1z2OdZAJI4
— The Dhoni Mantra (@MahiNation) November 18, 2018
लक्ष्मणने निवृत्ती घेतल्यानंतरही क्रिकेटमध्ये योगदान सुरु ठेवले. तो सध्या एनसीएचा अध्यक्ष असून भारताचा प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहतो. त्याने सनरायझर्स हैद्राबाद संघाचा तसेच बंगाल संघाचा फलंदाजी मार्गदर्शन म्हणूनही काम केले. त्याचबरोबर तो सचिन, गांगुलीसह बीसीसीआयच्या सल्लागार समीतीतही होता.
लक्ष्मण हा कायमच वरची फळी कोलमडली तरी भरवशाचा फलंदाज म्हणून मैदानात उतरायचा. सचिन, द्रविड, सेहवाग, गांगुली यांच्यानंतर तो फलंदाजीला यायचा आणि त्याचा शांततेच पण स्टायलिश खेळ करत सर्वांना प्रभावित करायचा. तो खरंच भारतासाठी व्हेरी व्हेरी स्पेशल होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
याच लेखमालेतील अन्य लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला