भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. क्रिकेटच्या मैदानात असो किंवा मैदानाच्या बाहेर रिषभ पंत नेहमीच चर्चेत असतो. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रिषभ यशाच्या शिखरावर आहे. परंतु, हे सर्व मिळवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
रिषभ पंतने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अवघ्या ४ वर्षांच्या कालावधीत त्याला भरघोस यश मिळाले आहे. परंतु, अनेक टीकांचा देखील सामना करावा लागला आहे. यष्टीरक्षक एमएस धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर रिषभला धोनीचा उत्तराधिकारी म्हटले जात होते. परंतु, खराब फॉर्ममुळे त्याला अनेकदा संघातून स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली.
क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी केला आहे २०७ किमीचा प्रवास
रिषभ पंतला लहानपणापासूनच क्रिकेटचे प्रचंड वेड होते. बहुतांश लोकांना माहीत नसेल की, दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या खेळाडूचा जन्म उत्तराखंडच्या रूडकी गावामध्ये झाला होता. रिषभ पंत जेव्हा अवघ्या १२ वर्षांचा होता, तेव्हा त्याची आई सरोज या दर आठवड्याच्या शेवटी त्याला २०७ किमी प्रवास करत रुडकीहून दिल्लीला सराव करण्यासाठी घेऊन जायच्या. रिषभ पंतनेही आपल्या आईची मेहनत वाया जाऊ दिली नाही, ज्याचे फळ आता दिसून येत आहे.
हे दोघेही रुडकीहून दिल्लीला सराव करण्यासाठी यायचे. परंतु, दिल्लीमध्ये त्यांना राहायला घर नव्हते. त्यावेळी हे दोघेही गुरुद्वारात राहायचे. पंत आपली ट्रेनिंग करण्यासाठी मैदानात जायचा. त्यावेळी त्याची आई गुरुद्वारात सेवा करत असे. तो सरावाला जाण्यापूर्वी लंगराचा प्रसाद खाऊन जात असे. त्यानंतर त्याने उत्कृष्ट कामगिरी करायला सुरुवात केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याने दिल्लीमध्ये भाड्याने घर देखील घेतले होते.
सुरुवातीच्या काळात इतका संघर्ष करणाऱ्या रिषभ पंतने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तो एकमेव भारतीय यष्टीरक्षक फलंदाज आहे, ज्याने आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादविरुद्ध विजयानंतर दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…
एफसी गोवाने जिंकला ऐतिहासिक ड्युरंड कप; कर्णधार बेदिया ठरला अंतिम सामन्याचा नायक
आरसीबीविरुद्ध तळपतेच राहुलची बॅट; असा कारनामा करणारा आहे एकमेव फलंदाज