१९ सप्टेंबर २००७
पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील साखळी सामना. भारत प्रथम फलंदाजी करत होता. १८ व्या षटकाच्या समाप्तीपर्यंत भारताची धावसंख्या होती १७१-३. इंग्लंडचा कर्णधार फ्लिंटॉफ आपले षटक संपवून क्षेत्ररक्षणासाठी जात असताना, फॉर्मात असलेल्या युवराजला काहीतरी बोलला अन् दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. धोनीने युवराजला समजावत बाजूला घेतले. मात्र, युवराजच्या डोक्यात अजून राग होता.
पुढचे षटक टाकण्यासाठी युवा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आला. त्याला माहीत नव्हते की, फ्लिंटॉफने घेतलेल्या पंग्याची किंमत त्याला चुकवावी लागणार आहे. युवराजने रागाच्या भरात ब्रॉडला सलग सहा षटकार ठोकले. २१ वर्षाचा कोवळा ब्रॉड अक्षरशा रडला.
इंग्लंडचा माजी दिग्गज सलामीवीर ख्रिस ब्रॉड याचा मुलगा असलेल्या स्टुअर्टने २००६ मध्ये, पाकिस्तान विरुद्ध वनडे आणि टी२० मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले होते. वेगवान गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी अशा दुहेरी कौशल्यामुळे त्याला संघात जागा मिळाली होती. अगदी १७-१८ वयातच तो इंग्लिश क्रिकेटमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला होता.
युवराजने मारलेल्या सलग सहा षटकारांमुळे एखादा गोलंदाज खचून गेला असता पण ब्रॉडने त्या घटनेनंतर स्वतःला अजून कणखर बनवले. यामध्ये संघ व्यवस्थापन आणि कुटुंबाचा फार मोठा वाटा राहिला. पुढील दीड वर्षाच्या काळात ब्रॉडने श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्युझीलँड आणि भारत यांच्याविरुद्धच्या मालिका चांगल्याच गाजवल्या.
प्रत्येक इंग्लिश खेळाडूचे स्वप्न असते तसे ब्रॉडचे देखील ऍशेस खेळण्याचे स्वप्न २००९ मध्ये पूर्ण झाले. आपल्या पहिल्याच ऍशेस मालिकेत ब्रॉडने इंग्लंडसाठी सर्वाधिक १८ बळी घेतले. सोबतच, २२४ धावा जमवत, आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शनही घडवले. ती मालिका जिंकत इंग्लंडने ऍशेस आपल्याकडे राखली होती. २००९ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील तो, सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
२०११ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आला असता, ब्रॉडने चार सामन्यात २३ बळी आपल्या नावे केले. यात पहिल्या कसोटीत घेतलेल्या हॅट्रिकचा देखील समावेश होता. ब्रॉडच्या कामगिरीचा आलेख चढत होता. जवळपास सर्व संघांविरुद्ध तो वर्चस्व गाजवत. अनेक रथी-महारथी त्याच्यासमोर गुडघे टेकत. अशातच २०१४ मध्ये, त्याची इंग्लंडच्या टी२० संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. २०१४ टी२० विश्वचषकात देखील तो इंग्लंडचा कर्णधार राहिला. याच वर्षी तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळताना दिसला.
त्यानंतर मात्र ब्रॉडच्या कारकिर्दीतील एक वाईट काळ सुरू झाला. सततच्या दुखापती व खराब फॉर्ममुळे तो संघापासून काहीसा दूर गेला. पण, पुन्हा त्याने पुनरागमन केले. २०१५ विश्वचषकात इंग्लंडचा मानहानीकारक पराभव झाल्याने वरिष्ठ खेळाडूंची एकेक करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून गच्छंती करण्यात आली. ब्राॅडदेखील यामध्ये समाविष्ट होता. २०१६ मध्ये त्याने आपला अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.
२०१६ नंतर जेम्स अँडरसनसोबत मिळून ब्रॉडने पूर्णपणे कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. या दुकलीने गोलंदाजीतील अनेक विक्रम आपल्या नावे करायला सुरुवात केली. इंग्लंडच्या संघाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचविण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. दोघांनी एकत्रितपणे खेळताना, १००० हून अधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या, विस्डेन चषक कसोटी मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यातील आजच्या पाचव्या दिवशी(२८ जुलै) ब्रॉडने इतिहास रचला. ब्रॉडने आज कसोटी कारकिर्दीतील ५००वी विकेट्स घेण्याचा कारनामा केला. वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट त्याची ५००वी विकेट ठरला. अशी कामगिरी करणारा तो जगातील ७ वा तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचा दुसराच गोलंदाज आहे. १३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने १४० व्या कसोटीत हा टप्पा पार केला. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत तो जेम्स अँडरसननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
दिग्गजांच्या मते, ब्राॅड ५०० बळी घेणारा अखेरचा वेगवान गोलंदाज ठरू शकतो. अजून तीन-चार वर्ष खेळण्याची क्षमता असल्याने तो अनेक विक्रम आपल्या नावे जमा करेल अशी खात्री अनेकांना आहे.
ट्रेंडिंग लेख –
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ५: लक्ष्मणची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळी
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती
वाढदिवस विशेष- ४९ वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…
महत्त्वाच्या बातम्या –
२०२३ विश्वचषकासाठी आयसीसीने केली सुपर लीग टूर्नामेंट लाँच; भारताव्यतिरिक्त हे संघ करणार क्वालिफाय
कसोटी क्रिकेट खेळलेल्या ३०१३ फलंदाजांमध्ये असा नकोसा विक्रम आज झाला क्रेग ब्रेथवेटच्या नावावर
कोणत्या गोलंदाजाने कोणत्या वर्षात घेतली आपली ५००वी विकेट, वाचा थोडक्यात