भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. परंतु २००७मध्ये टी२० विश्वचषकात त्याने जो कारनामा केला होता, तो कदाचित कोणताही चाहता विसरणार नाही.
युवराजने पहिल्या टी२० विश्वचषकात इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते. त्या घटनेच्या आठवणीबद्दल सांगताना युवराज म्हणाला की, त्या सामन्यानंतर ब्रॉडच्या वडिलांनी त्याला म्हटले की, तू माझ्या मुलाची कारकीर्द संपविली आहेस.
युवराजने बीबीसीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, “अँड्र्यू फ्लिंटॉफने (Andrew Flintoff) मला चिडवले होते. त्यामुळे मला राग आला होता. फ्लिंटॉफ मला काहीतरी म्हणाला त्यावर मी त्याला उत्तर दिले होते. यानंतर मी ब्रॉडच्या ६ चेंडूवर ६ षटकार ठोकले होते. त्यावेळी मी आनंदी होण्याचे कारण म्हणजे, इंग्लंडच्या अष्टपैलू दिमीत्री मैस्करेनहासने (Dimitri Mascarenhas) एका सामन्यात माझ्या गोलंदाजीवर एकाच षटकात ५ षटकार ठोकले होते.”
“यावेळी मी विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ब्रॉडच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला, तेव्हा मी फ्लिंटॉफकडे पाहिले. त्यानंतर मैस्करेनहासकडे पाहिले. तो माझ्याकडे पाहून हसत होता,” असेही युवराज पुढे म्हणाला.
ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड (Chris Broad) त्या सामन्याचे सामना रेफरी होते. युवराजने सांगितले की, “ख्रिस ब्रॉड मला म्हणाले की, तू माझ्या मुलाची कारकीर्द जवळपास संपविली आहेस. आता तू त्याच्यासाठी शर्टवर सही कर.”
याबद्दल बोलताना युवराज म्हणाला की, “मी ब्रॉडला एक जर्सी दिली होती. ज्यावर मी एक मेसेज लिहिला होता. तो असा की, मला सुद्धा सलग ५ षटकार मारण्यात आले होते. त्यामुळे मला माहिती आहे की, तुला कसं वाटत असेल. तुला भविष्यासाठी शुभेच्छा.”
जरी युवराजने ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ षटकार मारले असतील. परंतु असे असले तरीही इंग्लंडचा संघाने ब्रॉडवर विश्वास ठेवला. पुढे ब्रॉडने मेहनत केली आणि आज तो इंग्लंडचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे.
ब्रॉडने आतापर्यंत १३८ कसोटी सामने, १२१ वनडे सामने आणि ५६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीच त्याने २८.५० च्या सरासरीने ४८५ विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेत ३०.१३ च्या सरासरीने १७८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२०त २२.९३ च्या सरासरीने ६५ विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रॉड सध्या केवळ कसोटी क्रिकेटमध्येच खेळताना दिसतो. तर ख्रिस ब्राॅड यांनी ५२९ सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.