कोलंबोमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चांगलेच लक्ष आहे. या सामन्यात आतापर्यंत तीन खेळाडूंना आयसीसीने शिक्षा दिली आहे. त्यातील एक भारतीय खेळाडू आहे. तसेच त्याआधी श्रीलंका अ संघाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी एका वादात सामील झाला होता. त्या दोघांना दिलेल्या शिक्षा अपुऱ्या होत्या, असे भारताच्या माजी खेळाडूने आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यावर टीका करत विनंतीही केली आहे.
माजी क्रिकेटपटू आणि आता समालोचक असलेले संजय मांजरेकर यांनी X वर एक पोस्ट केली असून त्यामध्ये आयसीसी आणि बीसीसीआयला टॅग केले आहे.
कोलंबो कसोटीमध्ये शिक्षा झालेल्या तीन खेळाडूंमध्ये भारताच्या यशस्वी जैस्वालचा समावेश आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याचा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो याच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे आयसीसीने दोघांनाही त्यांच्या सामना शुल्काच्या 25% दंड आकारला आहे. तसेच दोघांना प्रत्येकी एक डिमेरिट पॉइंट दिला आहे.
ही शिक्षा कमी असल्याचे मांजरेकरांना वाटते. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय आयसीसी आणि बीसीसीआय अलीकडे ‘इंडिया ए’ (Ind A) कडून खेळताना वैभव सूर्यवंशी आणि आता यशस्वी जैस्वाल… तुम्ही त्यांना गैर वर्तनाबद्दल मोकळीक देत राहिलात, तर तुम्हीच त्यांना असे वर्तन पुन्हा करण्यास प्रवृत्त करत आहात. हे खेळासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठीही चांगले नाही.”
तसेच वैभवच्या बाबतीत मांजरेकर यांनी जुन्या घटनेचा संदर्भ दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी दम्बुला येथे झालेल्या अ संघांच्या तिरंगी मालिकेतील सामन्यात श्रीलंका अ विरुद्ध भारत अ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हा वैभवचा श्रीलंकेच्या खेळाडूसोबत जोरदार वाद झाला होता.
वैभवने मैदानावर नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्या सामना शुल्काच्या 50% दंड आकारण्यात आला होता. (such behaviour not good for sport Sanjay Manjrekar post about Vaibhav Sooryavanshi and Yashasvi Jaiswal)






