भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. परंतु पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे चाहत्यांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने सामना वेळेच्या आधीच थांबवण्यात आला होता. तसेच चौथ्या दिवशीही पावसाचे आगमन झाल्याने एकही चेंडूचा खेळ झाला नाही.
अशात या ऐतिहासिक सामन्याच्या निकाल काय लागेल? याबाबत अनेक दिग्गज क्रिकेटपटू भाष्य करत आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि मदन लाल यांनी काही मार्ग सुचवले आहेत.
या सामन्याच्या निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येणार आहे. परंतु क्रिकेट चाहते गेल्या २ वर्षांपासून पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्या संघाची आतुरेने वाट पाहत होते. त्यामुळे कोणालाच अपेक्षा नव्हती की, पावसामुळे हा सामना खेळवण्यात अडथळा निर्माण होईल. अशातच माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर आणि आणि मदन लाल यांनी काही पर्याय सुचवले आहेत. (Sunil gavaskar and madan lal want the result of the match says cricket Committee should do something)
काहीतरी मार्ग शोधायला हवा
सुनील गावसकर यांनी आज तकसोबत चर्चा करताना म्हटले की, “इथे इंग्लंडमध्ये असलेले काही स्थानिक लोक आहेत, ज्यांना हवामानाचा चांगला अंदाज घेता येतो. ते म्हणत आहेत की, आजही सामना होणे कठीण आहे. माझ्या मते दोन दिवसांत तीन डाव होणे कठीण आहे. हे फक्त तेव्हाच होऊ शकेल जेव्हा दोन्हीही संघ खराब फलंदाजी करतील. आता तर असे संकेत दिसून येत आहेत की, हा सामना रद्द होईल किंवा अनिर्णित राहिली. मग दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.”
“अशात जर तुम्ही जर फुटबॉलमध्ये पाहिले तर, त्यामध्ये पेनल्टी शूट आऊट असते. टेनिसमध्येही ५ सेट असतात. तसेच टाय ब्रेकर राऊंड असतो. ज्यामुळे आपल्याला विजेता निश्चित करणे सोपे जाते. परंतु क्रिकेटमधील भारत-न्यूझीलंड हा ऐतिहासिक सामना अनिर्णीत राहण्याच्या मार्गावर आहे,” असे ते पुढे म्हणाले.
तसेच त्यांनी सांगितले की, “विजेता निश्चित करण्यासाठी काही ना काही मार्ग काढायला हवा. आपण विश्वचषक स्पर्धेत पाहिले होते की, सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणाऱ्या संघाला विजेता घोषित करण्यात आले होते. पण अनेकांना हे ठीक वाटले नव्हते. इथे क्रिकेट समितीला प्रत्येक गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, यापूर्वी सर्वाधिक गुण असणारा संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी होता. परंतु त्यानंतर टक्केवारीनुसार संघाची क्रमवारी ठरवण्यात आली. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी विचार करायला पाहिजे.”
सामना पुन्हा खेळवा
तसेच माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल म्हणाले की, “माझ्या मते हा सामना पुन्हा एकदा खेळवला गेला पाहिजे. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्स, मेलबर्न किंवा कोलकातामध्ये झाला असता तर याची मजा काही वेगळीच असती. या सामन्यात ट्रॉफी त्यालाच मिळायला हवी जो हा सामना जिंकेल. मी असे मुळीच म्हणत नाही की, हा सामना आताच खेळवा. कारण आता भारत विरुद्ध इंग्लंड मालिका होणार आहे. जर भारतातील वातावरण अनुकूल असेल तर हा सामना भारतात का होऊ शकत नाही. कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल याचा निकाल लागायला हवा. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही खूप मोठी स्पर्धा आहे.”
महत्वाच्या बातम्या –
पावसाच्या व्यत्यानंतर सर्वांना राखीव दिवशी सामना होण्याची आस, पण अंतिम निर्णय होणार ‘या’दिवशी
‘असे’ ३ पर्याय, ज्याद्वारे संयुक्त विजेता न ठरवता कसोटी चँपियनशीपला मिळू शकतो एकच विजेता
WTC अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात पंत सपशेल फ्लॉप, केली ३ वर्षांपुर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती