टी२० क्रिकेट, या क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात खेळाडूंना झटपट खेळी कराव्या लागतात. गोलंदाजांना कमीत कमी धावा देत अधिकाधिक विकेट्स घ्याव्या लागतात, तर फलंदाजांना कमीत कमी चेंडूंमध्ये अधिकाधिक धावा जमवाव्या लागतात. अशीच काहीशी छोटेखानी पण झटपट खेळी करत राहुल तेवतिया याने त्याच्या आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सला हंगामातील सलग तिसरा सामना जिंकून दिला आहे.
शुक्रवारी (०८ एप्रिल) गुजरात विरुद्ध पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात आमना सामना झाला. गुजरातने शेवटच्या चेंडूवर ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या या विजयाचा नायक राहिला, तेवतिया (Rahul Tewatia). तेवतियाच्या या मॅच विनिंग कामगिरीने भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांना प्रभावित केले आहे.
तेवतियाने पंजाबच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात धुव्वादार फटकेबाजी केली होती. गुजरातला अखेरच्या २ षटकात विजयासाठी १२ धावांची आवश्यकता. अशावेळी अंतिम षटकात ३ चेंडूंमध्ये २ षटकारांच्या मदतीने १३ धावांची ताबडतोब खेळी करत तेवतियाने गुजरातला सामना जिंकून दिला. त्याच्यापूर्वी एमएस धोनीने राइजिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना शेवटच्या षटकात २ षटकार ठोकत संघाला सामना जिंकून दिला होता.
आइसमॅन आहे तेवतिया
या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनिल गावसकर म्हणाले की, “तेवतियाच्या नसांमध्ये काय वाहात आहे. फक्त रक्त नाही तर बर्फही वाहात आहे. मॅथ्यू हेडन तू बरोबर आहेस. हा बर्फच आहे. त्यामुळे आजपासून तेवतियाचे नवे नाव आइसमॅन (Iceman) आहे. फक्त तेवतियाच अशा स्थितीत गुजरातला विजय मिळवून देऊ शकत होता.”
“आज गुजरातला फक्त तेवतियाच विजय मिळवून देणार शकणार होता. त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन फलंदाजी करायला फार आवडते. मी त्याला असे करताना पाहिलेही आहे. युवा ओडियन स्मिथ शेवटचे षटक टाकताना खूप दबावात होता. हा त्याचा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. इथेच गोलंदाजी प्रशिक्षकाची मोठी भूमिका असते. गोलंदाजी प्रशिक्षकाचे काम फक्त मनगटाची स्थिती नीट करणे आणि हाताची पोझिशन नीट करणे, हे नसते. गोलंदाजी प्रशिक्षकाने अशावेळी गोलंदाजाला सांगायला पाहिजे की, अशा परिस्थितीत कशाप्रकारे गोलंदाजी केली जाते,” असेही गावसकर पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
युएईत आयपीएल गाजवलेल्या ऋतुराजला मानवेना भारतातील हवामान; आकडेवारीच देतेय साक्ष
स्वत:च धावला आणि रनआऊटही झाला, तरीही हार्दिकने संघ सहकाऱ्यावर काढला राग; पाहा Video