राजकोट। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात गुरुवारी (7 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना(2nd T20I) पार पडला. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) पार पडलेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला.
भारताच्या या विजयाबरोबरच भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठीही हा सामना खास ठरला. त्याचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. त्यामुळे तो 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे.
भारताकडून पहिले 100 कसोटी, वनडे सामने खेळणारे खेळाडू
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताकडून पहिल्यांदा 100 कसोटी सामने खेळण्याचा कारनामा केला आहे. गावस्कर यांनी सन 1984 मध्ये ही कामगिरी केली. तसेच वनडेमध्ये भारताकडून पहिल्यांदा 100 सामने खेळण्याचा पराक्रम कपिल देव यांनी केला आहे. त्यांनी 1987 मध्ये हा पराक्रम केला होता.
त्यानंतर आता भारताला रोहित शर्माच्या रुपात टी20मध्येही 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू मिळाला आहे.
रोहित आधी या भारतीय क्रिकेटपटूने खेळले आहेत 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने –
रोहित हा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 सामने खेळणारा भारताचा दुसरा क्रिकेटपटू आहे. त्याच्याआधी असा पराक्रम महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरने केला आहे. तिने भारताकडून 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
ती आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 सामने खेळणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे. तिने हा विक्रम याचवर्षी ऑक्टोबरमध्ये केला होता.





