पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचा यंदाचा हंगाम खूपच खराब गेला. 14 सामन्यात मुंबईचा संघ फक्त 4 सामन्यांत विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिग्गज क्रिकेटपटूंपासून ते मुंबई इंडियन्सचे चाहते देखील पांड्यावर टीका करत आहेत. आता माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देखील हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आपलं मत मांडलं आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना गावसकर म्हणाले की, “हार्दिकची सुरुवात चांगली झाली नाही. नकारात्मक कमेंट्समुळे त्याच्यावर परिणाम झाला. जर हार्दिकनं पहिल्याच सामन्यात धावा केल्या असत्या किंवा काही विकेट्स घेतल्या असत्या तर कदाचित गोष्ट वेगळी असती.” मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं यंदाच्या आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार म्हणून घोषित केलं होतं.
पुढे बोलताना गावसकर म्हणाले, “त्याची सुरुवात चांगली झाली नाही. मला वाटतं की, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याच्या नियुक्तीबाबत खूप नकारात्मकता होती. तुम्ही कितीही मजबूत व्यक्ती असला तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. यामुळे त्याच्या कामगिरीमध्ये नक्कीच फरक पडला आहे.”
आयपीएलच्या या हंगामात हार्दिक पांड्याची कामगिरी खूपच साधारण राहिली. या मोसमात त्यानं एकूण 216 धावा केल्या, ज्यामध्ये 46 धावांच्या सर्वाधिक खेळीचा समावेश होता. गोलंदाजीत त्यानं नक्कीच 11 विकेट्स घेतल्या, मात्र त्याची इकॉनॉमी 10.75 एवढी राहिली.
मुंबईला हंगामाच्या शेवटच्या सामन्यात लखनऊ विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. यासह मुंबई गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिली. या मोसमात मुंबईनं फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, आयपीएल 2022 देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिली होती. त्या हंगामात देखील मुंबई 14 पैकी फक्त 4 सामन्यांमध्ये विजय मिळवू शकली होता.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनच्या पोरानं दाखवली ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला खुन्नस, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
2 चेंडूत 2 षटकार खाल्यानंतर ओव्हर पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला अर्जुन तेंडुलकर! समोर आलं मोठं कारण






