टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्कलोडमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट सामन्यांच्या मालिकेत फक्त तीनच सामने खेळला. बुमराह फिट असूनही त्याने टेस्ट सामने मिस केल्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटवरुन वाद निर्माण झाला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर टीका केली आहे. आता या यादीत भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचेही नाव जोडले गेले आहे. गावसकर यांनी वर्कलोडवर दिलेली प्रतिक्रिया वाद निर्माण करू शकते.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी आशा व्यक्त केली आहे की, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत मोहम्मद सिराजच्या शानदार कामगिरीनंतर “वर्कलोड मॅनेजमेंट” हा शब्द भारतीय क्रिकेटच्या शब्दकोशातून कायमचा गायब होईल.
सांगायचं झालं, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध सर्व पाच टेस्ट सामने खेळले आणि एकूण 185.3 षटके टाकत 23 बळी घेतले. दुसरीकडे, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह फक्त तीन सामन्यांसाठीच उपलब्ध होता आणि कार्यभार व्यवस्थापनाअंतर्गत तो ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्यातही खेळू शकला नाही.
सुनील गावसकर यांनी स्पष्ट केलं की ते बुमराहवर टीका करत नाहीयेत, कारण हे इतर काही नसून जखमेच्या व्यवस्थापनाचा भाग होता. गावसकर यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितलं, “जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता, तेव्हा वेदना आणि त्रास विसरायला हव्यात. तुम्हाला वाटतं का की सीमारेषेवर तैनात सैनिक थंडीची तक्रार करतात? रिषभ पंतने तुम्हाला काय दाखवलं? त्याने पायाला फ्रॅक्चर असतानाही फलंदाजी केली. खेळाडूंविषयीही हीच अपेक्षा असते. भारतासाठी क्रिकेट खेळणं ही एक सन्मानाची गोष्ट आहे.”
ते म्हणाले, “तुम्ही 140 कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करत आहात आणि हेच आपण मोहम्मद सिराजमध्ये पाहिले. मला वाटते सिराजने पूर्ण मनापासून गोलंदाजी केली आणि ‘वर्कलोड’सारख्या शब्दाला कायमचे संपवून टाकले. पाचही टेस्ट सामन्यांमध्ये त्याने सात-आठ षटके सतत गोलंदाजी केली, कारण कर्णधारालाही त्याच्याकडून हीच अपेक्षा होती आणि देशालाही.”






