इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरना व्हायरसच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. एप्रिलमध्ये सुरु झालेला या हंगामात ६० पैकी केवळ २९ सामने पूर्ण झाले. या पहिल्या टप्प्यात काही संघांनी खुपच प्रभावित केले. त्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचा समावेश होतो. या तीन संघात पहिल्या क्रमांकासाठी चांगलीच चुरस रंगली होती. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी चेन्नई सुपर किंग्सचे कौतुक केले आहे.
सीएसकेची आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएलच्या १३ व्या हंगामात खुपच निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यांना गुणतालिकेत स्पर्धेअखेर ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, हा खराब हंगाम विसरुन चेन्नईने १४ व्या हंगामाची सुरुवात दमदार केली. १४ व्या हंगामात सीएसकेची कामगिरी चांगली झाली. त्यांनी पहिला सामना पराभूत झाल्यानंतर सलग ५ सामने जिंकले होते. त्यानंतर मात्र, त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. पण स्पर्धा स्थगित झाली तेव्हा सीएसके संघ ७ सामन्यांतील ५ विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता.
गावसकरांनी केले चेन्नईचे कौतुक
चेन्नईच्या १४ व्या हंगामातील कामगिरीचे कौतुक करताना गावसकरांनी स्पोर्ट्सस्टारसाठी लिहिलेल्या स्तंभात म्हटले की ‘या हंगामात अन्य सर्व संघ चांगल्या फॉर्ममध्ये आले होते, पण चेन्नईवर मागील हंगामातील खराब कामगिरीचा दबाव होता. पण हा संघ यंदा चॅम्पियनसारखा दिसला, जसा तो सहसा दरवर्षी असतो. त्यांच्या संघात कोणताही मोठा बदल झालेला नसतानाही हा संघ नवीन उर्जेसह यंदा खेळताना दिसला.’
त्याचबरोबर गावसकरांनी चेन्नईच्या फलंदाजीचेही कौतुक केले. त्यांनी लिहिले, ‘मोईन अलीला तिसऱ्या क्रमांकावर दिलेली बढती ही मास्टरस्ट्रोक ठरली. डावकरी फलंदाज असलेल्या अलीने काही चांगल्या खेळी केल्या. या हंगामात फाफ डू प्लेसिस शानदार फॉर्ममध्ये होता आणि त्याला ऋतुराज गायकवाडची साथ मिळाली. त्यांनी संघाला दमदार सुरुवात दिली.’
पुढे गावसकर म्हणाले, ‘सॅम करनने छाप सोडणे सुरुच ठेवले. त्याने प्रत्येक सामन्यासह सुधारणा केली. तसेच एक उत्तम अष्टपैलू म्हणून त्याचा विचार करावा, यासाठी दावेदारी सिद्ध केली. केवळ या संघाला शेवटच्या षटकातील गोलंदाजी मजबूत करावी लागेल, हे मुंबई विरुद्धच्या सामन्यात स्पष्ट झाले. त्यांनी २१८ धावा करुनही शेवटच्या चेंडूवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.’
आयपीएल २०२१ स्थगितीनंतर गुणतालिका
आयपीएल २०२१ हंगाम स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांचे ८ सामने खेळून झाले होते. तर अन्य ६ संघांचे ७ सामने पूर्ण झाले होते. या सामन्यांनंतर दिल्ली १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर होते. तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रत्येकी १० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. तर मुंबई इंडियन्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या, पंजाब किंग्स सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: खरंच का; ‘भूवी’ची भारतीय कसोटी संघात निवड न होण्यामागे त्याचाच हात!
एका ट्विटमुळे गौतमपुढे उभारली ‘गंभीर’ समस्या, आला दिल्ली पोलिसांच्या रडारवर