भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल आणि फिरकीपटू कुलदीप यादव हे सतत संघातून आत-बाहेर होत असतात. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. सध्या या मालिकेतील ३ सामने संपले असून यजमान संघ २-१ ने आघाडीवर आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटीतील विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी भारत पुन्हा त्याच प्लेइंग इलेव्हनसह चौथ्या कसोटीत उतरू शकतो. अशात कुलदीप आणि अगरवालला संधीसाठी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे वक्तव्य सुनिल गावसकर यांनी केले आहे.
माजी भारतीय फलंदाज गावसकर म्हणाले की, “मला नाही वाटत भारत त्यांच्या अंतिम एकादशमध्ये काही बदल करेल. माझ्या मते, वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीपला संधी दिली जावी. परंतु अवघ्या २ दिवसांत भारताने आरामात इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत चितपट केले आहे. त्यामुळे ते त्यांचा तिसऱ्या कसोटीतील तगडा संघ कायम राखण्याचा प्रयत्न करतील. अशात कुलदीपसह अगरवाललाही संधीची प्रतिक्षा करावी लागू शकते.”
कुलदीपला आतापर्यंत भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील फक्त दुसरा सामना खेळायला मिळाला आहे. तर अगरवाल अद्याप इंग्लंडविरुद्ध कसोटीत खेळायला मिळण्याची वाट पाहात आहे.
जसप्रीत बुमराहची माघार, सिराज-यादवपैकी एकाला संधी
दरम्यान, चौथ्या सामन्याआधी भारतीय संघाला काहीसा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणामुळे शेवटच्या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये थोडाफार बदल जाणवू शकतो. बुमराहच्या जागी तिसऱ्या कसोटीत बाकावर बसवलेल्या मोहम्मद सिराज किंवा उमेश यादव यांपैकी एकाची निवड केली जाऊ शकते.
मार्च ४, या तारखेपासून चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच हा सामना रंगणार आहे. अशात भारतीय संघ सामना जिंकत विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर इंग्लंड संघ भारताला पराभूत करत मालिका बरोबरीवर आणण्यासाठी झगडताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! बड्डेदिनी आफ्रिदी झाला ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘४१, ४४ का ४६ नक्की कितवा वाढदिवस?’
‘आय ऍम बार्बी गर्ल’ म्हणतं हार्दिक पंड्याच्या बायकोचा भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएल आयोजनात तीन संघांचा खोडा! ‘हे’ कारण देत केली त्रयस्थ ठिकाणाची मागणी






