आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ घोषित केला. मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांच्या समितीद्वारा निवड करण्यात आली. यादरम्यान संघाची घोषणा झाल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
त्यांच्या मते आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीसाठी सलामीला यावे आणि केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले पाहिजे. यामुळे भारतीय संघातील मधली फळी मजबूत होईल, असेही मत व्यक्त केले.
या १५ सदस्यीय संघात भारतीय संघाने सलामीचे फलंदाज म्हणून उपकर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि ईशान किशन यांना निवडले आहे. याबाबत एका टीव्ही चॅनेलवर बोलताना गावसकर म्हणाले की, “आपण या वर्षाच्या सुरुवातीला पाहिले होते, की जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा कोहलीने सलामीला फलंदाजी केली होती. त्यामुळे कोहली या स्पर्धेत सलामीला फलंदाजी करू शकतो आणि केएल राहुल चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.”
तसेच कोहलीने इंग्लंड विरुद्ध मार्च महिन्यात झालेल्या मालिकेतील पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीला खेळताना ५२ चेंडूत ८० धावांची खेळी केली होती. त्यानंतर आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून देखील कोहलीने सलामीला फलंदाजी केली होती.
दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. यासाठी अनेक संघांनी यापूर्वीच आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला होता. त्यानंतर भारतीय संघाने देखील आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना खेळण्यासाठी संधी मिळाली आहे. तर असेही काही खेळाडू आहेत ज्यांची या स्पर्धेसाठी निवड होणे अपेक्षित होते, मात्र तरीही त्यांना संघातून वगळण्यात आले.
ज्यामध्ये प्रामुख्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा युजवेंद्र चहल आणि अनुभवी फलंदाज शिखर धवन यांना संघातून वगळण्यात आले आहे. तर दुसरीकडे तब्बल ४ वर्षानंतर अश्विनला मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी संघात संधी मिळाली आहे.
तसेच सध्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला देखील संघात सामील केले गेले आहे. सोबतच गोलंदाजीमध्ये भारतीय संघाने केवळ ३ वेगवान गोलंदाजांना निवडले आहे. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक (मेंटर) म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत ब गटात आहे. ज्यामध्ये भारतासोबत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ आहे. तर २ संघ पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–असे ५ खेळाडू, ज्यांनी २०१४ आणि २०१६ नंतर २०२१ च्या टी२० विश्वचषकासाठीही मिळवले टीम इंडियात स्थान
–टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्याचे कळताच कशी होती राहुल चाहरची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
–“संघात निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन, पण मला चहल व शिखरची निवड न झाल्याचे दु:ख”