इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट खेळी करत इंग्लंडवर दमदार विजय मिळवला होता. अशीच अपेक्षा भारतीय संघाकडून तिसऱ्या कसोटी सामन्यातही केली जात होती. मात्र तसे झाले नाही. भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. यामुळे भारतीय संघाची जोरदार टीका केली जात आहे. तसेच भारतीय संघात बदलाची देखील मागणी केली जात आहे.
अशातच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी देखील चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाला अंतिम ११ मध्ये बदल करण्याचा सल्ला सुचवला. सोनी नेटवर्कवर समालोचन करताना गावसकर म्हणाले, “भारतीय संघाने आता अंतिम ११ बाबत समायोजन करून बदल करण्याची गरज आहे. रिषभ पंतने तीनही कसोटी सामन्यांमध्ये धावा बनवल्या नाहीत. अशात भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात एका अतिरिक्त फलंदाजासह उतरण्याबाबत विचार केला पाहिजे.”
“तसेच हवे असल्यास भारतीय संघ ४ गोलंदाजांना घेऊन ७ फलंदाजांना संघात खेळू शकतो. असे केले तर, भारतीय संघाला सोयीस्कर होऊ शकते. कारण भारतीय संघाची फलंदाजी या दौर्यात कमजोर राहिली आहे.”
अंतिम ११ मध्ये बदल होण्याचे विराटकडूनही मिळाला इशारा
लीड्सवरील पराभवानंतर कोहलीने संघातील बदलांबाबत संकेत दिले आहे. यावर कोहली म्हणाला, “पुढच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ काही बदलांबाबत विचार करत आहे. कारण प्रत्येक खेळाडू ४ कसोटी सामने खेळू शकत नाही.”
दरम्यान, मालिकेत पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र इंग्लंडने दमदार पुनरागमन केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ ७८ धावाच बनवू शकला. ज्यानंतर कर्णधार जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४३२ धावांचा डोंगर उभा केला. ज्यामुळे इंग्लंडला ३५४ धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर रोहित शर्मा(५९) विराट कोहली(५५) आणि चेतेश्वर पुजारा(९१) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाचा दुसरा डाव सावरला होता. मात्र चौथ्या दिवशी भारतीय संघ २१५ वर २ विकेट्स अशा स्थितीत असताना भारतीय संघाने केवळ ६३ धावांमध्ये आपल्या ८ विकेट गमावल्या.
त्यामुळे, दुसऱ्या डावातही भारतीय संघ केवळ २७८ धावाच बनवू शकला आणि भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना ऑली रॉबिन्सनने ५ विकेट घेतल्या. ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला.
चौथा कसोटी सामना २ सप्टेंबरपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–ऍशेस २०२१-२२ वर प्रश्नचिन्ह; मालिकेपूर्वी ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे १० खेळाडू घेऊ शकतात माघार
–दुसऱ्यांदा विराटला नडला इंग्लंड संघ; लॉर्ड्सनंतर लीड्समध्ये विद्यमान भारतीय कर्णधाराविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम
–काय सांगता! भारताला धोबीपछाड देणारा इंग्लंड संघच सर्वाधिकवेळा डावाने पराभूत, भारत ‘या’ क्रमांकावर