शुक्रवार रोजी (२६ मार्च) पुणे येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेला दुसरा वनडे सामना इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३६ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी ४३.३ षटकांपर्यंत सहज भारताचे भलेमोठे लक्ष्य पूर्ण केले. इंग्लंडच्या या विजयास भारतीय गोलंदाजांचे खराब प्रदर्शन जबाबदार ठरले. यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी अष्टपैलू कृणाल पंड्या याच्यावर टिका केली आहे.
कृणाल भारतीय वनडे संघाचा पाचवा गोलंदाज असू शकत नाही. तो एक असा अष्टपैलू आहे जो फलंदाजीनंतर काही षटके गोलंदाजी करू शकतो. परंतु त्याने १० षटके गोलंदाजी करणे अवघड असल्याचे गावसकरांचे म्हणणे आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, “दुसऱ्या वनडेत भारतीय संघाची गोलंदाजी कुठे-ना कुठे कमी पडली. कारण कृणाल संघाचा पाचवा गोलंदाज ठरू शकत नाही. तो एक असा गोलंदाज नाही जो एका डावात १० षटके गोलंदाजी करु शकतो. खरे तर पुण्याच्या खेळपट्टीवर युझवेंद्र चहलसारख्या गोलंदाजांची गरज आहे. चहल सहज १० षटके गोलंदाजी करु शकतो.”
“भारताला तिसरा आणि शेवटचा वनडे सामना जिंकायचा असेल तर त्यांना आपल्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या गोलंदाजाविषयी खूप विचार करावा लागणार आहे. जर कृणालला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले तर त्याच्याकडून जास्त षटके गोलंदाजीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. हेच त्याने पाचव्या किंवा सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी केली तर तो ४-५ षटके गोलंदाजी करु शकतो,” असे गावसकरांनी शेवटी सांगितले.
दुसऱ्या वनडे सामन्यात कृणालने अतिशय महागडी गोलंदाजी केली होती. त्याने ६ षटके टाकताना तब्बल ७२ धावा दिल्या होत्या. दरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या २ वनडेत ‘या’ धुरंधरांनी केले दमदार प्रदर्शन, ठरू शकतात ‘मॅन ऑफ द सीरिज’
टीम इंडियाला मालिका हॅट्रिकची संधी, तिसऱ्या वनडेत ‘या’ शिलेदारांना उतरवणार सलामीला
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!