अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी -२० विश्वचषकानंतर या प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात युएई आणि ओमानमध्ये सुरू होणाऱ्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय टी२० संघाचे अखेरच्यावेळी नेतृत्व करेल. दरम्यान, महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भारताला पुढील वर्षी टी -२० विश्वचषकही खेळायचा आहे, त्यामुळे कोणीही कर्णधार बदलण्याचा विचार करू नये.
गावसकर म्हणाले, ‘मला वाटते की पुढील दोन टी -२० विश्वचषकांसाठी रोहित शर्माला भारताचा कर्णधार बनवले पाहिजे. पुढील विश्वचषक एका वर्षाच्या आत होणार आहेत. सध्या टी -२० विश्वचषक एका महिन्याच्या आत यूएई आणि ओमानमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर एका वर्षानंतर दुसरा होईल. स्पष्टपणे सांगायचे तर आपल्याला या दरम्यान अधिकचे कर्णधार बदलण्याची आवश्यकता नाही. भारतीय कर्णधारपदासाठी रोहित शर्मा नक्कीच माझी निवड असेल.’
ते पुढे म्हणाले, ‘त्यानंतर, मी उपकर्णधारपदासाठी केएल राहुलकडे पाहत आहे. मी रिषभ पंतच्या नावाचाही विचार करेन. कारण तो ज्या प्रकारे स्टार खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली (दिल्ली कॅपिटल्स) संघाचे नेतृत्व करत आहे, ते खरोखर प्रभावी आहे. एन्रिच नॉर्किए आणि कागिसो रबाडा सारख्या खेळाडूंचा चांगल्या प्रकारे वापर करून तो टी२० प्रकारामध्ये गोलंदाजी बदलत आहे. हे खरोखर एक हुशार कर्णधार असल्याचे द्योतक आहे. आपल्याला नेहमीच एक कर्णधार हवा असतो जो परिस्थिती समजू शकतो आणि त्यावर त्वरित काम करू शकतो. तर, राहुल आणि पंत हे दोन खेळाडू मी भविष्यात उपकर्णधार म्हणून पाहतो.’
अनेक दिग्गज रोहित शर्माचे नाव कर्णधारपदासाठी सुचवत आहेत, कारण तो इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. या ३४ वर्षीय खेळाडूने मुंबई इंडियन्ससाठी ५ आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत, जी लीगच्या इतिहासातील कोणत्याही कर्णधाराहून सर्वाधिक आहेत. दुसरीकडे, भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
“तू कोच आहेस, तेवढेच काम कर”, पाँटिंगवर बरसला भारतीय दिग्गज
वुमेन्स बीबीएलमध्ये भारतीय महिलांचा बोलबाला; दोन दिवसात सात खेळाडू करारबद्ध