क्रिकेट ज्या-ज्या देशांमध्ये खेळले जाते; त्या-त्या देशात क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम आणि उत्साह असलेला आपल्याला दिसतो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट एखाद्या धर्माप्रमाणेच आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातदेखील मोठे नाव कमावलेल्या क्रिकेटपटूंना आणि कर्णधारांना प्रतिष्ठित उपाध्या दिलेल्या पहायला मिळतात. त्याचप्रकारे, कॅरेबियन बेटांवर देखील क्रिकेटचा वेगळाच चाहता वर्ग आहे. कॅरेबियन बेटांवर सुरुवातीला छंद म्हणून खेळले जाणारे क्रिकेट आज तेथील लोकांच्या सर्वात पसंतीचा खेळ बनला आहे. सात-आठ देशांचा मिळून एकच वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो.
या सर्व देशातून अगदी निवडून काही अप्रतिम व कलात्मक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात. असाच एक क्रिकेटपटू ज्याने अल्पावधीतच खऱ्या अर्थाने क्रिकेट चलतात दहशत बसवली होती. हा क्रिकेटपटू म्हणजे मिस्ट्री स्पिनर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केलेला व सध्या अष्टपैलू अशी भूमिका पार पाडत असलेल्या सुनील नरीन होय.
भारतीय वंशाचा सुनील
वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये अनेकदा भारतीय नावांशी साधर्म्य असलेले खेळाडू आपल्याला दिसतात. यामागील कारण म्हणजे या खेळाडूंचा भारताशी असलेला संबंध.या सर्व खेळाडूंचे वंशज मुळता मिळतात भारतीय आहेत. अशाच एका कुटुंबात २६ मे १९८८ रोजी सुनील नरीनचा जन्म झाला. त्रिनिदाद येथील अरीमा हेच त्याचे जन्मस्थान.
नरीन याचे नाव सुनीलच का ठेवले? याची देखील एक छोटाशी गोष्ट आहे. नरीन याचे वडील शदीद हे मोठे क्रिकेटप्रेमी होते. भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी आपल्या पहिल्या वेस्टइंडीज दौऱ्यात ज्याप्रकारे वेस्ट इंडीजच्या तुफानी गोलंदाजांचा सामना केला होता ते पाहून त्यांनी मनाशी पक्के केले होते की, आपल्याला मुलगा झाला तर त्याचे नाव सुनील ठेवणार. त्याचमुळे शदीद यांनी मुलाचे नामकरण सुनील केले.
त्या कामगिरीने घेतले लक्ष वेधून
साऱ्या कॅरेबियन बेटांवर प्रत्येक जण क्रिकेटचा चाहता आहे. त्याचप्रमाणे सुनीलला देखील क्रिकेटची आवड निर्माण झाली. फिरकी गोलंदाजी करणारा सुनील सर्वप्रथम २००६ मध्ये चर्चेत आला. एकोणीस वर्षाखालील एका स्पर्धेत ५५ धावा देऊन त्याने विरूद्ध संघातील सर्वच्या सर्व १० गडी बाद केले. या कामगिरीनंतर त्याच्याकडे वेस्ट इंडीजचा पुढील दिग्गज म्हणून पाहिले जाऊ लागले.
स्पर्धात्मक क्रिकेटमधील पदार्पण
वयोगट स्पर्धा गाजवल्यानंतर २००९ मध्ये त्याला प्रथमश्रेणी पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, या सामन्यात तो साफ अपयशी ठरला व पुढील वर्षभर त्याने स्वतःला क्रिकेटपासून वेगळे केले. २०११ मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगमधून पुनरागमन केले आणि आपल्या दमदार कामगिरीने संघाला विजेतेपद मिळवून दिले. पाठोपाठ चॅम्पियन्स लीग देखील त्याने गाजवली. २०११ च्या अखेरीस त्याने वनडे व टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले.
आयपीएलने बनवले सुपरस्टार
सुनील नरीन या नावाला खरी ओळख मिळाली ती २०१२ आयपीएलच्या लिलावात. अनेक संघ त्याच्या ‘मिस्ट्री स्पिन’ मुळे त्याच्यावर बोली लावण्यास उत्सुक होते. चेन्नई सुपर किंग्स व पंजाब किंग्स यांना मागे टाकत कोलकाता नाईट रायडर्सने त्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. या हंगामात त्याने २४ बळी मिळवून केकेआरला पहिलेवहिले विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर तो आजतागायत केकेआरचा अविभाज्य भाग आहे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द झाली कमी
सुनील नरीन हा त्या मोजक्या खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे ज्यांनी क्रिकेट बोर्डाशी बंड करुन आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर कुऱ्हाड मारून घेतली. देशातील सर्वोत्तम प्रतिभा असलेला नरीन ६ कसोटी, ६५ वनडे व ५१ टी२० सामने आपल्या देशासाठी खेळला. त्याने अद्याप निवृत्ती स्वीकारली नसली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता कमी आहे.
जगातील सर्वच टी२० लीगमधील सर्वात मागणी असलेला नरीन मागील काही काळापासून सलामीला येत तुफान फटकेबाजी देखील करत आहे. टी२० क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर निर्धाव टाकणारा तो एकमेव गोलंदाज आहे आणि हा विक्रम भविष्यात कधी मोडला जाईल याची सुतराम शक्यता नाही. सतत गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेऊनही तो आपली ‘मिस्ट्री’ आजपर्यंत टिकवून आहे.
वाचा –
ब्लाॅग- देश का गौरव : राहुल-सौरव
‘भारताचे गॅरी सोबर्स’ अशी ओळख मिळवणारे दिग्गज, २६ सामन्यांच्या कारकिर्दीत रचला होता विक्रमांचा ढीग