fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ब्लाॅग- देश का गौरव : राहुल-सौरव

– पराग पुजारी

आज २६ मे.. आपलं वनडे क्रिकेट काही अर्थानी नक्कीच बदलणारा दिवस. कारण १९९९ साली इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये या दिवशी टॉन्टनमध्ये काहीतरी अद्भुत घडलं होतं. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करो या मरो स्थितीत असताना, प्रचंड अंडरप्रेशर खेळत आपल्या दोन तरण्याबांड खेळाडूंनी जागतिक बॉलर्सना जणू आपल्या बॅटने संदेशच दिला होता होता की यापुढे सचिनबरोबरच आम्हालाही घाबरत चला.

पण ते पाहण्याआधी अशी करो या मरो स्थिती ओढवलीच कशी ते बघू. आपल्या ए ग्रुप मध्ये भारत, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, झिम्बाब्वे, केनिया हे संघ होते. साऊथ आफ्रिकेविरुद्ध पहिली मॅच, आपण २५३ केल्या, पण मग कॅलिसने टिच्चून खेळत आपल्याकडून ती मॅच हिसकावून घेतली. झिम्बाब्वे आणि केनियाविरुद्धचे पुढचे दोन पेपर सोपे समजून आपण जरा रिलॅक्स होतो की काय माहीत नाही, पण घात झालाच. लिसेस्टरला टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतली, झिम्बाब्वेला २५२ मध्ये थांबवलं. पण आपण छानपैकी ५१ एक्स्ट्रा रन्स दिल्याने तितक्या रिपीट बॉलिंगमुळे झालेल्या प्रचंड स्लो ओव्हर रेटच्या पायात आपल्याला चार ओव्हर्सचा दंड झाला आणि आता पुन्हा २५३, पण ४६ ओव्हर्समध्येच करायचे होते. सचिन त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी भारतात परतलेला असल्याने त्याच्या जागी संधी मिळालेल्या सदागोपन रमेशने पन्नास मारले. वर झिम्बाब्वेनेही आपल्या बॉलर्सना पुरेपूर टक्कर देत ३९ एक्स्ट्रा दिल्या होत्याच, म्हणजे साधारण ५०० पैकी ९० रन्स तर या दयाळू बॉलर्सच्या या महाप्रसाद वाटपातच झाल्या. पण शेवटी गडबड झाली. दोन ओव्हर्समध्ये ९ पाहिजे असताना आणि रॉबिन सिंग, श्रीनाथ चांगले खेळत असतानाही आपण हरलो. होय, आपल्या ३ विकेट्स हातात असतानाही आपण प्रॉपर ऑल आउट होऊन ती मॅच ३ रन्सनी हरलो होतो, याचे कारण ४५ व्या ओव्हरला हेन्री ओलोंगाने रॉबिन सिंग, श्रीनाथ, प्रसाद या तिघांना एकाच ओव्हरमध्ये आउट केलेले. आता सुपर सिक्स राउंडमध्ये जायचे तर उरलेल्या तिन्ही मॅचेस जिंकाव्याच लागणार होत्या. पुढची मॅच केनियाविरुद्ध, सचिन परत आला तो शतक करायलाच, सोबत द्रविडनेही शतक केले, आणि आपण दुबळ्या केनियाला सहज हरवले. आणि आता गाठ होती ती गतविजेत्या श्रीलंकेशी.

श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि रमेशला पहिल्याच ओव्हरमध्ये चामिंडा वासने आउट केले. ही लंकेच्या बाजूने झालेली त्या दिवसातली पहिली आणि शेवटची गोष्ट. कारण वन डाऊन आला राहुल द्रविड, त्याने आणि सौरव गांगुलीने बडवायला सुरुवात केली. आधी द्रविड जास्त आक्रमक होता, ४३ बॉल्समध्ये त्याने ५० आणि मग १०२ बॉल्समध्ये शतक पूर्ण केले. गांगुलीने हेच टप्पे ६८ आणि ११९ बॉल्समध्ये गाठले. पण शतक झाल्यावर गांगुलीने सिक्सवर सिक्स मारायला सुरुवात केली. त्या दिवशी गांगुलीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती केली असेल तर मुरलीधरनला तीन सिक्स मारून अनेक बॅट्समनच्या मनातून त्याची भीती काढून टाकली. आधी ७ ओव्हर्समध्ये फक्त २१ रन्स दिलेल्या मुरलीचे आकडे १० ओव्हर्समध्ये ६० रन्स विदाउट विकेट असे झाले. द्रविडने त्याला कव्हरच्या डोक्यावरून मारलेला लाजवाब सिक्स तर अजूनही डोळ्यासमोर आहे. डिसील्वाला गांगुलीने स्टेडियमबाहेर सिक्स मारल्यावर ‘हा बॉल नदीत गेला असेल’ असं कॉमेंटेटर गमतीत म्हणाला होता.

४० ओव्हर्समध्ये आपला स्कोर सहापेक्षा किंचित जास्त गतीने म्हणजे २४५ होता, दोघांचे शतक ठोकून झाले होते. इतके सेट झाल्यावर बॅट्समनना क्रिकेटचा बॉल एव्हाना फुटबॉलसारखा दिसू लागलेला असतो, तर गांगुली आता बिनधास्त बॉल उंच उडवत होता, लंकन फिल्डर कॅचेस सोडत होते. हेच दोघे शेवटपर्यंत खेळून नॉटआउट राहणार असं वाटत होतं, कारण वास, मुरलीसारखे जागतिक दर्जाचे बॉलर्स आणि सगळेच फिल्डर्स पूर्णपणे असे हतबल ठरत असताना अशी पार्टनरशिप तुटण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे रनआउट. आणि ४६ व्या ओव्हरला नेमके हेच झाले. गांगुलीसोबत तब्बल ३१८ रन्सची पार्टनरशिप झाली होती तेव्हा द्रविड १४५ वर असताना मुरलीच्या एका अचूक थ्रोवर रनआउट झाला. आपल्यामुळे द्रविड आउट झाला हा राग गांगुलीला आता लंकेच्या बॉलर्सवर काढायचा होता बहुतेक, पण मुरलीच्या ओव्हर्स संपल्या होत्या आणि रणतुंगाने एक गुन्हा केला. होय, गांगुली खेळत असताना डावखुऱ्या स्पिनरला बॉलिंग देणे हा गुन्हाच असतो. तात्पर्य पुढच्याच ओव्हरला जयसूर्याने गांगुलीकडून दोन सिक्स खाल्ले, पण त्याच ओव्हरमध्ये सचिनला बोल्ड केले. (या वर्ल्डकपला सचिन काही मॅचेस ओपनिंगला तर काही मॅचेस चौथ्या नंबरवर येऊन खेळला होता.) गांगुलीला पुन्हा आला राग.. वासला फोर मारली, पण शेवटच्या ओव्हरला गांगुली आठवा सिक्स मारण्याच्या नादात आउट झाला. १८३ – तेव्हापर्यंतचा तो भारताकडून हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर होता, कारण गांगुलीने कपिलचे १७५ मागे टाकले होते. अपेक्षेप्रमाणे आपण मॅच दणदणीत १५७ रन्सनी जिंकली, गांगुली मॅन ऑफ द मॅच झाला. (या वर्ल्डकपला तीन अर्धशतकं आणि दोन शतकांसह सर्वात जास्त ४६१ रन्स करणारा द्रविड एकाही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होऊ शकला नव्हता हे विचित्रच..)

द्रविड-गांगुलीची ३१८ रन्सची पार्टनरशिप बघून जगाने तोंडात बोटं घातली होती, त्याआधी वनडेत म्हणजे जिंकण्यासाठी अख्ख्या टीमने ३०० चे टार्गेट दिले तरी भरपूर वाटायचे, अशा काळात दोघांचीच ३०० ची पार्टनरशिप होऊ शकते अशी कल्पनाही कुणी केली नसेल. लोकांनी मग विचार केला असेल की ‘ठीक आहे, होऊ शकते असे एखाद्या वेळेस’.. बहुतेक द्रविडला हे आवडले नसावे, म्हणून त्याने पुढे सहा महिन्यांनी अहमदाबादला सचिनसोबत खेळताना पुन्हा हा विक्रम मोडून काढत न्यूझीलंडविरुद्ध तब्बल ३३१ ची पार्टनरशिप केली. यावेळी सचिन १८६, द्रविड १५३.. अलीकडे २०१५ च्या वर्ल्डकपला राक्षसयोनीऐवजी चुकून मनुष्ययोनीत जन्मलेल्या ख्रिस गेलने सॅम्युएल्सला बरोबर घेत चक्क ३७२ ची पार्टनरशिप करत हाही विक्रम मोडून काढला.

१९९९ वर्ल्डकपमध्ये आपण पुढे इंग्लंडला हरवून सुपर सिक्समध्ये गेलो. आपल्या वर्ल्डकप प्रथेप्रमाणे पाकिस्तानला हरवलं, पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून हरलो आणि सेमीजला पोचू शकलो नाही. पण या टॉन्टनच्या एका मॅचने क्रिकेटजगतात बरेच मेसेजेस गेले.. *वनडेत एवढा स्कोर आणि एवढी मोठी पार्टनरशिप होऊ शकते, *मुरली-वास एकाच मॅचमध्ये निष्प्रभ ठरू शकतात, *द्रविडला आता फक्त टेस्ट प्लेयर म्हणता येणार नाही, *आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताविरुद्ध खेळताना यापुढे ‘सचिन गेला की जिंकलो’ असं म्हणत फक्त त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी आखून चालणार नाही. इतके पक्षी एका मॅचने, नव्हे एका पार्टनरशिपने मारले, तेही वर्ल्डकपमध्ये इतकी प्रेशर मॅच खेळत असताना, कारण भक्कम लंकेविरुद्ध ही मॅच आपण हरलो असतो तर बाहेर झालो असतो. त्या दिवशीच्या लंकेकडे बघून असं वाटलंच नाही की या टीमने तीन वर्षांपूर्वी वर्ल्डकप जिंकलाय.

या विजयाने सचिनच्या खांद्यावरचा भार कमी व्हायला मदतही झाली, कारण टीम इंडियामध्ये अजून दोघे मॅचविनर आले होते. या तिघांपैकी कुणीतरी एक हमखास खेळणारच हा विश्वास, दबदबा, आणि बॉलर्सच्या मनातली भीती या तिघांनी त्यांच्या कामगिरीतल्या सातत्याने पुढे राखून ठेवण्यात यश मिळवले. मला १९९९ च्या वर्ल्डकपची आपली जर्सीही फार आवडते, आतापर्यंतच्या सगळ्या वर्ल्डकपमधल्या आपल्या जर्सीज पाहिल्या तरी हीच माझी फेव्हरेट आहे. तेव्हापासून एक झालंय… क्रिकेटबद्दल बोलताना, वाचताना मला गांगुली, किंवा द्रविड, किंवा तेंडुलकर असा शब्द जरी ऐकला किंवा वाचला तरी त्या नावाचा फक्त तो एक चेहरा डोळ्यासमोर येत नाही, तर हे तिघे एकदम दिसतात आणि मला याचा आनंद आहे. या तिघांनी मिळून भारतीय क्रिकेट खूप पुढे नेलंय आणि आपलं आयुष्य खूप सुंदर केलंय.

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार अन्य भाग-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

 

You might also like