आयपीएल 2024 चा 16 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या फलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत दिल्लीच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
सलामीला आलेल्या सुनील नारायणच्या झंझावातानं दिल्लीच्या गोलंदाजीचं अक्षरश: कंबरडंच मोडलं. ॲनरिक नॉर्कियापासून अक्षर पटेल आणि इशांत शर्मापर्यंत, सुनीलनं कुणालाही सोडलं नाही. इशांत शर्मासारख्या अनुभवी गोलंदाजाकडून धावा रोखण्याची अपेक्षा असताना नारायणनं त्याच्याविरुद्ध चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. सुनील नारायणनं आपल्या 39 चेंडूंच्या खेळीत 85 धावा ठोकल्या.
केकेआरच्या डावातील तिसरं षटक संपेपर्यंत सुनील नारायण 9 चेंडूत 8 धावा काढून खेळत होता. चौथं षटक टाकण्यासाठी इशांत शर्मा आला, त्याच्या पहिल्या चेंडूवर नारायणनं सीमारेषेबाहेर षटकार मारला. इशांननं चकवा देण्यासाठी दुसरा चेंडू छोटा टाकला, पण त्यावरही नारायणनं जोरदार षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत नारायणनं पहिल्या 3 चेंडूत 16 धावा केल्या.
नारायणचा चौथा चेंडू हुकला, मात्र पाचव्या चेंडूवर त्यानं पुन्हा एकदा षटकार हाणला. यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून नारायणनं इशांतला एकूण 26 धावा कुटल्या. या षटकात नारायणनं इशांतला 3 षटकार आणि 2 चौकार मारले. सुनील नारायणनं दिल्लीविरुद्ध 39 चेंडूत 85 धावा करताना 7 चौकार आणि तेवढेच षटकार मारले. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयपीएलमध्ये सुनील नारायणची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 75 होती, जी त्यानं 2018 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध रचली होती. त्या डावात नारायणनं केवळ 36 चेंडूत 75 धावा केल्या होत्या. आपल्या या खेळीत त्यानं 9 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले होते. आता नारायणची दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची 85 धावांची खेळी केवळ आयपीएलमधीलच नाही तर त्याच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? दिल्लीविरुद्ध आयपीएलच्या पहिल्याच डावात ठोकलं तुफानी अर्धशतक
मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव खेळण्यासाठी फिट; लवकरच मैदानात परतणार
टी-शर्ट काढून भन्नाट डान्स…छोट्या चाहत्यानं स्टेडियममध्ये केली हवा! ‘तो’ प्रसिद्ध मीम पुन्हा चर्चेत