आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची (केकेआर) चांगली कामगिरी असूनही, संघाचा फिरकीपटू सुनील नरीनला टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघात स्थान मिळणार नाही. वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड याने याबाबत महत्त्वाचे विधान करत नरीनच्या विश्वचषक संघातील समावेशाबाबत चर्चेला पूर्णविराम लावला.
आयपीएल उत्तरार्धात केली दमदार कामगिरी
नरीनने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध चार बळी घेण्याबरोबरच उत्कृष्ट फलंदाजी केली. नरीनने यूएईच्या लेगमध्ये आठ सामन्यांत ११ बळी घेतले आहेत. मात्र, ऑगस्ट २०१९ पासून त्याने आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. या कारणास्तव, विद्यमान विजेते वेस्ट इंडिजने त्याला टी२० विश्वचषकासाठी संघात घेतले नाही. संघात बदल करण्याची आयसीसीची मुदत १५ ऑक्टोबरला संपत आहे.
निवड केलेल्या संघावर विश्वास ठेवणे गरजेचे
सुनील नरीनच्या संघातील समावेशाबाबत विचारले असताना पोलार्ड म्हणाला,
“जर मी त्याला संघात समाविष्ट न करण्याच्या कारणांबद्दल बोललो तर याला वेगळे वळण लागू शकते. आता आमच्याकडे असलेल्या १५ खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले तर अधिक चांगले होईल. तेच आमच्यासाठी अधिक महत्वाचे आहे. आम्ही या खेळाडूंसह आमच्या जेतेपदाचा बचाव करू शकतो का यावर काम करावे लागेल. नरीनच्या प्रकरणावर मला टिप्पणी करायची नाही. यावर बरेच काही सांगितले गेले आहे. वैयक्तिकरित्या, मी सुनील नरीनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूपेक्षा चांगला मित्र मानतो. आम्ही एकत्र खेळून मोठे झालो. तो जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे.”
विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबीयन ऍलन, ड्वेन ब्रावो, रोस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, आंद्रे रसेल, ख्रिस गेल, शिमरन हेटमायर, एविन लुईस, ओबेद मेकॉय, रवी रामपॉल, लेंडल सिमन्स, ओशेन थॉमस व हेडन वॉल्श ज्यू.
राखीव- जेसन होल्डर, अकील हुसेन, शेल्डन कॉट्रेल, डॅरेन ब्रावो.