पुणे| बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या प्रिशा शिंदे यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला, तर, मुलांच्या गटात गुजरातच्या अक्षज सुब्रमणियम याने विजेतेपद पटकावले.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात गुजरातच्या दुसऱ्या मानांकित अक्षज सुब्रमणियम याने महाराष्ट्राच्या अवनीश चाफळेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. अक्षज हा द न्यू ट्युलीप इंटरनॅशनल शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून साईशा टेनिस अकादमीत प्रशिक्षक देवेंद्रसिंग भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित प्रिशा शिंदे हिने तिसऱ्या मानांकित अग्निमित्रा भट्टाचार्यचा 7-5,6-4 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. प्रिशा ही अभिनव इंग्लिश मिडीयम शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून सोलारिस क्लब येथे प्रशिक्षक रवींद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अर्चित धूत व अर्जुन किर्तने यांनी आकांश सुब्रमणियम व अक्षज सुब्रमणियम यांचा 6-4, 6-7(4), 10-7 असा तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व मेहक कपूर यांनी सिया प्रसादे व देवांशी प्रभुदेसाई यांचा 6-0, 7-6(7-5) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील एकेरी गटातील विजेत्या खेळाडूला करंडक, प्रशस्तीपत्रक व 25 एआयटीए गुण, तर उपविजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक व 20 एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण आणि स्पर्धा संचालक केदार शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीए सुपरवायझर रिया चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): मुले:
अक्षज सुब्रमणियम(गुजरात)[2]वि.वि.अवनीश चाफळे(महा) 6-3, 6-2;
मुली:
प्रिशा शिंदे(महा)[4] वि.वि.अग्निमित्रा भट्टाचार्य(महा)[3] 7-5,6-4;
दुहेरी गट: मुले: अंतिम फेरी:
अर्चित धूत/अर्जुन किर्तने वि.वि.आकांश सुब्रमणियम/अक्षज सुब्रमणियम 6-4, 6-7(4), 10-7;
मुली: प्रिशा शिंदे/मेहक कपूर वि.वि.सिया प्रसादे/देवांशी प्रभुदेसाई 6-0, 7-6(7-5).
महत्त्वाच्या बातम्या –
डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज स्पर्धेत देशभरांतून १०० खेळाडू सहभागी