इंडियन प्रीमियर लीग २०२१ द्वारे क्रिकेटरसिंकाचे पैसावसूल मनोरंजन होत आहे. त्यातही संडेला (रविवार, २५ एप्रिल) सुपर संडे बनवत यादिवशी आयपीएल २०२१ चा तिसरा डबल हेडर खेळवण्यात आला. यातील दुसरा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला.
हंगामातील दुसऱ्या विजयासाठी आसुसलेल्या हैदराबाद संघाने हा सामना जिंकण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या आणि हैदराबादला १६० धावांचे आव्हान दिले. २० व्या षटकापर्यंत कशाबशा ७ विकेट्स गमावत हैदराबादने १५९ धावांपर्यंत मजल मारली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. भलेही शेवटी दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. परंतु सामन्याखेर हैदराबादसाठी विजयाच्या आशा जिंवत ठेवण्याचे काम केले ते जगदीशा सुचिथ याने.
हैदराबादचा वरच्या फळीतील धुरंधर केन विलियम्सन याला पुरेपुर साथ देत त्याने नाबाद १४ धावांची छोटेखानी पण प्रशंसनीय खेळी केली. ६ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली. त्याच्या प्रयत्नांमुळे २० व्या षटकाखेर सामना बरोबरीत आणण्यात हैदराबाद संघ यशस्वी ठरला. याच जगदीशा सुचिथ याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व करत असला तरी संघातील बरेचसे खेळाडू कर्नाटकचे आहेत. मयंक अगरवाल, केएल राहुल व करूण नायरसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू आधीपासून संघात असताना, आयपीएल २०२० मध्ये प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कर्नाटकच्याच असलेल्या अनिल कुंबळे यांनी के. गौथम व जगदीशा सुचिथ यांना संघाच्या रणनीतीचा भाग बनवून लिलावापूर्वी ट्रेड करत पंजाबच्या संघात सामील करून घेतले.
टिपू सुलतानसाठी प्रसिद्ध असणारे म्हैसूर शहर, जवागल श्रीनाथ क्रिकेट खेळू लागल्यानंतर त्याच्या नावाने ओळखले जाऊ लागले. श्रीनाथला म्हैसूर एक्स्प्रेस हे टोपणनाव सुद्धा दिले गेले. म्हैसूरसारख्या छोट्या शहराला क्रिकेटचा ज्वर मात्र चांगलाच चढला होता. त्यात लहान सुचिथला देखील क्रिकेट आवडू लागले. त्याच्या वडिलांन त्याला म्हैसूरमधील सर्वात मोठ्या नायडू जिमखाना या क्लबमध्ये दाखल केले.
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याची कर्नाटकच्या १३ वर्षाखालील संघात निवड झाली. तेव्हापासून तो कर्नाटकच्या प्रत्येक वयोगट संघाचा सदस्य राहिला आहे. मात्र, यादरम्यान त्याला रोज म्हैसूर ते बेंगलोर असा प्रवास करावा लागत.
सुचिथला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली ती २०१४-१५ देशांतर्गत क्रिकेट हंगामात. त्या वर्षी त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले. विजय हजारे ट्रॉफी तसेच रणजी ट्रॉफी गाजवत असतानाच, २०१५ च्या आयपीएलसाठी त्याची निवड मुंबई इंडियन्स संघात झाली. याच हंगामात मुंबईच्या संघामध्ये हार्दिक पांड्याचा समावेश करण्यात आला होता. पांड्या-सुचिथ या युवा जोडीने भल्याभल्या टी२० दिग्गजांना नाकीनऊ आणत स्पर्धा गाजवली. पांड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीचे पाणी अनेकांना पाजले. दुसरीकडे सुचिथने स्पर्धेत १३ सामने खेळत १० बळी आपल्या नावे केले होते. गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल, जेपी डुमिनी, रवींद्र जडेजा, शिखर धवन हे दिग्गज खेळाडू सूचिथच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले होते. त्याच वर्षी, कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बिजापूर बुल्स विरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतकी तडाखा दिला.
२०१६ आयपीएलमध्ये एक सामना तर २०१७ च्या आयपीएलमध्ये एकही संधी न मिळाल्याने सुचित अत्यंत दुःखी झाला होता. याविषयी सांगताना सुचिथ म्हणाला होता,
“२०१५ च्या हंगामात चांगली कामगिरी करून देखील पुढच्या हंगामात मला अवघा एक सामना खेळायला मिळाला. कृणाल पांड्यामुळे मला सतत डावलले गेले. मात्र, मी अजून संधी मिळविण्यास पात्र होतो. मुंबई संघात संधी मिळत नसल्याने, मी संघाचे संचालक राहुल संघवी यांना म्हटलेलो, मला दिल्ली डेरडेव्हिल्स सोबत ट्रेड करा. कारण, दिल्ली संघाने मला त्यांच्या संघात सामील करून घेण्यात रस दाखवला होता. पण, संघवी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. मुंबई व्यवस्थापनाने माझा अजिबात योग्य वापर करून घेतला नाही.”
२०१७ व २०१८ ही दोन वर्ष सुचिथसाठी अत्यंत वाईट गेली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी सरासरी होत होती. यातच, सलग दोन वर्ष तो आयपीएलच्या लिलावात विकला गेला नाही. २०१९ च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा हर्षल पटेल दुखापतग्रस्त झाल्याने दिल्ली व्यवस्थापनाने सुचिथला संघात स्थान दिले. दिल्लीकडूनही त्याला अवघा एक सामना खेळायची संधी मिळाली. पुढे पंजाबच्या ताफ्यात निवड होऊनही आयपीएल २०२० चा पूर्ण हंगाम तो बाकावर बसून राहिला. अखेर आयपीएल २०२१ च्या लिलावापुर्वी पंजाब संघाने त्याला रिलीज केले आणि ३० लाखांची किंमत मोजत हैदराबादने त्याला विकत घेतले.
यानंतर आयपीएलच्या चौदाव्या हंगामात हैदराबादकडून पदार्पणाचा सामना खेळण्याची संधी मिळाल्यावर गोलंदाजीत हा खेळाडू विशेष कामगिरी करु शकला नाही. परंतु फलंदाजीत आपल्या छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळीने त्याने सर्वांना प्रभावित केले. जर पुढे हैदराबाद संघाने ‘गँग्स ऑफ कर्नाटक’चा भाग असलेल्या सुचिथला अधिकाधिक संधी दिल्यास, तो हैदराबादला दुसरे विजेतेपद मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
गेल्या तीन वर्षात दिल्ली, हैदराबादने खेळल्यात ३ सुपर ओव्हर; पण निकाल मात्र वेगवेगळे, वाचा आकडेवारी