खरं तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेटच्या सामन्यात कधीही काहीही होऊ शकतं. याच आयपीएल हंगामाचं उदाहरण घ्यायचं झालं तर, एक टक्का संधी असलेला संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला, तर पहिल्या 9 सामन्यात 8 सामने जिंकणारा संघ पुढच्या 4 सामन्यांपैकी एकही सामना जिंकू शकला नाही. अशा स्थितीत क्रिकेटबद्दल काहीही भाष्य करणं अशक्य आहे. मात्र काही आकडे आणि काही समानता आहेत, ज्यामुळे या वेळी सनरायझर्स हैदराबादचा संघ जेतेपद पटकावू शकतो, असं म्हणता येईल.
सनरायझर्स हैदराबादची टीम आयपीएल 2016 मध्ये चॅम्पियन बनली होती. अगदी तसंच काहीसं आयपीएल 2024 मध्ये देखील होताना दिसत आहे. या दोन्ही हंगामातील एक-दोन नव्हे तर तब्बल 8 समान गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यावरून हैदराबादचा संघ यंदा चॅम्पियन बनू शकतो, असं दिसतं.
आयपीएल 2016 चा हंगाम आणि आयपीएल 2024 च्या हंगामातील पहिली समान गोष्ट म्हणजे, विराट कोहली ‘ऑरेंज कॅप’ धारक आहे. दुसरं साम्य म्हणजे, त्या हंगामात देखील कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. तिसरी समानता म्हणजे, 2016 मध्ये एक ऑस्ट्रेलियन खेळाडू (डेव्हिड वॉर्नर) हैदराबादचा कर्णधार होता. या हंगामातही एक ऑस्ट्रेलियन खेळाडू (पॅट कमिन्स) संघाचा कर्णधार आहे.
2024 आणि 2016 मधील चौथं साम्य म्हणजे, दोन्ही वेळा रोहित शर्मा आणि एमएस धोनीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नव्हता. पाचवं साम्य म्हणजे, हैदराबादचे दोन्ही सलामीवीर डावखुरे आहेत. त्यावर्षीप्रमाणे यंदाही एक सलामीवीर ऑस्ट्रेलियाचा आणि एक सलामीवीर भारताचा आहे. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरानं सर्वाधिक धावा केल्या होत्या. यंदाही तसंच आहे. आठवं साम्य म्हणजे त्या वर्षी संघानं ‘फेअर प्ले अवॉर्ड’ जिंकला होता आणि यावेळीही संघ या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ 5 कारणांमुळे ‘थाला’ची टीम आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही; जाणून घ्या