इंडियन प्रीमियर लीग २०२०चा चौदावा सामना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पार पडला. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळण्यात आलेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने ७ धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात ५ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघ २० षटकात १५७ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबादने सामना खिशात घालत या हंगामातील दूसरा विजय नोंदवला.
हैदराबादच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारत ५० धावा केल्या. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीत पहिले अर्धशतक ठरले आहे. त्याच्याव्यतिरिक्त चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने ४७ धावांची खेळी केली. तसंच सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिसनेही २२ धावा ठोकल्या. उर्वरित कोणत्याही खेळाडूला २० धावाही करता आल्या नाहीत.
हैदराबादकडून गोलंदाजी करताना टी नटराजनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. ४ षटकात ४३ धावा देत त्याने हा पराक्रम केला. तर भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समदने एक-एक विकेटचे योगदान दिले.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या हैदराबाद संघाला पहिल्याच षटकात मोठा झटका लागला. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोला दिपक चाहरने शून्य धावांवर त्रिफळाचीत केले. पण पुढे वॉर्नर आणि मनिष पांडेने संघाचा डाव सांभाळला. तरी ११ षटकांच्या आतच पांडे २१ चेंडूत २९ धावा आणि वॉर्नर २९ चेंडूत २८ धावा करत पव्हेलियनला परतले.
मात्र युवा फलंदाज प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्माने एका बाजूने हैदराबादचा डाव पुढे नेला. गर्गने शेवटी नाबाद राहत सर्वाधिक ५१ धावा कुटल्या. २६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार ठोकत त्याने हा पराक्रम केला. तर अभिषकनेही ३१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
चेन्नईकडून गोलंदाजी करताना दिपक चाहरने सर्वाधिक २ विकेट्स चटकावल्या. ४ षटकात ३१ धावा देत त्याने हा कारनामा केला. तर शार्दुल ठाकुर आणि पियूष चावला यांनी प्रत्येकी एक विकेटचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त संघातील इतर गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबो… संपला एकदाचा वनवास! जडेजाला आयपीएलमध्ये अर्धशतकासाठी लागले तब्बल १२ वर्षे
एका माळेचे मणी! चेन्नईचा संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सर्वात वयस्कर संघ, पाहा कसं ते…
आयपीएलचे चमकते सितारे! पाहा पहिल्या २ आठवड्यातच युवा खेळाडूंनी केलेली करामत
ट्रेंडिंग लेख-
‘बिग टॉम’ बिरुदावली लाभलेले टॉम मूडी म्हणजे ‘दर्जेदार खेळाडू आणि असामान्य प्रशिक्षक’
गळ्यात २५ तोळ्याची सोन्याची चैन घालून गोलंदाजी करणारा भारताचा प्रविण कुमार
IPL २०२० : मुंबई आणि पंजाब सामन्यात झाली तब्बल ८ विक्रमांची नोंद