दिवसेंदिवस इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा रोमांच वाढतच चालला आहे. आतापर्यंत या हंगामातील एकूण २० सामने पार पडले असून प्रत्येक संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी झगडताना दिसत आहे. अशात २५ एप्रिल, रविवार रोजी या हंगामातील पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळाली.
एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा विसावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादनेही ७ विकेट्स गमावत १५९ धावांपर्यंत मजल मारली. परिणामत सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे हंगामातील पहिली सुपर ओव्हर खेळवली गेली. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारत सामना खिशात घातला.
पण तुम्हाला माहिती आहे का, आयपीएल इतिहासात एक दिवस असा आला होता, जेव्हा एकाच दिवशी चक्क तीन सुपर ओव्हर झाल्या होत्या. आज आम्ही तुम्हाला त्याच दिवसाची आठवण करुन देणार आहोत.
तब्बल दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीत क्रिकेट चाहत्यांना अपरिमित आनंद देणाऱ्या आयपीएल २०२० हंगामातील हा प्रसंग आहे. या हंगामात चार असे सामने झाले; ज्यांनी उत्कंठेची अक्षरश: सीमा ओलांडली. हे चार सामने बरोबरीत सुटले आणि त्यानंतर सुपर ओव्हर खेळवावी लागली. गंमत म्हणजे चार सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. मात्र, पाच सुपर ओव्हर खेळवाव्या लागल्या.
चला तर वाचूया, आयपीएल २०२० मध्ये झालेल्या याच सुपर ओव्हरबद्दल…
विश्वचषक अंतिम सामन्यानंतर बदलला गेला होता नियम
दोन वर्षांपुर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला, २०१९ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली गेली. सुपर ओव्हरमध्ये देखील दोन्ही संघाची धावसंख्या १५-१५ अशी बरोबरीत राहिली आणि मुख्य सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारले असल्या कारणाने; इंग्लंडला विश्वचषकाचा विजेता घोषित करण्यात आले. आयसीसीच्या ‘या’ निर्णयावर प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. सुपर ओव्हरचे नियम बदलण्याची मागणी जोर धरू लागली. अखेरीस, आयसीसीने नियमांमध्ये बदल करत, जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत ‘सुपर ओव्हर’ खेळवण्यात यावी असा नवा नियम केला.
दुसऱ्याच सामन्यात पहायला मिळाली पहिली सुपर ओव्हर
आयपीएल २०२० चे बिगुल वाजले आणि आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये करण्याचे निश्चित झाले. स्पर्धेतील दुसराच सामना बरोबरीत सुटला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांची धावसंख्या १५७-१५७ अशी राहिली. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच्या कागिसो रबाडाने पंजाबच्या केएल राहुल आणि निकोलस पूरन यांना अवघ्या दोन धावांवर बाद करत; दिल्लीसाठी विजयाचा मार्ग खुला केला. दिल्लीने दोन चेंडूत तीन धावा काढत सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सुपर ओव्हरमध्ये सैनी ठरला ‘सरस’
दुसऱ्या सामन्यातील सुपर ओव्हरनंतर १० व्या सामन्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व मुंबई इंडियन्सने ही सुपर ओव्हरची मेजवानी क्रिकेटचाहत्यांना दिली. बेंगलोरने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना; मुंबईने २०१ धावा काढून सामना बरोबरीत सोडवला. नियमाप्रमाणे, झालेल्या सुपर ओव्हरमध्ये बेंगलोरचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने कायरन पोलार्ड व हार्दिक पांड्या या फटकेबाजांना वेसन घालत; फक्त ७ धावा काढू दिल्या. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली याने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत बेंगलोरला विजयी केले.
१८ ऑक्टोबर २०२० आयपीएल इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरला
क्रिकेटशौकिनांसाठी १८ ऑक्टोबर हा दिवस काहीसा खास राहिला. कारण, या दिवशी स्पर्धेत दोन सामने खेळले गेले आणि हे दोन्ही सामने बरोबरीत सुटले. महत्त्वाचे म्हणजे या दोन सामन्यात दोन नव्हे तर तर तीन सुपर ओव्हर टाकल्या गेल्या.
फर्ग्युसनची दांडीगुल कामगिरी
दिवसातील पहिला सामना कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या दरम्यान झाला. कोलकताने शुभमन गिल, ओएन मॉर्गन व दिनेश कार्तिक त्यांच्या योगदानामुळे १६३ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरात, लॉकी फर्ग्युसनच्या भेदक गोलंदाजीपुढे हैदराबादचा डाव गडगडला. हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर याने संयमाने फलंदाजी करत; अखेरपर्यंत किल्ला लढवून सामना बरोबरीत आणला. सुपर ओव्हरमध्ये मात्र, फर्ग्युसनने पहिल्या चेंडूवर वॉर्नरचा आणि तिसऱ्या चेंडूवर अब्दुल समदचा त्रिफळा उडवत; हैदराबादला दोन धावांच्या पुढे जाऊ दिले नाही. मॉर्गन-कार्तिक या जोडीने राशिद खानला सांभाळून खेळत तीन धावांचे लक्ष्य चार चेंडूत पूर्ण केले आणि आपल्या संघाचा विजय साकार केला.
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबचा ‘तो’ ऐतिहासिक सामना
कोलकता आणि हैदराबाद यांच्यातील सुपर ओव्हरची चर्चा संपली नव्हती; तोच मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील दिवसातील दुसऱ्या सामन्यात ‘सुपर ओव्हर’ झाली. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७६ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, अनेक चढउतारांसह पंजाब धावांचा पाठलाग करत होता. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना; ख्रिस जॉर्डन दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. मात्र, चाहत्यांना माहीत नव्हते की, ही फक्त सुपर ओव्हरच नाही; तर, एक ऐतिहासिक घटना होणार आहे. पंजाबकडून सुपर ओव्हरमध्ये कर्णधार राहुल व निकोलस पूरन पुन्हा एकदा मैदानात उतरले. मात्र, जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज असे बिरूद मिरवणारा जसप्रीत बुमराह मुंबईकडून गोलंदाजी करत होता. त्याने सुपर ओव्हरमध्ये अवघ्या पाच धावा देत; राहुल आणि पूरनला बाद केले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा व यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक सहा धावा बनविण्याच्या उद्देशाने खेळायला आले. परंतु, भारतीय संघाचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या मोहम्मद शमीने मुंबईच्या या दोन्ही फलंदाजांना बाद करून, मुंबईलाही पाच धावांवर रोखले.
‘ती’ ऐतिहासिक सुपर ओव्हर
शमीच्या या कामगिरीने इतिहास घडला होता. कारण, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवली जाणार होती. नियमाप्रमाणे, यावेळी मुंबईला प्रथम फलंदाजी मिळणार होती. मात्र, यात दुसरा नियम असा होता की, पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झालेले फलंदाज आणि गोलंदाजी केलेले गोलंदाज दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये सहभागी होणार नव्हते.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून कायरन पोलार्ड व हार्दिक पांड्या हे अष्टपैलू फलंदाजीला आले. पंजाबने गोलंदाजीची जबाबदारी ख्रिस जॉर्डनच्या खांद्यावर टाकली. जॉर्डनने पहिल्या ३ चेंडूंवर अवघ्या ७ धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद झाला. जॉर्डनने टाकलेला अखेरचा चेंडू पोलार्डने षटकार मारण्यासाठी टोलवला आणि मयंक अगरवालने सीमारेषेवर सुरेख क्षेत्ररक्षण करत; तो चेंडू षटकारासाठी न जाऊ देता आतमध्ये फेकला. ज्या ठिकाणी सहा धावा हव्या होत्या; त्या ठिकाणी अगरवालच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे अवघ्या दोन धावा मिळाल्या.
पंजाबपुढे विजयासाठी १२ धावांचे लक्ष्य होते. मुंबईकडून ही दुसरी सुपर ओव्हर ट्रेंट बोल्ट टाकत होता. हंगामातील आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या पंजाबच्या ख्रिस गेलने पहिल्या चेंडूवर षटकार मारत; सामना पंजाबच्या बाजूने झुकवला. पुढील चेंडूवर एक धाव काढल्याने मयंक अगरवाल स्ट्राइकवर आला. क्षेत्ररक्षणात केलेल्या कमालीचा आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. त्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग दोन चौकार खेचत पंजाबला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता.