दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात दोन वेळच्या विजेत्या कोलकाता दी अॅटलेटिकोने (एटीके) आज (१७ ऑक्टोबर) दिल्ली डायनामोजला २-१ असे पराभूत केले.
एटीकेने पहिल्या गोलसह पहिल्या विजयाची प्रतिक्षा अखेर येथील नेहरू स्टेडियमवर दिल्ली डायनामोजविरुद्ध संपुष्टात आणली. बदली खेळाडू अल मैमौनी नौसेर याने केवळ सहा मिनिटे बाकी असताना गोल केल्यामुळे कोलकाताचा विजय नक्की झाला.
एटीकेचे खाते २०व्या मिनिटाला बलवंत सिंगने उघडले होते. दिल्लीने ५४व्या मिनिटास कर्णधार प्रीतम कोटल याच्या गोलमुळे बरोबरी साधली होती. एटीकेचे प्रशिक्षक स्टीव कॉपेल यांनी ८१व्या मिनिटाला कालू उचे याच्यासारख्या गेल्या मोसमात चमकलेल्या स्ट्रायकरऐवजी नौसैरला पाचारण केले.
एटीकेचा मिडफिल्डर मॅन्युएल लँझरॉतने ही चाल रचली. डावीकडून त्याने पलीकडील बाजूला असलेल्या जयेश राणेला पास दिला. राणेने जास्त ताकद लागूनही प्रसंगावधान दाखवित दोन प्रतिस्पर्ध्यांना चकविले. मग त्याने नौसैरला अलगद पास दिला. नौसैरने मग कामगिरी फत्ते केली. डोरोन्सोरो झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.
एटीकेने या विजयासह तळातील दहाव्या क्रमांकावरून थेट सहावा क्रमांक गाठला आहे. त्यांनी दिल्लीला मागे टाकले. घरच्या मैदानावर दोन पराभव पत्करावे लागल्यानंतर एटीकेने या कामगिरीसह चाहत्यांना दिलासा दिला. दिल्ली हरल्यामुळे त्यांची विजयाची प्रतिक्षा लांबली आहे.
एटीकेने मोसमातील पहिल्यावहिल्या गोलची प्रतिक्षा अखेर तिसऱ्या सामन्यात २०व्या मिनिटाला संपुष्टात आणली. त्यांना सकारात्मक सुरवातीचे फळ मिळाले. बलवंतने डावीकडे विनीत रायला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. प्रीतम कोटल यालाही त्याने चकविले. मग दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याला चकवित त्याने अचूक फिनीशिंग केले.
एटीकेने सुरवात सकारात्मक केली. लँझरॉतने पहिल्याच मिनिटाला हाफलाईनवरून डावीकडे जॉन जॉन्सनला पास दिला. जॉन्सनचे हेडिंग डोरोन्सोरोने सहज अडविले. राणा घरामीने दिर्घ पास देत डावीकडील नारायण दासच्या दिशेने चेंडू सोपविला. नारायणने चपळाई दाखविली, पण त्याने वाजवीपेक्षा जास्त ताकद लावली.
तीन मिनिटांनी कालू उचेने मैदानाच्या मध्यातून बॉक्सच्या डावीकडील बलवंतला पास दिला. बलवंतने चेंडूवर ताबा मिळवित डाव्या पायाने किक मारली, पण दिल्लीचा मध्यरक्षक शुभम सारंगी याने ती ब्लॉक केली. पुढच्याच मिनिटाला लँझरॉतने दिल्लीच्या क्षेत्रात धडक मारली. ३५ यार्डावरून त्याने फ्री कीक घेतली. कालूने नेटसमोरील धुमश्चक्रीत सरस उडी घेतली, पण त्याचा हेडर पुरेसा उंच नव्हता. त्यामुळे डोरोन्सोरो चेंडू सहज अडवू शकला.
१६व्या मिनिटाला एटीकेने आणखी एक चाल रचली. प्रोणय हाल्दरने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला. त्याने कालूला फॉरवर्ड पास दिला. कालूने प्रतिस्पर्ध्याला हुलकावणी देत दोन प्रयत्नांत चेंडू मारला, पण उजवीकडे मैदानालगत आलेला चेंडू डोरोन्सोरोने चपळाईने अडविला.
२७व्या मिनिटाला दिल्लीच्या रेने मिहेलीच याच्या पासनंतर नंदकुमार शेखर बॉक्समध्ये चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही. गेर्सन व्हिएराच्या चिवट बचावामुळे त्याच्याकडून फाऊल घडले. तीन मिनिटांनी कोमल थातलने घोडदौड करीत उदवीकडून बलवंतला बॉक्समध्ये पास दिला. त्यावेळी बलवंत हेडिंगसाठी उडीचे टायमिंग साधू शकला नाही.
३५व्या मिनिटाला एव्हर्टन सँटोस आणि घरामी यांच्यात चेंडूवरील ताब्यासाठी धुमश्चक्री झडली. दिल्लीने पूर्वार्धाच्या अंतिम टप्यात कसून प्रयत्न केले. लालीयनझुला छांगटे याने डावीकडून आगेकूच केली, पण त्याला रोखण्यात आले. ४५व्या मिनिटाला कोमलचा फटका डोरोन्सोरोने अडविला.
दुसऱ्या सत्रात दिल्लीची सुरवात चांगली झाली. ४९व्या मिनिटाला सारंगीचा फटका एटीकेच्या जॉन जॉन्सन याने थोपविला. चेंडू बाहेर गेल्यामुळे दिल्लीला कॉर्नर मिळाला. उजवीकडून नारायणने प्रीतमच्या दिशेने चेंडू मारला. त्यावर प्रीतम हेडींगचे टायमिंग साधू शकला नाही.
दिल्लीने ५३व्या मिनिटाला आणखी एक कॉर्नर मिळविला. मिहेलीचने डावीकडून मारलेला चेंडू हाल्दरने बाहेर घालविला. त्यामुळे आणखी एक कॉर्नर मिळाला. जो घेतला जाईपर्यंत पुढचा मिनिट सुरु झाला होता. नारायणने उजवीकडून घरामीच्या दिशेने चेंडू मारला. घरामीने हेडिंगवर प्रीतमसाठी संधी निर्माण केली. प्रीतमने चपळाईने उडी घेत हेडिंग करीत एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला चकविले.
महत्त्वाच्या बातम्या:
–सहाव्यांदा असा पराक्रम करण्यासाठी विराट कोहली सज्ज
–वाढदिवस विशेष: भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेबद्दल या 10 गोष्टी माहित आहेत का?