आयपीएलच्या 13 व्या हंगामात खेळण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना हा संघासोबत यूएईला रवाना झाला होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्याला भारतात परत यावे लागले आणि त्याने या हंगामातून माघार घेतली आहे.
त्यामुळे सध्या गेल्या १२ हंगामात खेळणाऱ्या आणि ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाला त्याचे चाहाते मिस करत आहेत. त्याला पुन्हा संघात घ्या म्हणून मागणीही चाहच्यांकडून करण्यात आली आहे.
रैना भारतात परत आल्यापासून तो संघात पुनरागमन करेल याची चर्चा होती. सुरेश रैना स्वत: म्हणाला होता की तो आयपीएलमध्ये कधीही परत येऊ शकतो. मात्र, आता तो संघात परत येईल असे वाटत नाही.
वास्तविक, चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत वेबसाइटवरून सुरेश रैना यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे. वेबसाईट वर असलेल्या ‘संघ’ या विभागात सर्व खेळाडूंची नावे आहेत, परंतु रैनाचे नाव नाही. यावरून असे लक्षात येते की रैना या हंगामात खेळणार नाही. चेन्नईच्या सलग दुसर्या पराभवानंतर चाहत्यांनी रैनाला परत आणण्याची मागणी केली होती. चेन्नईने आत्तापर्यंत यंदाच्या हंगामात ३ सामने खेळले असून १ सामन्यात विजय आणि २ सामन्यात पराभव पत्करला आहे.

यापूर्वी रैनाने ट्विटरवर सीएसकेच्या अधिकृत अकाउंटला अनफॉलो केले होते. त्याने एक छायाचित्र ट्विटरवर टाकले असून त्यामध्ये तो काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिर परिसरात आहे, असे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रैना काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेत आहे.
चेन्नईने रैनाबरोबरच हरभजन सिंगचेही नाव वेबसाईटवरुव काढले आहे. २०१८ पासून चेन्नईकडून खेळणाऱ्या हरभजननेही यंदाच्या आयपीएल हंगामातून कौटुंबिक कारणाने माघार घेतली आहे.






