---Advertisement---

सूर्यकुमार यादवचं पुनरागमन! ‘या’ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार

On: सोमवार, नोव्हेंबर 9, 2026 9:47 PM
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) मध्ये टीम इंडियाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) 9 नोव्हेंबर रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) 2026 साठी मुंबई संघाची घोषणा केली. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्येही पुनरागमन करणार आहे.

सूर्यकुमार गेल्या काही काळापासून मैदानापासून दूर आहे. तो शेवटचा आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसला होता. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 मार्च 2026 रोजी न्यूझीलंडविरुद्ध टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तो शेवटचा खेळताना दिसला होता.

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने यंदा टी-20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावले होते. मात्र, खराब फॉर्ममुळे त्याला राष्ट्रीय संघातून बाहेर व्हावे लागले. आता मुंबईच्या संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्याकडे पुन्हा एकदा मैदानावर आपली लय मिळवण्याची चांगली संधी असेल.

कर्णधारपदी निवड झाल्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, मुंबईचे प्रतिनिधित्व करणे ही नेहमीच अभिमानाची गोष्ट असते. आमच्या संघात अनुभवी खेळाडू आणि प्रतिभावान युवा खेळाडू यांचा चांगला समतोल आहे. संपूर्ण संघ एकजुटीने खेळेल आणि प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे. विजेतेपद मिळवून ते मुंबईत आणणे हेच आमचे लक्ष्य आहे.

मुंबईच्या संघात सूर्यकुमार यादवसोबतच भारतीय टी-20 संघातील नियमित खेळाडू शिवम दुबेचाही समावेश आहे. याशिवाय मॅक्सवेल स्वामीनाथन, हार्दिक तामोरे, अंगकृष रघुवंशी, सरफराज खान, शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडे यांसारखे खेळाडूही संघाचा भाग असतील.

मात्र, यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या सिद्धेश लाडला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. मुंबईचा संघ 14 नोव्हेंबर रोजी हैदराबादविरुद्धच्या सामन्याने आपल्या स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करेल.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 साठी मुंबईचा संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अंगकृष रघुवंशी (यष्टीरक्षक), दिव्यांश सक्सेना, सुवेद पारकर, मुशीर खान, सरफराज खान, सैराज पाटील, शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, मॅक्सवेल स्वामीनाथन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा आणि हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---