भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका रविवारी (15 जानेवारी) संपंन्न झाली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. विराट कोहली, शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज भारतासाठी या सामन्यात मॅच विनर ठरले. भारताने हा सामना विक्रमी 317 धावांनी जिंकला. टी-20 फॉरमॅटमध्ये वादळी खेळी करणारा सूर्यकुमार यादव वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना यावेळीही अपयशी ठरला.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संधी दिली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला बाकावर बसवले गेले होते. तिसऱ्या सामन्यात संधी मिळाल्यानंतर चाहत्यांना सूर्यकुमारकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याने चार चेंडून चार धावा केल्या आणि स्वस्तात विकेट गमावली. कसुन रजिथा (Kasun Rajitha) याने सूर्यकुमारला बाद केले.
टी-20 प्रकारात अप्रतिम खेळ दाखवणारा सूर्यकुमार वनडे प्रकारात मात्र अद्याप अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. त्याने भारतासाठी आतापर्यंत 17 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये 16 वेळा त्याला खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये 29.85 च्या सरासरीने 388 धावा केल्या. सूर्यकुमारने टी-20 फॉरमॅटमध्ये ज्या पद्धतीचे प्रदर्शन मागच्या वर्षभारात केले, त्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा चांगल्याच वाढल्या आहेत. वनडे फॉरमॅटमधील त्याची आकडेवारी त्याच्या प्रतिभेला साजेशी नाहीये. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत फक्त दोन अर्धशतके केली आहेत.
सूर्याच्या टी-20 प्रदर्शनाचा विचार केला, तर या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 45 सामने खेळले आहेत. यापैकी 43 सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली आणि 46.41 च्या सरासरीने 1578 धावा केल्या आहेत. टी-20 प्रकारात त्याने तीन शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 180.34 राहिला आहे. यावर्षी भारतीय संघाला मायदेशात आयसीसी वनडे विश्वचषक खेळायचा आहे. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघात सूर्यकुमारचा टी-20 फॉर्म लक्षात घेऊन संधी दिली जाऊ शकते. मात्र, त्याआधी भारताला आगामी काळात काही वनडे मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांमध्ये सूर्यकुमारच्या प्रदर्शनावर लक्ष असेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील या वनडे मालिकाचा विचार केला, तर विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात शतक ठोकले आणि संघासाठी एकूण 283 धावांचे योगदान दिले. या वादळी खेलीसाठी विराटला मालिका जिंकल्यानंतर मालिकावीर म्हणून निवडले गेले. रविवारी तिसऱ्या वनडे सामन्यात विराट नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 110 चेंडूत नाबाद 166 धावा कुटल्या. संघासाठी या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. गिलने या सामन्यात 89 चेंडूत 116 धावा केल्या. (Suryakumar Yadav failed again in the ODI format)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकी विश्वचषक: टीम इंडियाच्या भक्कम बचावाने भारत-इंग्लंड सामना नाट्यमयरित्या ड्रॉ
शिवराज ठरला महाराष्ट्र केसरी, पण चर्चा होतेय पराभूत सिकंदरची! काय आहे कारण?