येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ 24 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. याआधी मुंबईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनं दुखापतीतून बरा झाल्यानंतर फलंदाजीचा सराव सुरू केला आहे.
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव घोट्याच्या दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. आता त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सूर्यानं काल त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तो बॅटिंग करताना दिसतोय.
सूर्यकुमार यादवनं त्याचा नेटमध्ये सराव करतानाचा काही सेकंदांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये तो शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच हातात बॅट धरताना दिसत आहे. सूर्यकुमार घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेला होता.
सूर्यकुमार यादव भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शेवटचा खेळताना दिसला होता. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. विशेष म्हणजे, सूर्यानं या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावलं होतं. मात्र दुसऱ्या डावात आफ्रिकन फलंदाजानं मारलेला फटका रोखल्यानंतर चेंडू फेकताना तो जखमी झाला.
सामन्यानंतर त्यानं सांगितलं होतं की तो बरा आहे आणि दुखापत फारशी गंभीर नाही. परंतु जेव्हा तो भारतात परतला तेव्हा त्याच्या घोट्याचं स्कॅन करण्यात आलं, ज्यामध्ये ग्रेड-2 स्तराची झीज दिसून आली. त्यामुळे तो आता खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचं स्पष्ट झालं. यानंतर त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे तो आयपीएलपूर्वी बरा झाल्यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सूर्यकुमार यादव सध्या जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज आहे. त्यानं 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून त्यानं 60 टी 20I सामने खेळले. या दरम्यान त्यानं 45.55 ची सरासरी आणि 171.55 च्या धमाकेदार स्ट्राइक रेटनं 2141 धावा ठोकल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये सूर्याच्या नावावर 4 शतकं आणि 17 अर्धशतकंही आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धर्मशाला कसोटीत इंद्रदेव येईल ‘साहेबां’च्या मदतीला? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
‘झहीर-धोनीही 100 कसोटी सामने खेळू शकले असते, परंतु…’; आर अश्विनचा मोठा दावा
इंग्लंड कसोटीपूर्वी भारतीय फिरकीपटूचा मोठा निर्णय! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला ठोकला रामराम