---Advertisement---

INDvsPAK: स्लेजिंगबाबत कॅप्टन सूर्याने दिली होती खेळाडूंना वॉर्निंग! BCCI ने शेयर केला व्हिडिओ

On: सोमवार, फेब्रुवारी 16, 2026 6:25 PM
---Advertisement---

भारतीय पुरूष क्रिकेट संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवत त्यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत हे दोन संघ रविवारी (१५ फेब्रुवारी) समोरा-समोर आले होते. त्यामध्ये भारताने ६१ धावांनी विजय मिळवला. या सामन्याआधी मैदानाबाहेर आणि आत वातावरण तापलेले होते. सामन्यावेळीही तशीच स्थिती असल्याने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने खेळाडूंना स्लेजिंगबाबत विशेष सूचना दिल्या होत्या.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (१६ फेब्रुवारी) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये सूर्यकुमार संघातील खेळाडूंना पाकिस्तानी फलंदाजांना स्लेजिंग न करण्याबाबत सांगताना दिसत आहे. तो म्हणाला, “षटकांच्या मधल्या वेळेत पळत राहा आणि कोणाला काही बोलू नका. आपल्याला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. उत्तम कौशल्यांवरच आपण हा सामना जिंकणार.”

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा ग्रुप ए मधील सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारताचा दबाव दिसला. या स्पर्धेच्या सुरूवातीला पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. आयसीसी आणि बांग्लादेशसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी यु-टर्न घेतला.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. ज्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाजांचे खराब प्रदर्शन दिसले. भारताने ईशान किशनच्या ७७ धावांच्या जोरावर २० षटकात ७ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजांनीही निराशा केली.

विकेटकीपर उस्मान खानने केलेल्या ४४ धावा ह्या पाकिस्तानकडून सर्वोच्च धावा होत्या. त्याला अक्षर पटेलने बाद केले. त्यांचे पहिले चार फलंदाज तर एकेरी धावसंख्येवरच तंबूत परतले. यामुळे पाकिस्तानने १८ षटकात १० विकेट्स गमावत ११४ धावा केल्या होत्या.

या स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. ग्रुपचा शेवटचा सामना बाकी असून तो नेदरलॅंड्सविरुद्ध १८ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. पाकिस्तानने ३ पैकी २ सामने जिंकले असून त्यांना शेवटच्या सामन्यात मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे. तसेच हा सामना काही कारणाने झाला नाही तरी त्यांनाच फायदा आहे. कारण यूएसएही ४ पैकी २ सामने जिंकत सुपर-८च्या शर्यतीत आहेत. तो सामना १८ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---