अहमदाबाद। गुरुवारी (१८ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. याबरोबर मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. भारताच्या या विजयात सुर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
षटकाराने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात –
सुर्यकुमार त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा दुसराच सामना खेळत होता. त्याने याच मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी पकडली. तो रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यावेळी इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत होता. यावेळी सुर्यकुमारने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलाच चेंडूचा सामना करताना षटकार ठोकला.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकार ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच २००२ सालानंतर कसोटी दर्जा असलेल्या देशांतील खेळाडूंचा विचार करायचा झाल्यास असा कारनामा करणारा तो केवळ ५ वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी या यादीत पाकिस्ताचा सोहेल तन्वीर, न्यूझीलंडचा मार्क क्रेग, दक्षिण आफ्रिकेचा मंगालिसो मोस्हेल आणि झिम्बाब्वेच्या रिचर्ड एनगरवा यांचा समावेश होता.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पूर्ण सदस्य असलेल्या संघांच्या खेळाडूंचा विचार करायचा झाल्यास आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिल्या चेंडूचा सामना करताना षटकार मारणारा सुर्यकुमार आठवा फलंदाज आहे. या यादीत त्याच्यापूर्वी पाकिस्ताचा सोहेल तन्वीर, वेस्ट इंडिजच्या झेवियर मार्शल, जेरोमी टेलर, किरॉन पोलार्ड, टिनो बेस्ट यांचा, तर दक्षिण आफ्रिकेचा मंगालिसो मोस्हेल आणि आयर्लंडच्या मार्क एदेरचा समावेश आहे.
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1372546831259901956
सुर्यकुमारचे अर्धशतक
सुर्यकुमारने भारताच्या पहिल्या ३ विकेट्स लवकर गेल्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी केली. त्याने या सामन्यात ३१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तो १४ व्या षटकात तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे बाद झाला. त्याच्या अर्धशतकामुळे भारताला २० षटकात ८ बाद १८५ धावा करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
सुर्यकुमारने केवळ अर्धशतकच केले नाही, तर बेन स्टोक्सचा अफलातून झेलही घेत केली कमाल, पाहा व्हिडिओ
…म्हणून विराट करतोय केएल राहुलचे समर्थन? आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
विरेंद्र सेहवागचा खुलासा, इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये ‘ती’ गोष्ट पाहून विराटला मिळाला फिटनेस मंत्र





