---Advertisement---

विरेंद्र सेहवागचा खुलासा, इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये ‘ती’ गोष्ट पाहून विराटला मिळाला फिटनेस मंत्र

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 1:06 AM
---Advertisement---

भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावला आहे. जेव्हापासून विराट कोहलीने कर्णधारपद सांभाळले आहे, तेव्हापासून त्याने खेळाडूंच्या फिटनेसवर जोर दिला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात इंग्लंड संघातील महत्वाच्या फलंदाजांचे झेल सुटले होते. तर काही चुका देखील झाल्या होत्या. या प्रदर्शनानंतर विराट कोहलीने निराशा व्यक्त केली होती. अशातच वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीच्या फिटनेस बाबत एक मोठा खुलासा केला आहे.

वीरेंद्र सेहवागने भारतीय संघातून २०१५ मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने एका मुलाखतीत विराट कोहलीची एक गोष्ट सांगत खुलासा केला आहे. तो म्हणाला, “मी इंग्लंड संघाविरुद्ध शेवटचा दौरा २०११-१२ मध्ये केला होता आणि दौऱ्यावर २ कसोटी सामने खेळलो होतो. मी एक सामना ओवलमध्ये आणि एक सामना बर्मिंघममध्ये खेळला होता. तिकडे सर्व काउंटी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक चार्ट असतो. जो आपले फिटनेस मानक दाखवतो.”

“मला वाटत आहे सध्या भारतीय संघाचे फिटनेस मानकं देखील त्यांच्याकडूनच घेण्यात आले आहे. आम्ही त्या गोष्टीवरून खूप प्रभावित झालो होतो. आम्ही सर्वांनी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. आमचा अर्ध्यापेक्षा जास्त संघ ते करु शकला नव्हता,” असे पुढे सेहवाग म्हणाला.

या दौऱ्यावर विराट कोहली देखील संघात होता. परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच सेहवागच्या मते, कोहलीने हाच फिटनेस मंत्र स्वतःसाठी आणि संघासाठी अंमलात आणला आहे. तसेच तो पुढे म्हणाला, “मला वाटते की कोहलीला ही गोष्ट इथूनच सुचली असावी. जर इंग्लंड संघाकडे फिटनेसचे असे मापदंड आहेत. तर आपल्याकडे ही असायला हवे. तसेच तो जेव्हापासून कर्णधार झाला आहे. तेव्हापासून त्याने या गोष्टीवर जास्त भर दिला आहे की फिटनेस सिद्ध करण्यासाठी काही चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.”

भारतीय संघातील खेळाडूंना कुठलीही मालिका खेळण्यापूर्वी फिटनेस टेस्ट पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये खेळाडू उत्तीर्ण झाला तरच त्याला संघात स्थान मिळते अथवा नाही. आयपीएल २०२० मध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या वरून चक्रवर्तीला देखील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होत असलेल्या टी२० मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले होते. परंतु फिटनेस टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत मॉर्गन घालतोय सातत्याने दोन टोप्या, ‘हे’ आहे कारण

“तुमच्याकडे प्लॅन-बी नव्हता का?” पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भडकला आफ्रिदी

सूर्यकुमारच्या नावे जमा झाला खास विक्रम; रोहित-रहाणेच्या पंक्तीत मिळवले स्थान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---