रविवारी दुबई येथे झालेल्या आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. भारताने 25 चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. आशिया कप 2025 स्पर्धेच्या ग्रुप-ए मध्ये भारत ४ गुणांसह आणि +4.793 च्या नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया आता सुपर-4 टप्प्यासाठी पात्र होण्याच्या अगदी जवळ आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 टी20 सामन्यात विजय मिळवून भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने इतिहास रचला आहे.
रविवारी त्याच्या 35व्या वाढदिवशी सूर्यकुमार यादवने एक उत्तम विक्रम रचला. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादव आता पाकिस्तानविरुद्ध टी20 सामना जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025च्या सामन्यात सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने 128 धावांचे लक्ष्य गाठले आणि केवळ 15.4 षटकांत विजय मिळवत पाकिस्तानवर 7 विकेटने मोठा विजय मिळवला.
महेंद्रसिंग धोनीने पाकिस्तानविरुद्ध 8 टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. धोनीने 8 पैकी 7टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध 4 पैकी 3 टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध फक्त एकाच टी-20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे आणि तो टी20 विश्वचषक 2021 चा सामना होता. त्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव स्वीकारावा लागला.
महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मानंतर पाकिस्तानविरुद्ध टी20 सामना जिंकणारा सूर्यकुमार यादव आता तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. रविवारी पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करत होता. सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 47 धावांची कर्णधाराला साजेल अशी खेळी खेळली आणि भारताला पाकिस्तानविरुद्ध 7 गडी राखून विजय मिळवून दिला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. याशिवाय अभिषेक शर्माने 31 धावा केल्या आणि तिलक वर्माने 31 चेंडूत 31 धावा जोडून भारताच्या धावसंख्येत योगदान दिले.






