Suryakumar Yadav On Rohit Sharma :- भारताचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा याचा दावेदार म्हणून सध्या सूर्यकुमार यादव याच्याकडे पाहिले जात आहे. सूर्यकुमार रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. आता आपला ‘गुरू’ रोहितच्या पावलावर पाऊल ठेवत ‘शिष्य’ सूर्यकुमार भारताच्या टी20 संघाचा भावी कर्णधार बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. तो शनिवारपासून (27 जुलै) श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतून भारताच्या टी20 संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. तत्पूर्वी सूर्यकुमारने रोहितचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
रोहितच्या नेतृत्त्वात शिकलेला सूर्यकुमार त्याच्या गुरूबद्दल म्हणाला, “भारतीय संघाचे नेतृत्व करावे हे प्रत्येक खेळाडूप्रमाणे माझेही स्वप्न होते. आपल्या संघासाठी काहीतरी चांगले करता यावे म्हणून सर्वजण झटत असतात. हळूहळू तुम्ही विचार करू लागता की, कशाप्रकारे भारतीय संघाच्या विजयात योगदान देता येईल. मग आणखी एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे जर तुम्ही कर्णधार झाला तर? मी रोहित शर्माकडून खूप काही शिकलो आहे. तो नेहमीच एका लीडरप्रमाणे (जमिनीवरच्या नेत्यासारखा) असतो.”
“मला वाटते की, कर्णधार आणि लीडरमध्ये खूप फरक असतो. एकजण त्यांच्या गटासोबत (संघासोबत) उभा राहतो आणि दुसरा त्यांना मार्गदर्शन करतो. टी20 क्रिकेट कसे खेळायचे आणि सामने कसे जिंकायचे हे मी रोहितकडून शिकलो आहे. त्यामुळे तोच ट्रॅक सुरू राहणार आहे. फक्त इंजिन बदलले आहे, बाकीचे डब्बे अजूनही तसेच आहेत”, असे सूर्यकुमारने सलामीच्या सामन्यापूर्वी सांगितले.
दरम्यान 27 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता भारत विरुद्ध श्रीलंका संघातील पहिला टी20 सुरू होणार आहे. हा सामना पल्लेकल्ले स्टेडियमवर होईल.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
हेही वाचा –
पॅरिसच्या सीन नदीवर फडकला तिरंगा, 2024 ऑलिम्पिक खेळांना धडाक्यात सुरुवात
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल
देशाला लवकरच मिळणार गुड न्यूज! भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जवळपास निश्चित