अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात गुरुवारी(१८ मार्च) चौथा टी२० सामना पार पडला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. भारताच्या या विजयात सुर्यकुमार यादवने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी तर केलीच, पण धोकादायक बेन स्टोक्सचा झेलही घेतला.
सुर्यकुमारने घेतला स्टोक्सचा झेल
या सामन्यात भारताने इंग्लंडला १८६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करता ज्यावेळी इंग्लंडला २४ चेंडूत ४६ धावांची गरज होती, त्यावेळी इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स ४६ धावांवर फलंदाजी करत होता. तसेच त्याआधी त्याने काही आक्रमक फटके मारले होते. त्यामुळे तो धोकादायक वाटत होता.
असे असतानाच १७ वे षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकूरने चेंडू हातात घेतला. त्याने पहिला चेंडू ऑफ कटर टाकला. त्यावर स्टोक्सने जोरदार फटका मारला. पण तो चेंडू लाँग ऑफला गेला. त्यावेळी तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या सुर्यकुमारने कोणतीही चूक न करता शानदार झेल घेतला. त्यामुळे स्टोक्सला ४६ धावांवर बाद व्हावे लागले.
शार्दुलने त्या पुढच्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनला ४ धावांवर बाद केले. त्यामुळे भारताने या सामन्यात पुनरागमन केले. सामन्याचे अखेरचे षटकही शार्दुलने टाकले. त्याने अखेरच्या षटकात २३ धावांचा यशस्वी बचाव केला.
https://twitter.com/Sailesh_arya_45/status/1372633149000220673
सुर्यकुमारचे अर्धशतक
सुर्यकुमार त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा दुसराच सामना खेळत होता. त्याने याच मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली.
त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी पकडली. भारताच्या पहिल्या ३ विकेट्स लवकर गेल्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी केली. विशेष म्हणजे त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्याने या सामन्यात ३१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तो १४ व्या षटकात तिसऱ्या पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे बाद झाला.
त्याच्या अर्धशतकामुळे भारताला २० षटकात ८ बाद १८५ धावा करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून विराट करतोय केएल राहुलचे समर्थन? आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
विरेंद्र सेहवागचा खुलासा, इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये ‘ती’ गोष्ट पाहून विराटला मिळाला फिटनेस मंत्र
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत मॉर्गन घालतोय सातत्याने दोन टोप्या, ‘हे’ आहे कारण